1993 स्फोट; अबू सालेम, करिमुल्लाला जन्मठेप; ताहिर, फिरोजला फाशी

1993 स्फोट; अबू सालेम, करिमुल्लाला जन्मठेप; ताहिर, फिरोजला फाशी
1993 स्फोट; अबू सालेम, करिमुल्लाला जन्मठेप; ताहिर, फिरोजला फाशी

मुंबई : मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोट- ब खटल्यात आज (गुरुवार) विशेष 'टाडा' न्यायालयाने गँगस्टर अबू सालेमसह, करिमुल्ला खानला जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली. तर, ताहिर मर्चंट आणि फिरोज खानला फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. तर, पाचवा आरोपी रशीद खानला 10 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. एस. सानप यांनी 16 जूनला मुस्तफा डोसा, अबू सालेम, करिमुल्ला खान, फिरोज खान, रशीद खान, रियाज सिद्दिकी आणि ताहिर मर्चंट ऊर्फ ताहिर टकल्या यांना दोषी ठरवले होते. त्यामुळे यांना नेमकी काय शिक्षा होते, याविषयी उत्सुकता होती. अखेर न्यायाधीशांनी दोषींना शिक्षा सुनावली.  ताहिर मर्चंट उर्फ टकल्या आणि फिरोज खान हे मुख्य आरोपी असल्याने त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.

1993 च्या बॉंबस्फोट खटल्यात दोषी ठरवल्यानंतर काही दिवसांतच मुस्तफा डोसाचा हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला होता. शिक्षेसंदर्भात जूनमध्ये सरकारी पक्षाच्या वतीने दीपक साळवी यांनी केलेल्या युक्तिवादात या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा ठोठावण्याची मागणी केली होती. आज सकाळी तळोजा कारागृहातून पाचही आरोपींना सुनावणीसाठी कारागृहात आणण्यात आले होते. स्फोटानंतर 25 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे. 12 मार्च 1993 रोजी मुंबईतील 12 मुख्य ठिकाणांवर साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले होते. यात 257 जणांचा मृत्यू व 713 जण जखमी झाले होते.

सालेमने 1993 मध्ये गुजरातला जाऊन नऊ एके-56 रायफल्स आणि 100 ग्रेनेड्‌स घेतले होते. अभिनेता संजय दत्त, झैबुनीसा काझीच्या घरात त्यापैकी काही शस्त्रे ठेवली होती. अनिस इब्राहिमच्या इशाऱ्यावरून हा शस्त्रसाठा या दोघांकडे ठेवला असल्याचा सरकारचा दावा विशेष न्यायालयाने मान्य केला आहे. पोर्तुगालकडून फाशीची शिक्षा न देण्याच्या अटीवर त्याचे प्रत्यार्पण झाल्यामुळे अबू सालेमला फाशी देता येणार नसल्याने जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. सालेमला 25 वर्षे कारागृहात राहावे लागणार आहे. न्यायालयाने शिक्षेबद्दल काही सांगायचे आहे का अशी विचारणा केली त्यावर सालेम फक्त हसला उत्तर दिले नाही.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील पहिले प्रकरण ए चा निकाल यापूर्वी लागला असून त्यातील मुख्य आरोपी याकुब मेमन याला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जुलै 2015 मध्ये फाशी देण्यात आली. सध्या सुरू असलेल्या खटल्यातील सात आरोपी मूळ खटला सुरू झाल्यानंतर पोलिसांच्या हाती लागल्याने न्यायालयाने आधी 100 आरोपींवरील खटला पूर्ण केला. त्यानंतर या सात जणांवर खटला चालवला. मुंबई बॉम्बस्फोटाची केस बी म्हणून सात जणांवरील खटला चालवण्यात येत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com