कळमणा बाजारात सोयाबीन ३६८० रुपये क्विंटल

सोयाबीन
सोयाबीन

नागपूर ः सुरवातीला २४०० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटल असलेल्या सोयाबीनच्या दरात तेजी आली आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्यानंतर दर तेजीत आल्याने त्याचा फायदा मात्र शेतकऱ्यांना होणार नसल्याचे जाणकार सांगतात. सध्या येथील कळमणा मार्केटमध्ये सोयाबीनचे दर ३६८० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले आहेत.

मध्य प्रदेशात सोयाबीन लागवड अधिक आहे, परंतु या वर्षी त्या भागात सोयाबीनची अपेक्षित उत्पादकता मिळाली नाही. त्यामुळे स्थानिक प्रक्रिया उद्योगांची गरज भागवण्याकरिता लागणाऱ्या कच्च्या मालास मागणी वाढली आहे.

परिणामी सोयाबीन दरात तेजी येऊन ते ४००० रुपयांवर पोचले होते. त्यानंतर आता सोयाबीनला ३६८० रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंत दर मिळत आहे. सोमवारी (ता. १९) सोयाबीनचे दर ३३०० ते ३७०० रुपये प्रतिक्‍विंटलवर होते. त्यानंतर ३७५४ रुपयांचा दर मंगळवारी (ता. २०) मिळाला. त्यानंतर हे दर ३६८० रुपये प्रतिक्‍विंटलपर्यंत कमी झाले आहेत. सोयाबीनची ४०० ते ४५० क्‍विंटल आवक होत आहे.

बाजारात ज्वारीची ३ ते ७ क्‍विंटल अशी अत्यल्प आवक होत आहे. ज्वारीला १७०० ते २००० रुपये क्‍विंटल दर मिळत होते. मात्र त्यात सुधारणा होत ते २२०० रुपये क्‍विंटलवर पोचले. सरबती गव्हाची ३५ ते ४० क्‍विंटल आवक होत आहे. या गव्हाला २२०० ते २७०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळत आहे. लुचई तांदूळ २२०० ते २४०० रुपये क्‍विंटल असून, आवक ४० क्‍विंटल अशी जेमतेम आहे.

वाशीम जिल्ह्यात सोयाबीन प्रक्रिया उद्योगांची संख्या अधिक आहे. त्यांच्याकडून वाढती मागणी असल्याने या भागात सोयाबीनचे दर दोन-तीन दिवसाआड चार हजार रुपये क्‍विंटलचा पल्ला गाठतात. इतरवेळी ३५०० ते ३८०० रुपये क्‍विंटल असा दर सोयाबीनला मिळत आहे. मोठ्या आकाराच्या संत्र्याची २५०० ते ३००० क्‍विंटल आवक दररोज बाजारात होत आहे.

मोठ्या आकाराच्या संत्री फळाचे दर सोमवारी (ता. १९) २५०० ते ३००० रुपये क्‍विंटल होते. शुक्रवारी (ता. २३) हे दर २६०० ते ३२०० रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले. संत्र्याची ३००० क्‍विंटल आवक झाली. मोसंबीचीदेखील आवक बाजारात होत आहे. मोसंबीची सरासरी ५५० ते ६०० क्‍विंटल आवक होत आहे.

मोसंबीचे व्यवहार सुरवातीला २५०० ते २९०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. दरात तेजी येत मोसंबीचे व्यवहार आता २८०० ते ३४०० रुपये प्रतिक्‍विंटलने होत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com