Last Update:
 
ऍग्रो प्लॅनिंग

हळद पिकाची मशागत, आंतरपिकांचे नियोजन
-
Monday, March 28, 2011 AT 12:00 AM (IST)

मागील भागामध्ये आपण हळदीच्या जाती, खत व्यवस्थापनाबाबत माहिती घेतली. आजच्या भागात आपण आंतरमशागत, आच्छादनाची गरज, आंतरपिकांच्या नियोजनाबाबत माहिती घेत आहोत.
आर. आर. चांडक

हळदीच्या दर्जेदार उत्पादनासाठी वेळोवेळी आंतरमशागत आणि कीड, रोगांचे वेळीच नियंत्रण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हळदीचे कोंब उगवणीच्या काळात तणे वाढू देऊ नयेत अन्यथा हळदीच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. वेळोवेळी आवश्‍यकतेप्रमाणे खुरपणी करून तणे काढावीत. एक ते दीड महिन्यांनी रासायनिक खतांची दुसरी मात्रा देताच झाडाच्या बाजूस हलकी कुदळणी करून पिकाला मातीची भर द्यावी. या वेळी त ंतुमुळे तुटून नवीन फूट येते, तसेच गड्ड्यांच्या भोवतालची माती भुसभुशीत झाल्याने कंदाची वाढ चांगली होते. ज्या ठिकाणी कठीण किंवा कडक जमीन झाली असेल त्या ठिकाणी झाडांची वाढ होत नाही व कंद पोसत नाहीत.

आच्छादन
हळदीच्या पिकांत हिरव्या ओल्या पाल्याचे, गवताचे आच्छादन करावे. पुढे हाच पालापाचोळा कुजून सेंद्रिय खतासारखा फायदा होतो. या आच्छादनामुळे सप्टेंबर-ऑ क्‍टोबरच्या उन्हात आजूबाजूचा भाग तापून कोवळ्या फुटव्यांना तडाखा बसत नाही व तणही वाढत नाही म्हणून आच्छादन करणे आवश्‍यक आहे.

पिकाची वाढ
हळदीची लागवड केल्यानंतर 25 ते 30 दिवसांपर्यंत उगवण होत राहते. बालपण दोन महिन्यांचे असते. पहिले पान दहा दिवसांनी निघते व दुसरे पान 10 ते 15 दिवसांत पूर्ण होते. कंदातील अन्नघटकांवर सुरवातीस हळदीचे रोप जगत असते. त्यानंतर जेव्हा साल सुटते, तेव्हा हळदीच्या पिकास बाहेरून अन्नपुरवठा सुरू होतो. अशावेळी तिच्या पानांतील वाढ पटीत असणे आवश्‍यक आहे. म्हणून दोन ते चार पानांवरच हळदीचे बालपण संपते. कंदातून हळदीच्या पिकास दहा पाने तयार होईपर्यंत अन्नपुरवठा होत असतो. लावलेल्या कंदाच्या ठिकाणावरून जमिनीच्या खालच्या भागातून एक ते दीड महिन्यांनी फुटवे येण्यास सुरवात होते. नंतर दहा ते 12 दिवसांत दुसरी फूट येते. अशा दहा ते 12 फुटी आल्याच पाहिजेत, त्यामुळे जमिनीतील वाढणाऱ्या कंदामध्ये वाढ होत जाते.
सुरवातीच्या काळात झाडांची उंची 35 ते 37.5 सें.मी. पर्यंत असते. त्यानंतर 90 ते 120 सें.मी. पर्यंत वाढ होत असते. सर्वसाधारण पानांची लांबी 55 सें.मी. व रुंदी 17 सें.मी. असते व देठाची लांबी 30 सें.मी. व घेर चार सें.मी. असतो. लागवडीनंतर सहा ते सात महिन्यांनी हळदीला फुलांचे कोंब येऊ लागतात. आठ ते नऊ महिन्यांत हळदीची पाने पिवळी पडल्यानंतर पीक काढणीस तयार होते.

- 9423691336
(लेखक बीड येथे कृषी विभागात जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक म्हणून कार्यत आहेत.)

आंतरपिकांचे नियोजन
हळदीच्या पिकास सावली मानवते, त्यामुळे महाराष्ट्रात व आंध्र प्रदेशात हळदीमध्ये अनेक आंतरपिके घेतात. हळदीचे पीक सुमारे साडे आठ ते नऊ महिन्यांचे आहे. सुरवातीला त्या पिकाची वाढ हळूहळू होते. त्याचा फायदा हळदीच्या पिकात मका, मिरची, भेंडी ही आंतरपिके घेण्यासाठी घेतात. जून महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात हळद व मका या दोन्ही पिकांची एकाच वेळी लागवड करतात. हळदीचे बेणे 30 सें.मी. 15 सें.मी. अंतरावर लावतात. दुसऱ्या सरीमध्ये मक्‍याचे बी टोकून लावतात, मात्र दोन ओळींत दोन फूट ते तीन फूट अंतर ठेवतात म्हणजेच मक्‍याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या ओळींत मक्‍याचे बी पेरतात. या दोन्ही पिकांत स्पर्धा फारच कमी असते, त्यामुळे दोन्हीही पिके चांगली येतात. आंध्र प्रदेशातील तेलंगणा भागात हळदीमध्ये मक्‍याचे आंतरपीक घेतात. परंतु चार महिन्यांपर्यंत मका पिकाच्या आंतर पिकामुळे हळदीच्या पिकावर पानावरील ठिपक्‍याचा रोग येत असल्याचे आढळले आहे, त्यामुळे कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ञांनी केलेल्या शिफारशीनुसारच आंतरपिकांचे नियोजन करावे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: