Last Update:
 
ऍग्रो गाईड

कुक्कुटपालन व्यवसाय करायचा आहे, सविस्तर मार्गदर्शन हवे.
-
Thursday, June 23, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: agrowon
कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करताना प्रथम लेअर म्हणजे अंडी देणाऱ्या पक्ष्यांचे फार्म सुरू करावयाचे आहे, की ब्रॉयलर म्हणजे मांसल पक्ष्यांचे फार्म सुरू करावयाचे आहे हे ठरवावे. आपण फार्म सुरू करू इच्छित असलेली जागा, तेथून बाजारपेठेचे अंतर, त्या परिसरातील इतर फार्म्स, त्यांची संख्या व प्रकार, अशा अनेक गोष्टींचा विचार करावा. त्यानंतर व्यावसायिक कुक्कुटपालनासाठी आवश्‍यक असलेली एक दिवसाची पिल्ले, खाद्य, लस, औषधे, बाजारपेठ इ. गोष्टींची उपलब्धता त्या ठिकाणी असणे गरजेचे आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायासंदर्भात मूलभूत माहिती व प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापनातील बारकावे व निव्वळ व्यावसायिक निकषांवर लक्ष ठेवून कुक्कुटपालन केले तर हा व्यवसाय चांगल्या प्रकारे यशस्वी करता येईल. शहरी व ग्रामीण भागात ब्रॉयलर कोंबड्यांना वाढती मागणी आहे. मांसासाठी कुक्कुटपालन करणे सोपे व फायदेशीर ठरते. मांसल पक्ष्यांचे संगोपन निरनिराळ्या पद्धतीने केले जाते. पारंपरिक आणि प्रचलित अशी गादीपद्धत व्यवस्थापनास सोपी, तसेच आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि लोकप्रिय आहे. भाताचे तूस, लाकडाचा भुसा, शेंगांची टरफले, वाळलेले गवत किंवा वाळू यांची गादी माध्यम म्हणून जमीन आच्छादित करण्यासाठी वापर केला जातो. या पद्धतीत प्रत्येक पक्षाला एक चौरस फूट इतकी जागा देऊन वाढविले जाते. रोगप्रसार टाळण्यासाठी मात्र गादी वेळोवेळी कोरडी ठेवून, तिची निगा राखणे महत्त्वाचे आहे.
कोंबड्यांच्या शेडसाठी जागा निवडताना दळणवळणाच्या सोयी, स्वच्छ पाण्याचा नियमित व मुबलक पुरवठा, विजेचा विनाखंडित पुरवठा, तसेच वर्षभर बाजारपेठेची व मजुरांची उपलब्धता असावी. घरामध्ये हवा खेळती राहण्यासाठी घराची रुंदी 25 फुटांपेक्षा जास्त नसावी. मात्र पक्ष्यांची संख्या आणि जमिनीच्या रचनेनुसार घराची लांबी कशी जास्त ठेवता येते. घर बांधताना जमिनीपासून तीन ते चार फूट खोल भक्कम दगडी बांधकाम केलेले फाउंडेशन करणे गरजेचे असते. घराची जमीन सभोवतालच्या जमिनीपेक्षा उंचावर ठेवण्यासाठी एक ते दोन फुटांचा ओटा किंवा प्लॅटफॉर्म तयार करावा. घराची जमीन कॉंक्रिटची अथवा फरशी पक्की बसविलेली असल्यास घरामध्ये उंदरांचा शिरकाव होत नाही. घराची भिंत बांधताना घराच्या जमिनीवर एक फुटांचे विटांचे बांधकाम करून त्याच्यावर छतापर्यंत जाळी बसवावी. रुंदीकडील बाजू मात्र पूर्णपणे बंदिस्त ठेवावी. घराच्या बाजूची उंची सात ते आठ फूट, तर मध्य भागाची उंची 10 ते 12 फूट ठेवावी. त्यामुळे छताला उतार निर्माण होतो. ऍसबेसटॉस अथवा प्लॅस्टिकच्या पत्र्याची छते उत्तम असतात. ऊन व पावसापासून पक्ष्यांचे संरक्षण होते. पायऱ्या आणि घर यांच्यामध्ये साधारण एक फुटांचे अंतर ठेवावे. घराच्या प्रवेशद्वारात जंतुनाशक पाण्याचे कुंड तयार करावे, म्हणजे त्या पाण्यात पाय बुडवून मगच शेडमध्ये प्रवेश करणे फायद्याचे ठरते. कुक्कुटपालनासंबंधी तांत्रिक मार्गदर्शनासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
ः 022 - 24131180, 24137030, विस्तार क्र. 136
मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई
प्रतिक्रिया
On 23/08/2013 07:03 PM maruti j rane said:
दिलेली माहिती चागली आहे परतू मला आणखी मार्गादाराशानाची गरज आहे


 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: