पुढील वर्षासाठी मिरची, हरभऱ्याचे अंदाज
डॉ. अरुण प्र. कुलकर्णी
Friday, November 11, 2011 AT 03:00 AM (IST)
या वर्षी व्यापाऱ्यांच्या मते मिरचीचे उत्पादन वाढणार आहे. ही वाढ विशेषतः आंध्र प्रदेशात 30 टक्क्यांपेक्षा अधिक असेल. सध्या मिरचीचा पुरवठा गेल्या वर्षीच्या साठ्यातून होत आहे. त्यामुळे स्पॉट किमती फ्युचर्स किमतीपेक्षा अधिक आहेत. जेव्हा नवीन उत्पादन बाजारात येईल तेव्हा किमती कमी होतील. त्यांचे प्रतिबिंब फ्युचर्स किमतीमध्ये दिसत आहे.
मिरचीच्या डिसेंबर 2011 साठीच्या फ्युचर्स किमती बघितल्या (आलेख 1) तर दिसते, की या महिन्यात (ऑक्टोबर- नोव्हेंबर 2011) किमती 17 ऑक्टोबरपर्यंत 8200 रुपयांच्या आसपास होत्या. त्यानंतर त्या घसरत आहेत. सध्या (8 नोव्हेंबर) 7550 रुपयांच्या नजीक आहेत. फ्युचर्सपेक्षा स्पॉट किमती जवळ जवळ 850 रुपयांनी अधिक आहेत. हा फरक प्रथम कमी होत होता. तो जवळ जवळ 650 रुपयांपर्यंत घसरला होता. आता तो परत वाढला आहे. या वर्षी व्यापाऱ्यांच्या मते मिरचीचे उत्पादन वाढणार आहे. ही वाढ विशेषतः आंध्र प्रदेशात 30 टक्क्यांपेक्षा अधिक असेल. काहींच्या मते बऱ्याच शेतकऱ्यांनी या वर्षी भाताखालील क्षेत्र कमी केले आहे व ते मिरचीसाठी वापरले आहे. सध्या मिरचीचा पुरवठा गेल्या वर्षीच्या साठ्यातून होत आहे. त्यामुळे स्पॉट किमती फ्युचर्स किमतीपेक्षा अधिक आहेत. जेव्हा नवीन उत्पादन बाजारात येईल तेव्हा किमती कमी होतील. त्यांचे प्रतिबिंब फ्युचर्स किमतीमध्ये दिसत आहे.
या वर्षी मागणीत फार वाढ अपेक्षित नाही. निर्यात मागणीसुद्धा काहीशी स्थिर असेल. त्यामुळे पुढील वर्षी किमती वाढण्याचा संभव आता तरी कमी आहे. ज्या शेतकऱ्यांना हंगामात आपला माल विकायचा असेल त्यांनी लवकरात लवकर त्यातल्या त्यात योग्य किंमत मिळाली की आपल्या मालाचे हेजिंग करणे हिताचे ठरेल.
गेला सप्ताहात (1 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर 2011) मिरची सहा टक्क्यांनी घसरली. त्याशिवाय कपाशी (तीन टक्के), बटाटा (तीन टक्के) व गूळ (एक टक्का) घसरले. गहू व साखर अनुक्रमे तीन व दोन टक्क्यांनी वाढले. याची माहिती आलेखात दिलेली आहे.
हरभऱ्याची बाजारपेठ ः
हरभऱ्याच्या किमती अधिक उत्पादनाच्या अपेक्षेने घसरत आहेत. त्या फार घसरू नयेत म्हणून शासनाने आधार किमतीत 33 टक्क्यांची वाढ करून त्या 2800 रुपये जाहीर केल्या आहेत. ही वाढ गव्हापेक्षा अधिक असल्याने काही शेतकरी आपले गव्हाखालील क्षेत्र कमी करून तेथे हरभरा लावतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. कडधान्याची या वर्षी आवक कमी होण्याची शक्यता आहे. आपण ही आवक मुख्यत्वे ऑस्ट्रेलिया व कॅनडा येथून करतो. ऑस्ट्रेलियामधील वाढती स्थानिक मागणी व कॅनडामधील या वर्षीचे कमी उत्पादन यामुळे ही आयात अधिक किमतीने करावी लागेल. यामुळे हरभऱ्याचे भाव फार मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता नाही. हेजिंग करण्यासाठी काही वेळ थांबणे श्रेयस्कर ठरेल.