Last Update:
 
मुख्य पान

खते भडकली
-
Friday, January 20, 2012 AT 02:30 AM (IST)
Tags: seeds,   rate,   market,   agriculture
शैलेंद्र चव्हाण
जळगाव : केंद्र सरकारने रासायनिक खतांवरील अनुदानाची किंमत निश्‍चित केल्याने खुल्या बाजारातील किमती नियंत्रणमुक्त केल्या. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार किंमत ठरविण्याचा अधिकार खत उत्पादक तसेच पुरवठादार कंपन्यांना देण्यात आले. परिणामी, हा निर्णय झाल्यापासून अवघ्या 11 महिन्यांत युरियावगळता जवळपास सर्वच ग्रेडच्या खतांच्या किमती दुपटीहून अधिक वाढल्या आहेत. अर्थात, एवढे होऊनही कुठे "ऑन'ने, तर कुठे "लिंकिंग'च्या माध्यमातून विक्री सुरूच आहे. अनेक विक्रेते जुन्या किमतीत घेतलेली खते नवीन वाढीव किंमतीत विकण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

राज्यात यंदा खरिपापाठोपाठ रब्बी हंगामावरही संक्रांत ओढवली आहे. उत्पादनघटीने अगोदरच बेजार झालेल्या शेतीमालाला योग्य बाजारभाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे; परंतु याचे रासायनिक खत कंपन्यांना कोणतेही सोयरसुतक नाही, त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारातील खत किंमतवाढीच्या नावाखाली खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. केंद्राने फेब्रुवारी 2011 मध्ये खत किंमत नियंत्रणमुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला, त्यानंतर किंमतवाढीचा दर कायम चढताच राहिला.

गेल्या वर्षी युरियाची किंमत 279 रुपये होती, ती जानेवारीच्या मध्यानंतर 281 रुपयांवर स्थिरावली आहे. युरिया या एकमेव खताच्या किमतीत अवघ्या दोन रुपयांनी वाढ झाली आहे; परंतु युरियाची वाहतूक, हमालीचा खर्च अशा विविध कारणांमुळे अनेक किरकोळ विक्रेते युरियाचीदेखील 320 ते 325 रुपयांपर्यंत विक्री करतात. 20:20:0, 20:20:0:13, 10:26:26, 12:32:16 ही खते घेण्यासाठी गेल्यावर्षीपेक्षा यंदा दुप्पट दाम मोजावा लागत आहे. म्युरेट ऑफ पोटॅश व 15:15:15 या मागणी असलेल्या खतांसाठी तर हा दाम तिपटीवर पोचला आहे. खतांच्या किमतीबाबतचा तपशील लहान आकारमानात छापलेला असतो, हा तपशील मोठ्या अक्षरांत व ठळकपणे दिसेल असा छापल्यास मूळ किंमत शेतकऱ्यांना स्पष्ट दिसेल, अशी सूचना एका खत विक्रेत्याने "ऍग्रोवन'शी बोलताना दिली.

"लिंकिंग'च्या विक्रीत केंद्राच्या अंगीकृत कंपनीचाही सहभाग
यंदा रब्बीतील गहू व हरभऱ्याचे लागवड क्षेत्र घटले असल्याने खतांची मागणी कमी झाली आहे; परंतु बारमाही बागायती व फळपिकांसाठी काही प्रमाणात मागणी कायम आहे. मागणी कमी झालेली असतानाही राज्यातील बागायती पट्ट्यात कही ठिकाणी पोटॅशचीही "ऑन'ने विक्री सुरू आहे. केंद्र सरकारचाच अंगीकृत भाग असलेल्या एका कंपनीने त्यांच्या 15:15:15 साठी उघडपणे विद्राव्य खताची "लिंकिंग' केली. हा प्रकार नोव्हेंबर 2011 पर्यंत सुरू होता. त्यानंतर मागणी कमी झाल्याने ते थांबले; परंतु अद्यापही काही विक्रेत्यांकडे या साखळीतील खत शिल्लक असल्याने अधूनमधून त्याची मागणी आल्यास "लिंकिंग'नेच विक्री केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. 24:24:0 व 10:26:26 मध्येही दोन खासगी कंपन्यांनी विद्राव्य खताची लिंकिंग केली होती, त्याचे परिणाम अजूनही दिसत आहेत. थोडक्‍यात, एवढ्या किमती वाढूनही कंपन्यांची नफेखोरीची हाव कमी झालेली नाही, अशीच चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे.

"डीएपी'ची 11 महिन्यांत 12 वेळा झाली दरवाढ
डाय - अमोनिअम फॉस्फेट (डीएपी) या रासायनिक खताची मागणी व वापरही मोठा आहे. हे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठा मर्यादित असल्याने त्याच्या दरात सरळ वाढच होत गेली, असा खत कंपन्यांचा दावा आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी 2011 मध्ये 485 रु. किमतीत विकल्या गेलेल्या "डीएपी'ने खतातील दरवाढीचा तसेच किमतीचा उच्चांक कायम केला. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येत असलेल्या डीएपीच्या नवीन रॅकमधील खताची प्रति गोणी किंमत कंपन्यांनिहाय 1015 ते 1057 रुपयांपर्यंत वाढली आहे. 11 महिन्यांत डीएपीमध्ये आतापर्यंत किमान 12 वेळा दरवाढ झाली.

खतांच्या किमती : वाढता वाढता वाढे
खताची ग्रेड फेब्रुवारी 2011 डिसेंबर 11 16 जानेवारी 2012
20:20:0:13 340 680 750
युरिया 279 281 281
अमोनिअम सल्फेट 378 410 429
20:20:0 310 650 732
कॅन -- 800 850
10:26:26 374 710 840
12:32:16 434 760 863
डीएपी 485 890 1015 (1057)
15:15:15 266 580 610
पोटॅश 265 590 594

टीप : केंद्राने रासायनिक खत नियंत्रणमुक्त करण्याचा निर्णय घेतला त्या वेळी प्रति गोणीप्रमाणे फेब्रुवारी 2011 मधील किमती, डिसेंबर 2011 मधील किमती व 16 जानेवारी 2012 च्या किमती दिल्या आहेत. कंपन्यांनुसार किंमत थोडीफार कमी - जास्त राहील.


 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: