धानाचे क्षेत्र उसाखाली वळते
विनोद वाघमारे
Thursday, January 26, 2012 AT 01:45 AM (IST)
पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी पाहिलेली सारीच सुखस्वप्ने पडेल आधारभूत भावामुळे धुतली गेली. कितीही ओरड केली तरी सरकारदरबारी या मागास जिल्ह्यांचा आवाजच पोचत नाही. अशातही शेतकऱ्यांनी आशा मात्र सोडली नाही. चिखल तुडविण्याची शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढली आणि धानाला फाटा देत शेतकरी ऊस पिकाकडे वळला आहे. जैतपूर गावातील शेतकऱ्यांनी तर धान शेतीला चक्क लेखी नकार दिला आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेला हा "उसाचा उठाव' निदान इडापीडा घालवेल, अशी आशा ते बाळगून आहेत.
नागपूर : निसर्गाचा लहरीपणा, त्यात सिंचनाची सोय नाही, हमीभावाची टांगती तलवार, भेसळयुक्त बियाणे, सावकारी पाश आणि वाढलेले मजुरीचे दर, त्यात सरतेशेवटी मालाला भाव नाही. यात धान उत्पादकांचे बजेट कोलमडल्याने तांदळाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांनी उसाची कास धरली आहे. धानाखालील क्षेत्र उसाखाली वळते केले जात असून, येत्या काळात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ अपेक्षित आहे.
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्याच्या काही भागाची ओळख धानपट्टा म्हणून आहे. बाजारात धान घेऊन गेल्यास उत्पादन खर्चाच्या आधारावर भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी ओरड सुरू केली, की मदतीच्या नावाने चार तुकडे फेकले जातात. यंदाही क्विंटलमागे 1500 रुपये भाववाढीची मागणी असताना सरकारने एकरी 700 रुपये जाहीर केले आहेत. त्यातही 25 टक्के नुकसानीची अट लादण्यात आल्याने या मदतीविषयी शेतकरी साशंक आहे. यावर उपाय म्हणून भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यांतील काही शेतकऱ्यांनी ऊस लागवडीचा पर्याय स्वीकारला आहे.
भंडारा जिल्ह्यात 2011-12 मध्ये 4579 हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड करण्यात आली आहे. एकट्या लाखांदूर तालुक्यात दोन हजार हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे. यात आणखी एक हजार हेक्टर क्षेत्राची वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात जवळपास 700 हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्यांमुळे कुप्रसिद्ध झालेल्या वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, महागाव, आर्णी व पुसद तालुक्यात उसाची लागवड केली जात आहे. या दोन्ही जिल्ह्यांत जवळपास सात हजार हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर लागवड होणे अपेक्षित आहे.
आज सद्य:स्थितीत विदर्भात 22 साखर कारखाने अस्तित्वात आहेत; मात्र त्यातील आजारी कारखान्यांची संख्या अधिक आहे. अनेक कारखान्यांचे कर्ज थकीत झाल्याने सहकारी बॅंकेने त्यांची विक्री केली आहे. पण, उसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता काही कारखान्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. कधीकाळी ऊस मिळत नाही म्हणून अवसायनात निघालेल्या एकट्या भंडारा जिल्ह्यात देव्हाडा येथे 1250 मेट्रिक टन गाळप क्षमतेचा वैनगंगा साखर कारखाना असतानाच दुसऱ्याचे काम सुरू आहे. वर्धा जिल्ह्यातील जामणी येथे महात्मा शुगर ऍण्ड पॉवर लि. कारखाना सुरू आहे. त्याची गाळप क्षमता 1859 मेट्रिक टन आहे. नागपूर जिल्ह्यात बेला येथे 2500 मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला पूर्ती पॉवर ऍण्ड शुगर कारखाना आहे. यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना व उमरखेड तालुक्यातील पोफाळी वसंत सहकारी साखर कारखाना सुरू आहे. या दोन्ही कारखान्यांची गाळप क्षमता 2500 मेट्रिक टन आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात उकळी येथे शारंगधर शुगर मिल्स सुरू आहे. या कारखान्याचे परिवर्तन करून सध्या त्यात गुळाची पावडर तयार करण्यात येत आहे.
एक उदाहरण असेही...
उत्पादन कमी, त्या तुलनेत खर्च जास्त, किमतीही कमी यामुळे शेतात धानासाठी लावलेला उत्पादन खर्च निघेनासा झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणाचे जीवन जगावे लागत आहे. शेती आता परवडण्यासारखी नाही, त्यामुळे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथील शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी हंगामातील धानाचे पीक घेण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात हरितक्रांती पाणी वापर संस्था जैतपूरने आमसभा आयोजित केली होती. यात 90 टक्के शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात धान लागवड करण्यास नकार दिला. यासंबंधीचे निवेदन शेतकऱ्यांनी इटियाडोह पाटबंधारे विभाग शाखा अभियंता, उपविभागीय अधिकारी इटियाडोह पाटबंधारे विभाग अर्जुनी मोरगाव यांना दिले आहे.
मक्तेदारी थांबवा...
इतर पिकांच्या तुलनेत उसातून मिळणारा नफा अधिक असल्याने लागवड क्षेत्रात वर्षागणिक वाढ होणार आहे; मात्र कारखानदारांची मक्तेदारी मोडीत काढण्याची आवश्यकता आहे. कारण यंदा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी पूर्ती कारखान्याने 1800 रुपयांचा भाव देण्याचे जाहीर केले
होते; मात्र प्रत्यक्षात 1500 रुपयांचा भाव दिला जात आहे. यापूर्वी 2007 ते 2008 दरम्यान कारखानदारांच्या अडेलतट्टू धोरणामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना उभे पीक पेटवून द्यावे लागले होते.
विदर्भातील बंद कारखाने
नागपूर जिल्हा
1) श्रीराम सहकारी साखर कारखाना (मौदा)
2) राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना (सावनेर)
3) वसंतराव सहकारी साखर कारखाना (नरखेड)
अमरावती जिल्हा
ं1) अंबादेवी सहकारी साखर कारखाना (अंजनगाव)
2) देवगाव साखर कारखाना (धामणगाव रेल्वे)
3) कोंडेश्वर सहकारी (फुबगाव, नांदगाव खंडेश्वर)
वर्धा जिल्हा
1) स्व. सहकार महर्षी बापूरावजी देशमुख सहकारी साखर कारखाना
यवतमाळ जिल्हा
1) जयकिसान सहकारी बोदेगाव, दारव्हा
2) शंकर सहकारी साखर कारखाना, मंगरूळ, ता. आर्णी
अकोला जिल्हा
1) अकोला सहकारी साखर कारखाना (विजोरा, बार्शीटाकळी)
बुलडाणा जिल्हा
1) जिजामाता शुगर कारखाना (दुसरबीड, ता. सिंदखेडराजा)
2) अनुराधा शुगर मिल्स (धाड, ता. चिखली)
3) वैष्णवी शुगर मिल्स (शेंदूरजणे, ता. सिंदखेडराजा)
5) शिवशक्ती आदिवासी सहकारी साखर कारखाना (नांदुरा)
वाशीम जिल्हा
1) बालाजी सहकारी साखर कारखाना (केशवनगर, रिसोड)