"ऍग्रोवन' ठरला शेतकऱ्यांचा मार्गदर्शक
-
Thursday, January 26, 2012 AT 01:45 AM (IST)
नागपूर : "दैनिक "ऍग्रोवन' हा शेतकऱ्यांची आर्थिक भूक भागविणारा मार्गदर्शक आहे. म्हणूनच विदर्भातील शेतकरी घरी येणाऱ्या चार वृत्तपत्रांपैकी सर्वांत आधी "ऍग्रोवन'चे वाचन करतो.' असे प्रतिपादन महाऑरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे यांनी केले. "विदर्भाच्या शेतीसाठी नव्या संधींचा शोध' घेणाऱ्या दैनिक "ऍग्रोवन'च्या विदर्भ विशेषांकाचे प्रकाशन बुधवारी (ता. 25) त्यांच्या हस्ते झाले. दैनिक "सकाळ'च्या शहर कार्यालयात हा कार्यक्रम झाला, त्या वेळी ते बोलत होते.
श्री. ठाकरे म्हणाले, ""भारतीय शेती 1908 पासूनच संकटात आहे. तेव्हाच प्रश्न कळला असता, तर आजची स्थिती वेगळी असती. आता कुठे यावर मंथन सुरू आहे. यात कृषी विद्यापीठांच्या बरोबरीने "ऍग्रोवन' काम करीत आहे. या अंकात येणाऱ्या यशकथा वाचून संबंधितांचे दूरध्वनी आठवडाभर खणखणत असतात. असे बहुधा याच वृत्तपत्रामुळे घडते आहे. वैदर्भीय शेतकऱ्यांना नफ्या-तोट्याचे गणित जमत नाही. शेतकऱ्यांना ते कळले असते, तर विदर्भाच्या शेतीचे चित्र वेगळे असते. तरीही, आज शेतीत विविध प्रयोग होत आहेत. येणाऱ्या काही दिवसांत विदर्भात डाळिंबाची शेतीही बघायला मिळेल.''
"ऍग्रोवन'चे कार्यकारी संपादक आदिनाथ चव्हाण म्हणाले, ""विदर्भ व मराठवाड्याच्या शेतकऱ्यांत ज्ञानाची आस आहे. ही आस पश्चिम महाराष्ट्रात संपत आहे. समृद्धी आली की दुर्गतीकडे वाटचाल सुरू होते, तसे तिथे होत आहे. ऊस घेणारे बहुतांश शेतकरी आज आळशी ठरत आहेत. उसाची एकरी सरासरी 25 ते 30 टनांपर्यंत रेंगाळली आहे. चांगले प्रयत्न केले तर 60 ते 70 टनांपेक्षा जास्त ऊस घेता येतो. ऊस उत्पादक आज राज्यकर्त्यांचा मागे फिरत आहेत. प्रगत पश्चिम महाराष्ट्राचे हे चित्र आहे. त्या तुलनेत विदर्भ, मराठवाडा, खानदेशात ज्ञानाची आस वाढते आहे.''
दैनिक "सकाळ'चे कार्यकारी संपादक श्रीपाद अपराजित म्हणाले, ""ऍग्रोवन हे "व्रत' म्हणून जनमानसाने स्वीकारल्याचा अनुभव येतो आहे. विदर्भाची विधायकता सप्रमाण पुढे नेण्याचे काम "ऍग्रोवन' करतो आहे. पुढच्या पाच वर्षांत विदर्भाला सुपीकतेचा नवा आदर्श "ऍग्रोवन' घालून देईल. विदर्भाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याचे कामही "ऍग्रोवन' करतो आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे शिक्षण अधिकारी संजय करकरे हे कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. संचालन व आभार दैनिक "सकाळ'चे वितरण व्यवस्थापक मंगेश ठोसर यांनी केले.
विदर्भाच्या विकासात हातभार लावणार
केवळ कृषिवृत्त देऊन "ऍग्रोवन' थांबणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी ते लावून धरले जातील. विदर्भाच्या विकासात "ऍग्रोवन'चे योगदान यापुढे अधिक वाढेल, अशी ग्वाही "ऍग्रोवन'चे कार्यकारी संपादक आदिनाथ चव्हाण यांनी दिली.