पुणे हादरले
-
Thursday, January 26, 2012 AT 01:45 AM (IST)
माथेफिरू ड्रायव्हरमुळे आठ जण ठार; 25 जखमी
पुणे - माथेफिरू एस.टी. बस ड्रायव्हरने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकातून बस पळवून 40 गाड्यांना दिलेल्या धडकेत आठ जण ठार आणि सुमारे 25 जण गंभीर जखमी झाले. माथेफिरू ड्रायव्हरला नीलायम चित्रपटगृहाजवळील चौकात अटक करण्यात आली.
संतोष मारुती माने (वय 40, रा. हडपसर, मूळ गाव - कवठाळी, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या माथेफिरू एसटी ड्रायव्हरचे नाव आहे. पूजा पाटील (वय 14), शाम ललित शुक्ला (वय 25), अंकुश तिकोणे (वय 46), पिंकेश खंडेलवाल (वय 26), मिलिंद गायकवाड, अक्षय पिसे, शुभांगी मोरे, श्वेता ओसवाल याचा एस.टीच्या धडकेने मृत्यू झाला, तर आणखी 27 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यापैकी तीन जण अत्यवस्थ आहेत.
संतोष माने एस.टी. मंडळात 2009 मध्ये ड्रायव्हर म्हणून भरती झाला. मंगळवारी रात्री साडेसात वाजता तो एसटी घेऊन स्वारगेटला आला होता. आज सकाळी आठच्या सुमारास अचानक त्याने सातारा-पुणे-सातारा ही गाडी चालू करून बसस्थानकाच्या गेटमधून बाहेर काढून शंकरशेठ रस्त्याने उलट्या दिशेने जात सुमारे दहा गाड्यांना जोरदार धडक दिली.
उलट्या दिशेने सोलापूर बाजार चौकापर्यंत गेल्यानंतर तो पुन्हा स्वारगेटला परत येऊन सिंहगड रस्त्याने गेल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. नीलायम चित्रपटगृहाजवळील चौकात पुलाखाली काही वाहनांना दिलेल्या धडकेने एसटी बस थांबल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या सर्व घटनेत माने याने रिक्षा, कार व दुचाकींसह एकूण 40 गाड्यांना धडक दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार सुप्रिया सुळे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख आदींनी ससूनमध्ये जखमींची विचारपूस व मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. या घटनेचा फटका बसलेल्यांना योग्य उपचार व मदत करण्याची ग्वाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.