Last Update:
 
मुख्य पान

मुंबईतील घाऊक व्यापारी पाडताहेत स्वतःची नाणी!
-
Thursday, January 26, 2012 AT 01:30 AM (IST)
Tags: agrowon
मुंबई (वृत्तसंस्था) ः रिझर्व्ह बॅंकेकडून चलनात आणल्या जाणाऱ्या नाण्यांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत असल्यामुळे मुंबईच्या व्यापाऱ्यांनी स्वतःची नाणी पाडायला सुरवात केली आहे. एक आणि दोन रुपये किमतीची नाणी स्वतःचा शिक्का मारून तयार करून ती आपसांत चलनात फिरवली जात आहेत.

व्यापाऱ्यांची संघटना असणाऱ्या मांडवी - कोळीवाडा असोसिएशनने एमकेए या इंग्रजी आद्याक्षरांचे बोधचिन्ह तयार करून ते नाण्यांवर छापले आहे. आतापर्यंत या संघटनेने 50 हजार अशी नाणी भेंडीबाजार आणि मशीदबंदर येथील घाऊक बाजारपेठांतून चलनात आणली आहेत. नाण्यांच्या तुटवड्यामुळे ही नाणी या भागातील व्यापाऱ्यांनीही स्वीकारली आहेत. ही नाणी रिझर्व्ह बॅंकेच्या नाण्यांचे प्रतिरूप नसल्यामुळे ती बनावट नाहीत. केवळ चलनाचे माध्यम म्हणून या नाण्यांचा वापर करावा लागत असल्याचे या भागातील किराणा दुकानमालक असलम शेख यांनी पीटीआयला सांगितले आहे.
काळ्या बाजारात एक, दोन आणि पाच रुपयांच्या नाण्यांसाठी मूळ किमतीपेक्षा अधिक दाम द्यावा लागत आहे. हे दरदेखील कायम नसून, ते बदलत राहतात. सणासुदीच्या काळात एक रुपयाच्या 100 नाण्यांसाठी 125 रुपयेही मोजावे लागतात, असे एका व्यापाऱ्याने सांगितले. ही स्वतःची नाणी चलनात आणल्यानंतरही याविषयी कुणीही पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही.

नाण्यांचा तुटवडा
एक आणि दोन रुपयांच्या नाण्यांचा सध्या मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. काळ्या बाजारात एक रुपयाच्या 100 नाण्यांसाठी 114 रुपये मोजावे लागत आहेत. दोन रुपयांच्या 50 नाण्यांसाठी 115 रुपये भाव आहे; तर पाच रुपयांच्या 20 नाण्यांसाठी 118 रुपये हा भाव काळ्या बाजारात द्यावा लागत आहे.


 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: