तेलकट डागाच्या प्रभावी नियंत्रणासाठी झाडाची रोगप्रतिकारक्षमता वाढवा
-
Saturday, January 28, 2012 AT 01:30 AM (IST)
नाशिक (प्रतिनिधी) : डाळिंबावरील तेलकट डाग व मररोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी झाडातील रोगप्रतिकारशक्ती विकसित करावी, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कोरडवाहू फळ संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विनय सुपे यांनी केले. सटाणा येथील लाड शाखीय वाणी मंगल कार्यालयात आयोजित डाळिंब परिषदेत ते बोलत होते. कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष कुलकर्णी, शेतकरी नेते रामचंद्रबापू पाटील, माजी आमदार दिलीप बोरसे, ज्येष्ठ डाळिंब उत्पादक केदा बापू भामरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कैलास मोते, आर. बी. हर्बलचे संचालक रामदास पाटील, रोटरी क्लब बागलाणचे अध्यक्ष सुधाकर फेगडे, सटाणा तालुका कृषी अधिकारी श्री. शिंदे, देवळा तालुका कृषी अधिकारी श्री. व्यवहारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. दैनिक "ऍग्रोवन' या परिषदेचे माध्यम प्रायोजक होते. परिषदेत नाशिक, नगर व सातारा जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
डॉ. सुपे म्हणाले, की डाळिंब पीक चांगले उत्पन्न देते म्हणून उत्पादन खर्च जास्त केला पाहिजे, ही मानसिकता चुकीची आहे. गरजेपेक्षा अधिक खते व पाणी व अन्नद्रव्ये दिल्याने डाळिंब शेतीत समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यासाठी रोपवाटिकेपासून काळजी घ्यावी. जातिवंत रोपांची निवड करावी. माती परीक्षणानुसार अन्नद्रव्याचे व पाण्याचे नियोजन करावे. शिफारस केलेल्या वाणांचीच लागवड करायला हवी. उत्पादनवाढीत कॅनॉपी मॅनेजमेंट सर्वांत महत्त्वाचे असते. यात जमिनीपासून अडीच फुटापर्यंत फुटवा घेऊ नये. वाढलेल्या झाडाची फांदे व पाने सुटसुटीत असावीत. झाडाचा मध्य खुला असावा. फांद्या व पानांची अनावश्यक गर्दी टाळावी. दर्जेदार डाळिंब उत्पादनासाठी सूर्यप्रकाश, कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन हे घटक सर्वांत महत्त्वाचे आहेत. यांचा पुरेपूर उपयोग होईल अशी रचना करावी. ठिबक सिंचनातूनही गरजेपेक्षा जास्त पाणी जाणार नाही, याची काळजी घ्यावी. ठिबक सिंचन संचाचा डिस्चार्ज नियमित तपासून घ्यावा. डाळिंबाच्या गरजेनुसार किमान 17 लिटर व कमाल 22 लिटर पाणी दिले पाहिजे. असे सिंचन रोज करण्यापेक्षा एक दोन दिवसांच्या अंतराने करणे अधिक उपयुक्त ठरते.
श्री. मोते म्हणाले, की डाळिंब पिकातील व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांची नवी पिढी अधिक जागरूक बनत आहे. फर्टिगेशन, ऑटोमेशन हे परवलीचे शब्द बनले आहेत. कृषी विभागातर्फे आधुनिक तंत्रज्ञान पुरविण्याबाबत प्रयत्न करण्यात येत आहेत. डाळिंबाची छाटणी करणाऱ्या तरुणांच्या गटाला प्रशिक्षणासाठी साह्य करण्याचे विचाराधीन आहे. त्यासाठीचा खर्च शासनाच्या "आत्मा' संस्थेमार्फत करणे शक्य आहे. शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
श्री. बोरसे म्हणाले, की शास्त्रशुद्ध आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डाळिंब उत्पादकांनी प्रगती साधली आहे. कष्ट व नियोजनाने आर्थिक समृद्धी मिळवता येते, हे डाळिंब उत्पादकांनी सिद्ध केले आहे. अशिक्षित लोकांनी शेती करावी, या दृष्टिकोनामुळेच शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्याची सुशिक्षित व उच्चविद्याविभूषित मुले जाणीवपूर्वक शेतीकडे वळल्यास शेतीचे चित्र आणखी बदलेल, असे श्री. भामरे यांनी सांगितले. डॉ. हरिश्चंद्र आहेर, उस्मान शेख या डाळिंब उत्पादकांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. कुलकर्णी यांनी डाळिंबावरील कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. रामदास पाटील यांनी प्रास्ताविक केले. श्री. फेगडे यांनी आभार मानले.