धानाने मारले, उसाने तारले!
विनोद वाघमारे
Saturday, January 28, 2012 AT 01:30 AM (IST)
नागपूर : पूर्व विदर्भातील नदीच्या काठावर असलेल्या शेतात गेल्या कित्येक वर्षांपासून धानाची शेती केली जात आहे; परंतु धान पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नातून उत्पादन खर्च वजा करता शेतकऱ्याच्या हातात छदामही उरत नाही. वर्षभर संसाराचा गाडा धानातून येणाऱ्या उत्पन्नावर असल्याने प्रसंगी मोलमजुरी करावी लागणे, अशी धानपट्ट्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती झाली आहे. यावर जोखीम पत्करून अनेक शेतकरी धान पिकाकडून उसाकडे वळले आहेत. साडेतीन एकरांतील धानापेक्षा अडीच एकरांतील उसातून उत्पन्न अधिक मिळत असल्याने धानापेक्षा उसाने तारले असल्याची भावना येथील शेतकरी व्यक्त करत आहेत.
धानपट्ट्यातील शेतकऱ्यांची स्थिती पाहून भंडारा जिल्ह्याच्या पांजरा येथील युवा शेतकरी विनोद जगनाडे यांनी पीकपद्धती बदलण्याचा निर्णय घेतला. सहा एकरांपैकी अडीच एकरात ऊस लागवड केली. शेतावर विहीर असल्याने पाण्याची अडचण नव्हती. म्हणून सुकळीवरून बेणे आणून लागवड केली. पहिल्याच प्रयत्नात ऊस पिकातून एकरी 50 हजारांचे उत्पन्न मिळविले. यानंतर खोडवा घेणार असल्याने उत्पादन खर्चात कमी येणार असून नफ्यात आणखी वाढ होऊ शकते. सिंगोरी (ता. मौदा, जि. नागपूर) येथील शेतकरी दामोधर ढोबळे यांचे असे म्हणणे आहे, की बागायती शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यापुढे मजुरांची कमतरता ही मोठी समस्या आहे. त्यामुळे खर्च वाढून हाती येणारे उत्पादन अत्यल्प असते. मात्र ऊस शेतीत मजुरांची गरज कमी पडते. या पिकावर रोगांचा फारसा प्रादुर्भाव होत नसल्याने ऊस पीक फायद्याचे ठरत आहे. विदर्भातील माती उसासाठी पोषक ठरणार नाही, असा काहीसा सूर वर्षभरापूर्वी उमटला होता; परंतु नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी येथील कमलाकर मेघरे या शेतकऱ्याने उसाचे एकरी 100 टन उत्पादन घेऊन या सर्व शंकांना पूर्णविराम लावला आहे. योग्य नियोजनाच्या माध्यमातून विदर्भाच्या कुठल्याही कोपऱ्यात उसाची लागवड करणे शक्य असल्याचा संदेश त्यांनी यातून दिला आहे. माती परीक्षण करून रासायनिक खतांचा वापर केल्यास अधिकाधिक उत्पादन घेणे शक्य होते.
सिंचन प्रकल्प मार्गी लागणे गरजेचे ः
ऊस लागवडीसाठी पाण्याची उपलब्धता हा महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षांपूर्वी ऊस विदर्भाच्या मातीत बहरू शकला नाही. पण त्यावर उपाय योजून आधुनिक पद्धतीचा वापर केल्यास कमी पाण्यातही उसाची लागवड करणे शक्य झाले आहे. सरी पद्धतीत पाटाने पाणी दिले जात असल्याने अधिक पाणी लागते. त्याऐवजी ठिबकवर ऊस लागवड केल्यास 40 टक्के पाण्याची बचत होऊन उत्पादनात 20 ते 30 टक्के वाढ होते. त्यामुळे विदर्भात ठिबक सिंचनाचा पर्याय शेतकरी स्वीकारत आहेत. मात्र विदर्भातील सिंचन प्रकल्प मार्गी लावल्यास मोठ्या प्रमाणात उसाची लागवड होऊन शेतकऱ्यांची भरभराट होईल.
हा कसला न्याय?
एखाद्या शेतकऱ्याने उसाचे बेणे संबंधित कारखान्याकडून विकत घेतल्यानंतर त्याला त्याच कारखान्याला उसाची विक्री करावी लागते. ऊस लागवडीच्या दोन ते तीन दिवसांच्या आत लागवड व खोडवा विक्रीचा करारनामा संबंधित कृषी कार्यालयाला देणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्या भागातील दुसऱ्या कारखान्यात अधिक भाव मिळत असल्यासही शेतकऱ्याला त्याचा लाभ घेता येत नाही. याबरोबरच 15 टनांखाली उत्पादन असलेल्या क्षेत्राला नापिक ऊस क्षेत्र म्हणून गृहीत धरले जाते. या भागातील शेतकऱ्याला तोडणी व वाहतूक स्वत: करावी लागते. अन्यथा, या भागासाठी कारखान्याला येणारा अधिकचा खर्च बिलातून कपात केला जातो. याबरोबरच ऊस वाहतुकीसाठी शेतापर्यंत रस्ता असणे आवश्यक करण्यात आले आहे. एखाद्या वेळी उत्पादन कमी झाल्यास कारखान्याकडून शेतकऱ्याची पिळवणूकच केली जाते.
धान आणि ऊस लागवड खर्च व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील तफावत
ऊस लागवडीसाठी येणारा एकरी सरासरी खर्च ः
नांगरणी खर्च : 1500 रुपये
सरी : 500 रुपये
बेण्यासाठी ऊस : 1600 रुपये
वाहतूक भाडे : 1200 रुपये
बेणे बनविण्याचा खर्च : 800 रुपये
लागवड खर्च : 2500 रुपये
ऊस बांधणी : 2500 रुपये
फवारणी : 2000 रुपये
खते : 7000 (सेंद्रिय )
डवरणी खर्च : 1600 रुपये
विद्युत बिल : 1000 रुपये
.................................................,
एकूण खर्च : 22,200 रुपये
एकरी सरासरी उत्पन्न : 40 टन
उत्पन्नाचे मूल्य : 1500 रुपये याप्रमाणे 60 हजार रुपये
...................................................................................................
एक एकरात धान लागवडीसाठी येणारा सरासरी खर्च
बियाणे एकरी 40 किलो : 1000 रुपये
नांगरणी : 500 रुपये
एक फाळ नांगरणी : 1000 रुपये
चिखलणी : 1000 रुपये
रोवणी 15 मजूर : 1600 रुपये
पऱ्हे काढणे : 600 रुपये
खत दोन बॅगा : 1500 रुपये
निंदण : 1000 रुपये
खत दुसरी फेरी : 1000 रुपये
कीटकनाशक : 1000 रुपये
धान कापणी : 900 रुपये
धान बांधणी : 750 रुपये
कृषिपंप : 1000 रुपये
चुरणे : 1000 रुपये
...............................................................................................................
एकूण उत्पादन खर्च : 13,350 रुपये
एकरी उत्पादन : 15 क्विंटल
उत्पादनाचे मूल्य : 1100 रुपयांच्या आधारभूत किमतीनुसार 16,500 रुपयांचे उत्पन्न हाती पडते.
फोटो : शुगर 1 - भंडारा : शेतात उसाची कापणी करताना विनोद जगनाडे.
फोटो : शुगर 2 - भंडारा : ऊस लागवडीसाठी बेणे तयार करताना मजूर.
फोटो : शुगर 3। 4, 5, - सिगोरी (जि. नागपूर) : ऊस लागवडीसाठी तयार करण्यात आलेले शेत.