Last Update:
 
ऍग्रो मार्केट

गूळ, साखर, बटाट्याच्या किमतीत वाढ शक्‍य
डॉ. अरुण प्र. कुलकर्णी
Friday, February 10, 2012 AT 02:15 AM (IST)
Tags: agrowon
गुळाच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. उत्तर प्रदेशात प्रतिकूल हवामानामुळे बटाटा उत्पादन कमी होण्याची शक्‍यता निर्माण झाल्यामुळे वाढ झाली आहे. मात्र कापूस, हळद, मका, सोयाबीन याच्या किमती स्थिर आहेत.

तांबडी मिरची
या सप्ताहात मिरचीच्या किमती दोन टक्‍क्‍यांनी चढल्या. ही वाढ तात्पुरती ठरण्याची शक्‍यता आहे. आवक जशी वाढेल तशा किमती उतरतील.

गूळ
या सप्ताहात गुळाच्या किमती तीन टक्‍क्‍यांनी उतरल्या. जानेवारी महिन्यात त्या वाढत्या मागणीमुळे उंचावत होत्या. हाच कल पुढील काही दिवस राहण्याची शक्‍यता आहे.

मका
मक्‍याच्या (मार्च 2012) किमती गेल्या महिन्यात सतत घसरत होत्या. याही सप्ताहात त्या दोन टक्‍क्‍यांनी घसरल्या. स्थानिक आवक व दक्षिण अमेरिकेमधील (ब्राझील व अर्जेंटिनामध्ये) सुधारलेली परिस्थिती यामुळे ही घसरण होत आहे. पुढील सप्ताहात भाव वाढण्याची शक्‍यता कमी आहे.

साखर
साखरेच्या (मार्च 2012) किमती 12 जानेवारी ते 24 जानेवारी या दरम्यान घसरत होत्या. त्यानंतर त्या वाढत आहेत. गेल्या सप्ताहात त्या दोन टक्‍क्‍यांनी वाढल्या. साखरेचे उत्पादन या हंगामात चांगले होत आहे. निर्यातीची शक्‍यता बळावली आहे. फेब्रुवारी महिन्यातील कोटासुद्धा अपेक्षेपेक्षा कमी आहे. पुढील काही दिवस किमती वाढत राहतील, असा अंदाज आहे.

सोयाबीन
सोयाबीनमध्ये (मार्च 2012) जानेवारी महिन्यात 11 ते 12 दिवसांचे दोन चढ-उतार पाहावयास मिळाले. 7 जानेवारी रोजी किमती वाढत व नंतर कमी होत त्यांनी 18 जानेवारी रोजी पूर्वीची पातळी गाठली. त्यानंतर त्या पुन्हा चढू लागल्या. 25 जानेवारीपासून घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात त्या एक टक्‍क्‍याने वाढल्या. अर्जेंटिना व ब्राझील येथील उत्पादन कमी होण्याच्या भीतीने ही घसरण झाली आहे. -------ता. 9 रोजी------ अमेरिकन शेती खात्याचा नवीन अहवाल प्रसिद्ध होणार आहे; त्याची प्रतीक्षा आहे.

हरभरा
हरभऱ्याच्या किमती या सप्ताहात दोन टक्‍क्‍यांनी वाढल्या. शासनाच्या नवीन अंदाजानुसार या वर्षी हरभऱ्याचे उत्पादन गेल्या वर्षापेक्षा कमी होणार आहे. त्याचा हा परिणाम आहे. मात्र या महिन्यापासून आवकसुद्धा मोठ्या प्रमाणावर चालू झाली आहे. त्यामुळे किमती काही दिवसांनी घसरण्याची शक्‍यता आहे.

गहू
14 जानेवारीपासून गव्हाच्या (मार्च 2012) किमती घसरत आहेत. या सप्ताहात मात्र त्या तीन टक्‍क्‍यांनी वाढल्या. या वर्षी गव्हाचे उत्पादन चांगले होण्याची शक्‍यता आहे. पुढील महिन्यात (मार्चपासून) आवक वाढेल. त्यामुळे किमती फार दिवस वाढण्याची शक्‍यता कमी आहे.

बटाटा
बटाट्याच्या (मार्च 2012) किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या दोन टक्‍क्‍यांनी वाढल्या. उत्तर प्रदेशात प्रतिकूल हवामानामुळे तेथील उत्पादन कमी होण्याची शक्‍यता निर्माण झाल्यामुळे ही वाढ झाली. पुढील काही दिवसांत आवक वाढेल. त्याचा परिणाम किमती कमी होण्यावर होईल असा अंदाज आहे. मात्र बटाट्याची मागणी चांगली आहे. त्यामुळे एप्रिल 2012 नंतर किमती पुन्हा वाढू शकतील.

हळद
नोव्हेंबर अखेरीपासून हळदीच्या किमतीत (एप्रिल 2012) घट होत आहे. या सप्ताहात त्या दोन टक्‍क्‍यांनी वाढल्या. या वर्षी हळदीचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. या महिन्यात नवीन पिकाची आवक सुरू होत आहे. किमतीतील ही वाढ तात्पुरती असण्याची शक्‍यता आहे.

कपाशी
कपाशीच्या मार्च 2012 च्या किमती जानेवारी महिन्यात 19 तारखेपर्यंत वाढत होत्या. त्यानंतर त्या घसरत आहेत. गेल्या सप्ताहातसुद्धा त्या एक टक्‍क्‍याने कमी झाल्या. वाढत्या आवकेमुळे ही घसरण चालू आहे. पुढील सप्ताहातसुद्धा त्या कमी होण्याची शक्‍यता आहे.


 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: