Last Update:
 
मुख्य पान

गोव्यात भाजपचे कमळ फुलले; कॉंग्रेसला धोबीपछाड
- (agrowon)
Wednesday, March 07, 2012 AT 03:45 AM (IST)
Tags: panji,   goa,   bjp,   agrowon
पणजी - गोव्यातील जनतेने सुमारे सात वर्षांनंतर पुन्हा भाजपच्या हाती सत्ता देत कॉंग्रेसला धोबीपछाड दिला. 2005मध्ये मनोहर पर्रीकर सरकारमधून बाहेर पडत थेट मुख्यमंत्री बनलेल्या दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसमध्ये अनेक रथी-महारथींची जंत्री होती. मात्र मंत्र्यांचा भ्रष्टाचार, घोटाळ्यांना कंटाळलेल्या जनतेने पुन्हा एकदा श्री. पर्रीकर यांना कौल देत पारदर्शक प्रशासनास आपली पसंती दिल्याचे मंगळवारी (ता. 6) जाहीर झालेल्या निकालातून दिसून येते.

"आता नाही तर कधी नाही' अशी स्थिती गोव्यातील भाजपसमोर होती. मात्र कॉंग्रेसमधील नेत्यांचे हेवेदावे, लाथाळ्या, राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रमाणेच तृणमूल कॉंग्रेसचे रोप गोव्यात रुजवू पाहणारे डॉ. विल्फ्रेड आल्मेदा, भाजप-महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची युती, 74 अपक्ष उमेदवारांची ईर्षा आणि पाच पक्षांमध्ये विभागलेली मते यामुळे कॉंग्रेसची सारी स्वप्ने धुळीस मिळाली असल्याचे निकालातून स्पष्ट होते.

या निकालाने "दोन पानां'च्या निशाणावर लढणाऱ्या व ख्रिस्ती मतदारांचा भक्कम पाठिंबा आजवर लाभलेल्या युनायटेड गोवा डेमोक्रॅटिक पक्षाची कामगिरीही निराशाजनक राहिली आहे.

दक्षिण गोव्यात आपल्या सत्ता विस्तारू पाहणाऱ्या आलेमाव कुटुंबाला मोठा धक्का बसला असून माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव, त्यांचे बंधू ज्योकिम आलेमाव आणि कन्या वालंका आलेमाव यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कॉंग्रेसचा आणि आलेमाव बंधूंचा पराभव हा गोव्याच्या राजकारणास नवी दिशा देणारा ठरणार आहे.


 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: