Last Update:
 
ऍग्रो स्पेशल

शेवग्याने दिले शेतीत समाधान
गणेश कोरे
Saturday, March 17, 2012 AT 02:45 AM (IST)
Tags: agrowon
दीड एकरच्या शेतीत एखादा पट्टा चुनखडीयुक्त असल्याने त्याचा योग्य उपयोग करून त्यामधून चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न पुणे जिल्ह्यातील कळंब (ता. आंबेगाव) येथील शास्त्रपदवीधर शेतकरी किसन भालेराव यांनी केला आहे. चुनखडीची जास्त मात्रा असलेल्या 38 गुंठे क्षेत्रावर तीन वर्षांपूर्वी शेवग्याची लागवड त्यांनी केली. चांगल्या व्यवस्थापनातून शेंगांचे दर्जेदार उत्पादन घेत शेवगा शेती यशस्वी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

कळंब (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील किसन भालेराव हे चाळिशीतील तरुण शेतकरी. रसायनशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर काही काळ त्यांनी शिक्षकाची नोकरी केली; मात्र नोकरीत मन रमत नव्हते. नोकरीतून स्वतःसाठी कुटुंबासाठी, स्वतःच्या शेतीकडे पाहण्यासाठी वेळ मिळत नव्हता. अखेर शेतीच करायची असा कौल त्यांच्या मनाने दिला. त्याप्रमाणे नोकरी सोडून ते शेतीत उतरले. विविध पिके घेऊ लागले. शेतातील एका भागात चुनखडीचे प्रमाण जास्त असल्याने त्या ठिकाणी ऊस, कांदा आदी पिके घेण्याचा प्रयत्न करत होते; मात्र शेतालगत असलेल्या पाटाचे पाणी बंद झाल्यावर पिकांवर परिणाम होत असे. यामुळे ऐन वाढीच्या हंगामात ऊस आणि कांद्याची फुगवण योग्य प्रकारे होत नव्हती. यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने आर्थिक गणिते जुळत नव्हती. त्यातच मजूरटंचाई, कांद्याचे बेभरवशाचे दर यामुळे पैशांची शाश्‍वती नव्हती. याला पर्याय शोधत असताना "ऍग्रोवन'मध्ये शेवगा पिकासंबंधी माहिती वाचनात आली. त्यातून शेवग्याची लागवड करण्याचा विचार सुरू केला.

तीन वर्षांपूर्वी भालेराव यांनी सन 2009 मध्ये शेवगा लागवडीचा निर्णय घेतला. या वेळी कृषी पदवीधर असलेल्या मुरलीधर काकडे यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानुसार सिन्नरहून तीन हजार दोनशे रुपयांचे अर्धा किलो बियाणे आणले. शेणखताचा वापर करत पिशवीमध्ये रोपे तयार केली. त्यासाठी सुमारे सातशे रुपये खर्च आला. रोपे सव्वा महिन्याने दीड फूट उंचीची झाल्यावर ट्रॅक्‍टरने सरी पाडून दहा बाय बारा फूट अंतरावर ती लावली. रोपे लावताना खड्ड्यात आणि खोडाभोवती शेणखत, सुपर फॉस्फेटचा वापर केला. एक एकर क्षेत्रामध्ये सुमारे 350 झाडे लावली. रोपांच्या वाढीसाठी टप्प्याटप्प्याने निंबोळी पेंड वापरली. दरम्यानच्या काळात कांद्याचे आंतरपीक घेतले. एकूण व्यवस्थापनानंतर पहिल्या वर्षी शेवग्यापासून खर्च वजा जाता सुमारे 52 हजार रुपयांचा फायदा झाला, तर आंतरपीक कांद्याचे सुमारे तीस हजार रुपये झाले.

सन 2009 मधील फयान वादळाने 50 टक्के झाडे उन्मळून पडली. याठिकाणी पुन्हा रोपे तयार करून पुनर्लागवड केली. सन 2010 मध्ये 50 टक्के झाडांवरील उत्पादन मिळाल्याने अवघे 35 हजार रुपये मिळाले. यानंतर तिसऱ्या वर्षी संपूर्ण बाग पुन्हा सुरू झाली. या वेळी मात्र चांगले उत्पादन मिळाले. शेंगांची विक्री नारायणगाव तसेच मंचर येथील स्थानिक बाजारांत होते. विक्री करताना शेंगांच्या आकारानुसार तीन शेंगांची एक जुडी याप्रमाणे जुड्या करण्यात आल्या. एका जुडीला आकारमानानुसार पाच ते आठ रुपये दर मिळत आहे; तसेच काही वेळेस मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किलोवरही विक्री करण्यात आली. या वेळी दहा किलोला 200 ते 250 रुपये दर मिळाला; तर काही वेळा थेट हॉटेल व्यावसायिकांना शेंगांची विक्री केली. मंचर येथे मॉलसाठी भाजीपाला खरेदी केंद्रांची सुविधा आहे. त्यांच्याशी चर्चा करून अपेक्षित दर मिळाल्यास त्यांना मालाची विक्री करण्यात येणार आहे.

बागेचे नियोजन.
हंगाम संपल्यावर जुलैमध्ये दोन मजुरांच्या साहाय्याने झाडांची छाटणी करण्यात येते. खोडकिडा होऊ नये म्हणून कीडनाशकाचा वापर केला जातो. छाटणी झाल्यावर दर दोन महिन्यांनी झाडांचे शेंडे खोडले जातात, यामुळे जास्त फुटवे फुटतात. झाडांची उंच वाढ न होता फांद्याची वाढ होऊन जास्त शेंगा लागतात. यामुळे शेंगा काढणे सोपे जाते. झाडांच्या प्रकृतीनुसार फवारण्यांचे नियोजन केले जाते. शेवग्याला जास्त पाणी चालत नसल्याने पाणी देताना आठवड्यातून एकदा एक सरी आड पाणी देण्यात येते. मार्चमध्ये हंगाम सुरू झाल्यावर दिवसाआड शेंगांची तोडणी होते. शेंगांच्या आकारानुसार जुड्या बांधून बाजारात विक्री करण्यात येते.

भालेराव यांच्या शेवगा शेतीबाबत थोडक्‍यात -
(मागील वर्षाचा)
शेवग्याचा हंगाम ः फेब्रुवारी ते जून.
- एकरी झाडे ः 350.
- प्रति महिना तोडे ः चार
- एका तोड्याला मिळणाऱ्या शेंगा ः 2000
- एकूण जुड्या ः 650
- तीन शेंगांच्या एका जुडीची किंमत आकारमानानुसार ः 5 ते 10 रुपये.
- सरासरी किंमत ः 8 रुपये.
- एका तोड्यापासून मिळणारे उत्पन्न ः पाच हजार रुपये.
- एका हंगामात मिळणारे उत्पन्न ः एक लाख ते 80 हजार रुपये
- एका हंगामासाठीचा खर्च
- खते व कीडनाशके - 10 हजार रुपये.
- पाणी (आठवड्यातून एकदा), वीज, छाटणी, मजुरी, वाहतूक आदी 10 हजार रुपये.
- एकूण खर्च ः 20 हजार रुपये.
- निव्वळ नफा ः सुमारे 80 ते 60 हजार रुपये.
- या वर्षीच्या हंगामात उत्पादनात दीडपटीने वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे भालेराव यांनी सांगितले.
------------------
किसन चिमाजी भालेराव - 9730515691
मु. पो. कळंब, ता. आंबेगाव, जि. पुणे


 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: