Last Update:
 
ऍग्रो मार्केट

मका, सोयाबीनच्या किमती तेजीत...
डॉ. अरुण कुलकर्णी
Friday, March 30, 2012 AT 02:00 AM (IST)
Tags: agrowon
वाढत्या आवकेमुळे व शासनाच्या बदलत्या धोरणामुळे कपाशीच्या किमतीमध्ये चढ-उतार होत आहेत. पुढील सप्ताहातसुद्धा मोठ्या प्रमाणावर किमती वाढण्याची किंवा कमी होण्याची शक्‍यता कमी आहे. अमेरिकी कृषी खात्याचा सुधारित अंदाजानुसार मक्‍याच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. चीनमधून सोयाबीनची मागणी वाढत आहे, या पार्श्‍वभूमीवर सोयाबीनच्या किमती नजीकच्या भविष्यात आणखी वाढण्याचा संभव आहे.

तांबडी मिरची ः
पाच मार्च नंतर मिरचीच्या (जून 2012) फ्युचर्स किमती उतरत आहेत. या सप्ताहात मिरचीच्या किमती आणखी दोन टक्‍क्‍यांनी उतरल्या. या वर्षी देशातील उत्पादन 10 ते 12 टक्‍क्‍यांनी वाढेल असा अंदाज आहे. आवक वाढल्यामुळे भाव उतरले आहेत.
गूळ ः
दहा मार्चनंतर गुळाच्या (जुलै 2012) फ्युचर्स किमती वाढत आहेत. या सप्ताहात मात्र गुळाच्या किमती तीन टक्‍क्‍यांनी घसरल्या. यामुळे किमतीतील वाढ कमी होईल असे दिसत नाही.
कपाशी ः
कपाशीच्या एप्रिल 2012 च्या किमतीत गेल्या महिन्यात बरेच चढ-उतार होत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 0.4 टक्‍क्‍यांनी वाढल्या. वाढत्या आवकेमुळे व शासनाच्या बदलत्या धोरणामुळे हे चढ-उतार होत आहेत. पुढील सप्ताहातसुद्धा मोठ्या प्रमाणावर किमती वाढण्याची किंवा कमी होण्याची शक्‍यता कमी आहे.
मका ः
मक्‍याच्या (मे 2012) किमती गेल्या महिन्यात (1 मार्चनंतर) वाढत आहेत. या सप्ताह-अखेर त्या आणखी चार टक्‍क्‍यांनी वाढल्या. स्थानिक आवक वाढलेली आहे. पण दक्षिण अमेरिके (ब्राझील व अर्जेंटिनामध्ये)मधील उत्पादन मागील अंदाजापेक्षा कमी होईल असा अमेरिकी कृषी खात्याचा सुधारित अंदाज आहे. त्यामुळे ही भाववाढ झाली आहे.
साखर ः
साखरेच्या (मे 2012) किमती मार्च महिन्यात काही प्रमाणात घसरत होत्या. गेल्या सप्ताहात त्या एक टक्‍क्‍याने आणखी घसरल्या. साखरेचे उत्पादन या हंगामात चांगले होत आहे. जागतिक मागणी फारशी आशादायक नाही. किमतीत फार मोठी वाढ किंवा उतरण याही सप्ताहात अपेक्षित नाही. मात्र काही व्यापाऱ्यांच्या मते. उन्हाळ्यात साखरेची मागणी वाढेल व त्याचा परिणाम किमती वाढण्यावर होईल.
सोयाबीन ः
सोयाबीनच्या मे फ्युचर्स किमती फेब्रुवारीमध्ये वाढत होत्या. मार्च महिन्यातसुद्धा त्यांचा कल वाढत होता. या सप्ताहातसुद्धा त्या सहा टक्‍क्‍यांनी वाढल्या व त्यांनी रु. 3200 ची पातळी गाठली. अमेरिकी कृषी खात्याने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार या वर्षीचा साठा कमी असेल असा अंदाज व्यक्त केला. ब्राझील व अर्जेंटिनामध्ये उत्पादनात घट होईल या अंदाजाला पुष्टी दिली आहे आणि चीनची मागणी वाढती आहे. या पार्श्‍वभूमीवर सोयाबीनच्या किमती नजीकच्या भविष्यात आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.
हळद ः
मार्च महिन्यात हळदीच्या किमतीत (मे 2012) घट होत होती. या सप्ताहात त्या जरी चार टक्‍क्‍यांनी वाढलेल्या असल्या तरी ही वाढ फार काळ टिकेल असे दिसत नाही. मुख्यतः ही वाढ अपुऱ्या साठ्यामुळे झाली आहे. या वर्षी हळदीचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. जर पुढील काही दिवसांत नवीन पिकाची आवक मोठ्या प्रमाणात झाली तर किमतीत घट अपेक्षित आहे.
हरभरा ः
हरभऱ्याच्या किमती (मे 2012) मार्च महिन्यात वाढत होत्या. या सप्ताहात 24 मार्चपासून पाच टक्‍क्‍यांचे वाढीव मार्जिन लावण्याच आले आहे. त्याचा परिणाम म्हणून व वाढत्या आवकेमुळे हरभऱ्याच्या किमती या सप्ताहात दोन टक्‍क्‍यांनी उतरल्या. जर आवक वाढती राहिली तर किमती नजीकच्या भविष्यात उतरतील.
गहू ः मार्चमध्ये गव्हाच्या (मे 2012) किमती काहीशा वाढत आहेत. या सप्ताहात त्या स्थिर राहिल्या. पुढील महिन्यात (मार्च अखेरपासून) आवक वाढेल. त्यामुळे किमती वाढण्याची शक्‍यता कमी आहे.
बटाटा ः
बटाट्याच्या (मे 2012) किमती गेल्या तीन महिन्यांत वाढत होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा दहा टक्‍क्‍यांनी वाढल्या. 21 मार्च 2012 पासून दहा टक्के वाढीव मार्जिन अमलात आणला आहे. मात्र अजूनही या वर्षी उत्पादन किती होईल याविषयी एकमत नाही. यामुळे भविष्यातील किमतीविषयी अनिश्‍चितता आहे.


 
ऍग्रोवन ई-पेपर
eSakal
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: