आपणच आपला गुरू बनण्याची तयारी केली पाहिजे
-
Wednesday, April 18, 2012 AT 12:00 AM (IST)
रात्री उशिरा आलो. उठलो नव्हतो. तसा सकाळी लवकर उठतो. सातच्या आतच शेतावर हजर असतो. कधी-कधी कामानिमित्ताने बाहेर जावं लागतं. यंदा मी पंच म्हणून निवडून आलो आहे, त्यामुळे बाहेर इतरांच्या कामासाठीही जावं लागतं. लहानसहान कामासाठी लोकांची अडवणूक केली जाते. हेलपाटे मारून ते दमतात. काम नियमाने होणारं असतं. जे बरोबर आहे, त्याला बरोबर असं म्हणायचं असतं. त्यामुळे काहींच्या कामासाठी तालुक्याला पंचायत समितीत जावं लागतं. सुरवातीला राग येत होता. आता कळलं आहे. भिंतीवर डोकं आपटून भिंतीला काही फरक पडत नाही, आपलं डोकं फुटेल. अशी भावना नसलेली ही यंत्रणा आहे. हे कळायला काही काळ जावा लागला, त्यामुळे एक कळलं, इथं एकट्याचा आवाज वरपर्यंत पोचत नाही, त्यासाठी प्रथम आपण संघटित झालं पाहिजे. आपण जर संघटित झालो नाही, तर आपल्याला कोणीच विचारणार नाही. आपल्यावर अन्याय होणार, ही काळ्या दगडावरची रेषा आहे. अनुभवातून मी शहाणा होत आहे, त्यामुळे माझ्या कार्यपद्धतीत मी बदल करीत आहे. मला आलेल्या काही अनुभवांमुळे मी कधी-कधी निराश होतो. कारण ज्यांच्या भल्याचा मी विचार करीत आहे, ज्यांचं भलं व्हावं यासाठी मी वेळ आणि पदरमोड करीत आहे, काहींशी वैरही घेत आहे, असं असूनही ज्यांच्यासाठी मी काम करत आहे, त्यांचाही विरोध आहे. हा माणूस आपल्या भल्यासाठी, ज्यांच्यावर परंपरेनेच अन्याय होत आहे, त्यांच्यासाठी झगडतो आहे, हे ज्यांच्यावर अन्याय होत आहे, त्यांनाच कळत नाही. हे त्यांचं अज्ञान आहे. ही गुलामगिरी आहे. एक कळलं, गुलामांनाही त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्यावी लागते. मला आलेला अनुभव हा माझ्यापुरताच मर्यादित नाही. यापूर्वी ज्यांनी असं काम केलं, त्यांनाही असाच अनुभव आला आहे. त्यामुळे मला त्याचं फार वाईट वाटलं नाही. कारण कोणत्याही समस्येचं कारण कळावं लागतं. रोग कशामुळे होतो, याचं निदान व्हावं लागतं. रोग कशामुळे होतो हे कळलं, की त्यावर औषध शोधता येतं. त्याच रोगाचे जंतू हे त्याचं औषध असतं.
जे लोक अज्ञानी आहेत, त्यांचा होणारा विरोध हा अज्ञानापोटी आहे. त्यांना आपण काय करत आहोत हे कळत नाही. त्यामुळे येशूनेही शिळेवर चढवणाऱ्यांनाही क्षमा करा, अशी प्रार्थना केली. सगळ्याच महापुरुषांचा पराभव हे त्यांचे शत्रू करीत नाहीत, त्यांचे शिष्यच करीत असतात, असं एक वचन आहे.
मी एका लहान गावात पंचायतीत काम करतो. माझं कार्यक्षेत्र लहान आहे. तरी, ज्या समस्या सगळीकडे आहेत, त्या माझ्या लहान गावातही आहेत. जगाचं एक छोटं मॉडेल माझं गाव आहे. मी लहान आहे. म्हणून मला माघार घेता येणार नाही. याचा अर्थ रणांगणावरून पळ काढला असा होईल. मला रणांगणावरून पळून न जाता लोकांत राहून त्यांच्या गुणदोषांसह त्यांना स्वीकारावं लागणार आहे. ही गोष्ट मला जमत नव्हती. जसा माणूस आहे, तसा प्रथम स्वीकारावा लागतो. माझं काय होत होतं, जसा मला माणूस हवा आहे, हे चित्र डोळ्यांसमोर ठेवून पुढच्या माणसाकडे पाहत होतो. हा फार मोठा अडथळा होता. असं करायचं नसतं, आहे तसं स्वीकारल्याखेरीज आपल्यात बदल होत नाही. हा अनुभव प्रथम मला घरातच आला. बायकोशी मी सारखं भांडत होतो. मला माझी चूक कळली. मी बदललो. यात आमचा फायदा झाला. घरात समाधानी असेल तर माणूस समाजात कार्य करू शकतो. मला प्रथम घरात बदल घडवता आला. घरात जर बदल करता आला नसता, तर समाजात काम करण्याचा विचारही मनात आला नसता. हे सगळ्यांना जमत नाही; पण मी जर हे करू शकलो, तर सगळ्यांना जमू शकेल; पण तसा कोणी प्रयत्नच करीत नाही. प्रयत्नानेच यश मिळतं. जो यश मिळवतो, त्याच्या मागून माणसं जातात. ते अनुयायी असतात. ते आपण स्वतः कधीच विचार करीत नाहीत. कुणाच्या तरी मागून जाण्यात त्यांना सुरक्षितता वाटते. हा काही त्यांचा दोष नसला तरीही मर्यादा आहे. मर्यादा ओलांडली पाहिजे. यासाठी फार परिश्रमाचीही गरज नाही. सर्व बाजूंनी विचार करायला शिकलं पाहिजे. होय, शिकलं पाहिजे. काही गोष्टी आपोआप येत नाहीत, त्यासाठी शिकावं लागतं. त्यासाठी पहिली अट आहे. आपणच आपला गुरू बनण्याची तयारी करावी लागते. हे प्रत्येक जण करू शकतो.