साखर, सोयाबीनच्या फ्युचर्स किमती वाढण्याची शक्यता
-
Friday, April 27, 2012 AT 03:00 AM (IST)
उन्हाळ्यात साखरेची मागणी काही प्रमाणात वाढलेली आहे, त्याचा परिणाम किमती वाढण्यावर होईल. ब्राझीलमधील अपेक्षित कमी उत्पादनसुद्धा किमती वाढण्याला मदत करेल. गुळाची सध्याची मागणी स्थिर आहे, त्यामुळे या किमतीत फार मोठे चढ-उतार अपेक्षित नाहीत. या वर्षी हळदीचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. आवक आता वाढली आहे व त्यामुळे पुढील काही दिवसांत किमतीत घट अपेक्षित आहे.
डॉ. अरुण प्र. कुलकर्णी
तांबडी मिरची :
23 मार्चनंतर मिरचीच्या (जून 2012) फ्युचर्स किमती उतरत आहेत. या सप्ताहात मिरचीच्या किमती आणखी 5.4 टक्क्यांनी उतरल्या. या वर्षी देशातील उत्पादन 10 ते 12 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. या सप्ताहातील घट ही वाढत्या आवकेने व अपेक्षित अधिक उत्पादनामुळे झाली आहे. पुढील काही दिवस ही घट अशीच चालू राहील, असा अंदाज आहे.
गूळ :
23 मार्चनंतर गुळाच्या (जुलै 2012) फ्युचर्स किमती उतरत आहेत. या सप्ताहात त्या एक टक्क्याने उतरल्या. सध्या मागणी स्थिर आहे, त्यामुळे या किमतीत फार मोठे चढ-उतार अपेक्षित नाहीत.
कपाशी :
कपाशीच्या एप्रिल 2012च्या किमतीत गेल्या महिन्यात बरेच चढ-उतार आहेत. सध्याचा करार 30 एप्रिल रोजी संपेल. आता यापुढील करार फेब्रुवारी 2013 साठी असेल. या कराराच्या किमती पुढील वर्षाच्या मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतील. या वर्षी जरी उत्पादन व साठा यांच्यात मोठी वाढ दिसत असली, तरी प्राथमिक अंदाजानुसार पुढील वर्षी जागतिक उत्पादनात घट संभवते. अर्थात, हा अंदाजच आहे.
मका :
मक्याच्या (जून 2012) किमती गेल्या महिन्यात (23 मार्चनंतर) उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या पाच टक्क्यांनी घसरल्या होत्या. या सप्ताहात त्या आणखी 0.3 टक्क्यांनी घसरल्या. स्थानिक आवक वाढलेली आहे. त्याचा हा परिणाम आहे. या महिन्यातसुद्धा कल काहीसा नरम राहील. आवकेचा हंगाम संपल्यावर मात्र मक्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
साखर :
साखरेच्या (जून 2012) किमती 23 मार्चनंतर वाढत होत्या. गेल्या सप्ताहात त्या स्थिर होत्या. या सप्ताहात त्या एक टक्क्याने वाढल्या. साखरेचे उत्पादन या हंगामात चांगले होत आहे. जागतिक मागणी फारशी आशादायक नाही, त्यामुळे निर्यात किंमत फारशी किफायतशीर नाही. उन्हाळ्यात साखरेची मागणी काही प्रमाणात वाढलेली आहे. त्याचा परिणाम किमती वाढण्यावर होईल. ब्राझीलमधील अपेक्षित कमी उत्पादनसुद्धा किमती वाढण्याला मदत करेल.
सोयाबीन :
सोयाबीनच्या जून फ्युचर्स किमती 23 मार्चनंतर वाढत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 0.6 टक्क्यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या आणखी तीन टक्क्यांनी वाढल्या. शासन या वाढत्या किमतींवर लक्ष ठेवून आहे. नवीन निर्बंधांमुळे कदाचित वाढत्या किमतींवर काही प्रमाणात आळा बसेल. मात्र, पुढील वर्षासाठी तेलबियांच्या व सोयाबीनच्या आधारभूत किमतींत वाढ करण्याची शिफारस केली गेली आहे. त्यामुळे, तसेच आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे लांबवरचा कल वाढता असेल.
हळद :
23 मार्चनंतर हळदीच्या किमतींत (जून 2012) घट होत होती. गेल्या सप्ताहात त्या सहा टक्क्यांनी घसरल्या होत्या. या सप्ताहात मात्र त्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली. आवकेत तात्पुरती घट झाल्यामुळे ही वाढ झालेली आहे. या वर्षी हळदीचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. आवक आता वाढती आहे व त्यामुळे पुढील काही दिवसांत किमतीत घट अपेक्षित आहे.
हरभरा :
हरभऱ्याच्या किमती (जून 2012) 23 मार्चनंतर उतरत होत्या. गेल्या सप्ताहात त्या तीन टक्क्यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात मात्र त्या एक टक्क्याने घसरल्या. शासनाच्या नवीन अंदाजानुसार या वर्षी हरभऱ्याचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी होणार आहे. पुढील वर्षासाठी खरीप कडधान्यांच्या आधारभूत किमतींत वाढ करण्याची शिफारस केली गेली आहे. या सर्वांमुळे हरभऱ्याचा लांबवरचा कल वाढता राहील असे दिसते.
गहू :
23 मार्चनंतर गव्हाच्या (जून 2012) किमती काहीशा उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या तीन टक्क्यांनी उतरल्या होत्या. याही सप्ताहात त्या चार टक्क्यांनी उतरल्या. वाढत्या आवकेचा हा परिणाम आहे. पुढील दोन महिन्यांत आवक वाढेल आणि किमती आणखी उतरतील, असा अंदाज आहे.
बटाटा :
बटाट्याच्या (जून 2012) किमती 23 मार्चनंतर मोठ्या प्रमाणावर उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या एक टक्क्याने कमी झालेल्या होत्या. या सप्ताहात त्या आणखी चार टक्क्यांनी उतरल्या. आवकवाढीचा हा परिणाम आहे. त्याशिवाय शीतगृहांची मागणीपण कमी होत आहे. यामुळे व नवीन निर्बंधांमुळे भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे.