Last Update:
 
मुख्य पान

आघाडीत रंगणार 'बेरजेच्या राजकारणा'चा पॅटर्न
संजय मिस्कीन
Saturday, April 28, 2012 AT 12:00 AM (IST)
आघाडीसाठी राष्ट्रवादीचे "दबावतंत्र'; मात्र कॉंग्रेसचे "तोंडावर बोट'

मुंबई - राज्यातल्या सहा स्थानिक स्वराज्य संस्थांतल्या विधान परिषद निवडणुकांत कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीत पुन्हा बिघाडीचे संकेत आहेत. या निवडणुकांना आघाडीनेच सामोरे जाण्यास राष्ट्रवादी आग्रही असताना कॉंग्रेसने मात्र आघाडीच्या चर्चेकडे पाठ फिरवल्याने राष्ट्रवादीचे नेते हवालदिल झाले आहेत. त्यातच उस्मानाबाद, लातूर आणि बीड या मतदारसंघांवर दावा करण्याची राष्ट्रवादीने तयारी सुरू केल्याने कॉंग्रेसचे नेते हैराण झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या प्रस्तावित विस्तारात राष्ट्रवादीच्या वाट्याचे मंत्रिपद शिल्लक नसल्याचा दावा करत कॉंग्रेस पलटवार करण्याच्या तयारीत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहा मतदारसंघांची निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये, उस्मानाबाद- बीड- लातूर आणि परभणी- हिंगोली या दोन मतदारसंघांत कॉंग्रेसचे आमदार आहेत; तर नाशिक आणि रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथे कॉंग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार आहेत; तर अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे जगदीश गुप्ता हे विधान परिषदेत आहेत.

मात्र, या वेळी या सर्व मतदारसंघांतील परिस्थिती कमालीची बदलली आहे. उस्मानाबाद- बीड- लातूर या मतदारसंघांत राष्ट्रवादीचे मतदार अधिक असल्याने कॉंग्रेसने हा मतदारसंघ सोडण्याचा दावा राष्ट्रवादी करणार आहे. यासाठी राष्ट्रवादीने नांदेडचे सूत्र पुढे केले आहे. नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात कॉंग्रेस मतदार अधिक असल्याने राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सोडावा लागला होता. मात्र, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यास तयार नसल्याचे समजते. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे नगरपालिका, महानगरपालिकांतले नगरसेवक आणि पंचायत समितीचे सभापती यांची संख्या कॉंग्रेसपेक्षा अधिक आहे; तर वर्धा- चंद्रपूर- गडचिरोली आणि अमरावती या दोन्ही मतदारसंघांत कॉंग्रेसच्या मतदारांची संख्या राष्ट्रवादीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी कॉंग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत आहे; तर नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक किंगमेकर होणार आहेत. रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्गमध्ये कॉंग्रेसच्या पाठिंब्याशिवाय राष्ट्रवादीचा विजय अशक्‍य आहे.

या स्थितीत कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्यास मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची भीती आहे.
यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहाच्या सहा मतदारसंघांत कॉंग्रेस, राष्ट्रवादीची कसोटी लागणार आहे. त्यासाठीच आघाडी करण्याचा आग्रह राष्ट्रवादीने धरला आहे. मात्र, कॉंग्रेसने ताठर भूमिका कायम ठेवली तर राष्ट्रवादीला जिल्हा परिषदांप्रमाणे बेरजेचे राजकारण करावेच लागेल, अशी चर्चा सुरू आहे.

मंत्रिपदाचा गुंता कायम
राज्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे एक राज्यमंत्रिपद रिक्‍त असल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे; मात्र कॉंग्रेसला हा दावा मान्य नाही. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळ स्थापनेच्या वेळी कॉंग्रेसला मुख्यमंत्रिपदासह 23, तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री पदासह 20 मंत्रिपदे देण्याचे सूत्र दोन्ही पक्षांच्या केंद्रीय नेत्यांनी मान्य केले होते. त्यामुळे, सध्या राष्ट्रवादीचे मंत्रिपद शिल्लक नसल्याचा दावा कॉंग्रेस नेते करत आहेत. मंत्रिपदाच्या संख्यासूत्राचा गुंता अद्याप दोन्ही पक्षांच्या वतीने जाहीर करण्यात आलेला नसल्याने विधान परिषदेच्या आखाड्यात दबावतंत्र म्हणून हा मुद्‌दा ऐरणीवर येणार असल्याचे सूत्रांचे मत आहे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: