Last Update:
 
बाजारभाव

लग्नसराईमुळे नाशिकला कोथिंबिरीची मागणी वाढली
-
Saturday, April 28, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: market rate,   nashik
नाशिक - येथील बाजार समितीत गुरुवारी (ता. 26) कोथिंबिरीच्या 32 हजार 800 जुड्यांची आवक झाली. अक्षय तृतीया व लग्नसराईमुळे स्थानिक व जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून कोथिंबिरीला मागणी वाढली. त्यामुळे कोथिंबिरीच्या प्रति शंभर जुडीस किमान 1000, कमाल 4800 व सरासरी 3000 रुपये असे तेजीचे दर मिळाले.

नाशिक भागातील द्राक्षांचा हंगाम अखेरच्या टप्प्यात असून, आंब्यांचा हंगाम सुरू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर या भागातून प्रामुख्याने केसर, राजापुरी व गावरान आंब्यांची आवक होते; तर रत्नागिरी, अलिबाग येथून लालबाग, हापूस या वाणांची आवक होत आहे. गेल्या पंधरवड्यापासून आंब्याची आवक सुरू झाली असली, तरी आवकेत सातत्याने वाढच होत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 50 क्विंटलपासून आंब्याची आवक सुरू झाली असता 26 एप्रिलपर्यंत ती तिपटीवर पोचली. गुरुवारी (ता. 26) आंब्याची 160 क्विंटल आवक झाली. या वेळी आंब्याला प्रति क्विंटलला किमान 5000, कमाल 21,000 व सरासरी 12,000 असे दर मिळाले.

नाशिक बाजार समितीत घेवडा, लिंबू, भेंडी, काकडी, टोमॅटो, वालपापडी या शेतीमालाला चांगली मागणी वाढली आहे. घेवड्याच्या दरात या वेळी लक्षणीय वाढ झाली. आवक दहा क्विंटल अशी कमीच झाली; मात्र स्थानिक व जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेत मागणी वाढल्यामुळे घेवड्याला प्रति क्विंटलला किमान 4000, कमाल 7500 व सरासरी 6000 रुपये असे दर निघाले. नेहमीप्रमाणेच लिंबू व भेंडीची आवक कमी व मागणी जास्त अशीच स्थिती दिसून आली. लिंबाची आवक 17 क्विंटल झाली असता लिंबाला प्रति क्विंटलला किमान 2500, कमाल 4875 व सरासरी 3700 असे दर मिळाले. भेंडीची आवक तर अवघी 11 क्विंटल झाली. या स्थितीत भेंडीला किमान 2075, कमाल 3540 व सरासरी 2800 असे दर राहिले. दरम्यान, वालपापडीची आवक व मागणी या दोन्हीतही वाढ असल्याने वालपापडीचे तेजीचे दर कायम असल्याचे चित्र आहे. गुरुवारी वालपापडीची 96 क्विंटल आवक झाली. या वेळी किमान 2000, कमाल 3500 व सरासरी 2500 असे प्रति क्विंटल वालपापडीला दर निघाले. या वेळी हिरव्या मिरचीलाही विशेष उठाव होत असल्याचे चित्र आहे. या वेळी हिरव्या मिरचीची एकूण 125 क्विंटल आवक झाली असता किमान 2000, कमाल 2900 व सरासरी 2500 असे प्रति क्विंटलप्रमाणे मिरचीला दर मिळाले.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: