नाशिकला "मनसे'ची पुन्हा परीक्षा
-
Saturday, April 28, 2012 AT 12:00 AM (IST)
नाशिक - नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उमेदवारीवरून, तर शिवसेनेत पक्षात आत्मविश्वास निर्माण करण्यावरून वादविवाद अन् संघर्षाची चिन्हे आहेत; मात्र या निवडणुकीत कधी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका करायची, तर कधी त्यांचीच सत्तेसाठी मदत घ्यायची, अशी तारेवरची कसरत करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुणाच्या पारड्यात मतदान करणार हा उत्सुकतेचा विषय झाला आहे. या परिस्थितीत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात खरी चुरस होणार असली, तरी राजकीय भूमिकेवरून मनसेचीच परीक्षा होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया येत्या 30 एप्रिलपासून सुरू होत आहे. डॉ. वसंतराव पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक राष्ट्रवादीचे जयंत जाधव यांना पक्षाने उमेदवारी दिल्यावर दीड वर्षांपूर्वी ते निवडून आले होते.
यंदा उमेदवारीत बदल होणार नाही, असे मंत्री श्री. भुजबळ यांनी जाहीर केले आहे; मात्र नेमके त्यांच्या या वक्तव्यावरून पक्षातील काही नेते क्लेश काढू लागल्याने पुन्हा एकदा या पक्षात उमेदवारीवरून पक्षांतर्गत स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे 145 आणि कॉंग्रेसचे 77, असे 222 सदस्य असल्याने सध्या तरी त्यांचे पारडे जड आहे. मालेगावमध्ये "तिसरा महाज'चे 31 मतदार असून, सध्या ही आघाडी सत्तेत कॉंग्रेसबरोबर असल्याने राष्ट्रवादीचे नेते निश्चिंत आहेत.
या निवडणुकीसाठी शिवसेना दावेदार असून, सेनेमधून अजय बोरस्ते, विलास शिंदे यांसह इतरही इच्छुक आहेत. भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांची नैसर्गिक युती आहे; मात्र भाजप सध्या नाशिक महानगरपालिकेत मनसेबरोबर आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अप्रत्यक्ष सहकार्याने या महानगरपालिकेत मनसे सत्तेत आहे.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत या पक्षाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विरोधक म्हणून मतदारांनी मते दिली; मात्र त्याने सत्तेत येण्यासाठी त्याच पक्षाशी छुपी युती - आघाडी केली. शिवसेनेशी त्यांचे जमत नाही आणि कॉंग्रेस आघाडीशी उघड मैत्री करता येत नाही; अशा स्थितीत निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेत, मात्र परीक्षा "मनसे'ची अशी स्थिती आहे, त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.