Last Update:
 
मुख्य पान

निवडणुकांपेक्षा संसार, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करा - शरद पवार
-
Monday, April 30, 2012 AT 12:30 AM (IST)
Tags: sharad pawar,   election,   social,   pune
पुणे - "शेतीमालाला मिळालेल्या किमतीचा उपयोग शेतीमधील भांडवली गुंतवणुकीसाठी करत नाही, तोपर्यंत कितीही भाव मिळाला तरी उपयोग होणार नाही. शेतीमधील मिळालेला पैसा निवडणुकांमध्ये खर्च न करता संसार आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करा, तरच संसार आणि भावी पिढी टिकेल.'' असा वडीलकीचा सल्ला केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिला.

पत्रकार दत्ता सावंत लिखित "ऊस भारताचा - ब्राझीलचा' या पुस्तकाचे प्रकाशन श्री. पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. 28) झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, प्रमुख पाहुणे जलसंपदा मंत्री रामराजे नाईक निंबाळकर, नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, दै. पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, रेणुका शुगरच्या प्रमुख डॉ. विद्या मुरकुंबी, साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील, वसंतदादा साखर संस्थेचे शिवाजीराव गिरिधर पाटील, भाग्यश्री पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रेय भरणे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, साखर आयुक्त विजय सिंघल, आमदार अशोक पवार, विभागीय आयुक्‍त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी विकास देशमुख या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ""सध्या उसाच्या दरासाठी आंदोलने केली जातात. राज्यातील 12 कोटी जनतेमध्ये 35 लाखांपेक्षा कमी ऊस उत्पादक शेतकरी आहेत; मात्र यापेक्षाही जास्त ज्वारी, बाजरी, भात उत्पादक शेतकरी असताना, त्यांनी पिकविलेल्या अन्नधान्याच्या दरासाठी कोणी आवाज उठवत नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा दराची मागणी केली जाते, हे ठीक नाही. कारखाना चालविण्यासाठी सभासदांची कारखान्याप्रति असलेली निष्ठा आणि बांधिलकी कमी होत असून, खासगी मालमत्ता असल्यासारखे वागतात. पूर्वी कारखाने उभारण्यासाठी संचालक मंडळ दशम्या घेऊन घरोघर फिरून शेअर गोळा करत होते. एखाद्या शेतकऱ्याकडे पैसे नसताना त्याची पत्नी गळ्यातील दागिना देऊन सभासद झाले. त्यांच्या कष्टाने उभे राहिलेले कारखाने फक्त निवडणुकांचे अड्डे बनले आहेत. निवडणुकांसाठी गरज नसताना कारखान्यात अतिरिक्त कर्मचारी भरती केली जाते. माणसं सांभाळताना अडचणींचे व्यवहार करून बसतात, यामुळे कारखाने आजारी होऊन बंद पडतात. हे टाळण्यासाठी कमी कर्मचारी, गाळप क्षमता वाढविणे आणि पारदर्शी व्यवहारांकडे संचालक मंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे.''

हर्षवर्धन पाटील म्हणाले, ""भारतातील साखर उद्योगातील तंत्रज्ञानाच्या अभावामुळे ब्राझील देशाच्या साखर उद्योगाच्या तुलनेत आपण शंभर वर्षांनी मागे आहोत. आपण उसाच्या दराच्या पलीकडे विचार करत नसल्याने साखर उद्योग अडचणीत येत आहे. साखर उद्योगात अधिकाधिक यांत्रिकीकरणाची गरज असून, विविध विभागांत उच्चशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. या उद्योगाला प्रमुख उद्योग म्हणून पाहण्याची गरज आहे.''

डॉ. विद्या मुरकुंबी म्हणाल्या, ""ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगासमोर निर्यातीचा मोठा अडसर असल्याने उसाला चांगला दर येत नाही. दरवर्षी ऊसदराचा प्रश्‍न उभा राहतो. ऊस आणि साखरेच्या दरासाठी ब्राझीलच्या धर्तीवर कमिटी आणि विद्यापीठ स्थापण्याची गरज आहे. भारतातील साखर उद्योग बळकट करण्यासाठी ब्राझीलचे तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे आहे.''

लेखक दत्ता सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक हनुमंत सावंत यांनी केले. सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले, तर आभार किशोर तावरे यांनी मानले.

या पुढे ऊसप्रश्‍नात पडायचे नाही!
""गेली 45 वर्षे साखर आणि उसाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्य दिले; मात्र काही दिवसांपूर्वी माझ्या घरासमोर आंदोलन केल्यामुळे आता ऊस आणि साखरप्रश्‍नात आपण पडायचे नाही, असे आपण ठरविले आहे. शुगर डेव्हलपमेंट फंडाची 18 महिने बैठक झाली नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. अशी वेळ मी ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी असताना आली नव्हती. आपण या प्रश्‍नात लक्ष घालणार नाही.''
- शरद पवार, केंद्रीय कृषिमंत्री


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: