Last Update:
 
ऍग्रो गाईड

अंजीर लागवडीविषयी माहिती द्यावी.
-
Friday, May 04, 2012 AT 03:30 AM (IST)
Tags: agro guide

गणेश शेळके, सोलापूर,
शीतल पाटील, अणदूर, उस्मानाबाद


अंजीर लागवडीसाठी हलकी ते मध्यम, तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. अंजिरास सुपीक, पाण्याचा निचरा होणारी जमीनसुद्धा मानवते. अंजीर पिकास कोरडे हवामान मानवते. हवेमध्ये जास्त आर्द्रता वाढल्यास अंजीर पानांवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो. अंजीर फळे पिकण्याच्या कालावधीमध्ये उष्ण तापमानाची गरज लागते. लागवडीपूर्वी जमिनीची उभी - आडवी चांगली नांगरट करून घ्यावी. त्यानंतर कुळवाच्या दोन - तीन पाळ्या देऊन तणे, मागील पिकाचे अवशेष वेचून जाळून टाकावेत. लागवड 4.5 x 3 मी. अंतरावर करावी. लागवडीसाठी मे महिन्यामध्ये 2 x 2 x 2 फूट आकाराचे खड्डे खोदावेत. खड्डा उन्हामध्ये चांगला तापू द्यावा. नंतर खड्डे भरण्यासाठी खड्ड्यांच्या तळाला पालापाचोळा टाकावा, चांगली माती व शेणखत अथवा कंपोस्ट खत दोन्ही 1:1 प्रमाणात घेऊन त्यामध्ये एक किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून या मिश्रणाने हा खड्डा भरून घ्यावा. जून-जुलै महिन्यांमधे दोन-तीन पाऊस झाल्यानंतर खड्ड्यांमध्ये रोपांची लागवड करावी.

जाती
1) पूना अंजीर - या जातीच्या अंजिराच्या फळांचा रंग गडद किरमिजी लाल असतो. फळाचे सरासरी वजन 30 ते 60 ग्रॅमपर्यंत असते. फळामध्ये 18 ते 20 ब्रिक्‍सपर्यंत साखर असते. पाच वर्षांच्या झाडापासून सरासरी 25 ते 30 किलो फळांचे उत्पादन मिळते.
2) दिनकर - ही जात पूना अंजीर या जातीमधून निवड पद्धतीने निवडलेली असून, या जातीची फळे किरमिजी लाल रंगाची असतात. फळाचे सरासरी वजन 40 ते 70 ग्रॅमपर्यंत असते. फळांमध्ये साखरेचे प्रमाण 18 ते 20 ब्रिक्‍सपर्यंत असते. पाच वर्षे वयाच्या झाडापासून 25 ते 30 किलोपर्यंत उत्पादन मिळते.

संपर्क
1) 02426 - 243247
कोरडवाहू फळ संशोधन प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
2) 02452 - 229000
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

कांदा बीजोत्पादनाबाबत तांत्रिक मार्गदर्शन कोठे मिळेल?
प्रतीक कडू, कवठा, जि. अमरावती
कांदा लागवड आणि बीजोत्पादनाबाबत तांत्रिक माहितीसाठी आपण राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, जि. पुणे (दूरध्वनी क्र. - 02135 - 222026) किंवा कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (0724 - 2259262) यांच्याकडे संपर्क साधावा.


 


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: