कामावर निष्ठा असेल तर यश लांब नाही
-
Saturday, May 05, 2012 AT 03:15 AM (IST)
अंगणवाडी ताई घरोघर जाते. आरोग्याची काळजी घेते. तिला काही प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे. गावातील काही मुले कुपोषित आहेत. याचे कारण त्यांची आईच्या पोटातच चांगली वाढ झाली नाही. याचे कारण आईलाच गरोदरपणात सकस आहार मिळत नाही. त्यामुळे बाळाची वाढ निकोप व निरोगी होत नाही. अलीकडे गरोदर माता बालकांसाठी सरकारी कार्यक्रम आहे. त्याची मदत मिळते. मिळणारी मदत अनेकदा वेळेवर मिळत नाही. पुरेशीही मिळत नाही. एक झाले आहे पूर्वी गावात अशी जागृती नव्हती. यामुळे जागृती होत आहे. आपली मुले ही देशाची संपत्ती आहे, असं आपण नेहमी सांगतो. पण ही संपत्ती समर्थ असली पाहिजे. शरीर निरोगी असलं पाहिजे. निरोगी शरीरातच निरोगी मन असू शकतं. मन आणि शरीर जर निरोगी असेल तरच आपण कोणतेही काम हे सक्षमपणे करू शकतो. आपल्याकडे अन्नधान्याचे उत्पादन भरपूर होते. यातील बरेच धान्य हे गोडाऊनमधून कुजून जाते. पण गरिबापर्यंत हे धान्य जात नाही. जर त्याच्यापर्यंत गेलं तरी त्यांची हे धान्य विकत घेण्यासाठी क्रयशक्ती नाही. योग्य ठिकाणी हे पुरविले जात नाही.
एक झाले आहे, गावात अंगणवाडी सुरू झाल्यापासून या प्रश्नाकडे गावकऱ्यांचेही लक्ष वेधले जात आहे. अंगणवाडी ताई ही गावातीलच आहे. खरं तर तिचं लग्न बाहेरगावी झालं होतं, पण तिचा नवरा अचानक वारल्यामुळे ती आपल्या आई-बापाच्या आधाराने जगण्यासाठी गावी आली. तेही मोलमजुरी करूनच जगतात. तिलाही आधार मिळतो. सरपंचांनी पुढाकार घेऊन तिला अंगणवाडीचे काम मिळवून दिले. तिलाही लहान दोन मुलं आहेत. तिने हे काम स्वीकारल्यापासून तिच्यातही मोठा बदल झाला. दुसऱ्यांना सक्षम करण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो. यात आपणही सक्षम बनतो. आपल्याही व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. अशा कामामुळे तिचेही व्यक्तिमत्त्व विकसित झाले. नवरा वारल्यानंतर विधवेला समाजात तसे काही स्थान राहत नाही. अशा गरीब विधवा स्त्रिया या समाजकंटकांचे भक्ष्यही असतात. अशावेळी या अंगणवाडीच्या कामामुळे तिच्यात एक नवे बळ तयार झाले. तिला हे काम करण्यासाठी जे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत गेले याचा हा खरा परिणाम होता. आपण बदलत गेलो की मग आपल्यातील या सामर्थ्याचा वापर करून आपले काम सक्षमपणे करू लागतो. अंगणवाडी ताईने पुढाकार घेऊन बचत गटही तयार केला आहे. दारिद्य्ररेषेखालील बायका याच्या लाभार्थी आहेत. प्रत्येकाकडे आपली उन्नती करण्याचे सामर्थ्य असते. त्याला जागे करावे लागते. जशी दगडात मूर्ती असते. फक्त नको तो भाग काढून टाकावा लागतो. नको तो भाग काढून टाकला की मूर्ती तयार होते. तसेच आपल्याकडेही काही दोष असतात. ते कमी करावे लागतात. आपल्याकडे जे गुण आहेत त्याचा आपण विकास करू लागलो, की दोष आपोआप कमी होतात. कोणताही लहान माणूस आपल्याच स्फूर्तीने मोठा बनतो. ही क्षमता निसर्गाने प्रत्येकाला दिली आहे. निसर्ग कोणावर अन्याय करीत नाही. आपणास काय दिले आहे याचा विचार न करता काय दिले नाही याचाच सतत विचार करतो. यामुळे अडथळे तयार होतात.
अंगणवाडी ताई गावातील मुले जन्माला येताना कुपोषित जन्माला येणार नाहीत याची सतत काळजी घेते. तिला यश मिळत आहे. एक खरे आहे, नजरेत भरणारे यश लगेच मिळत नाही. पण काही बदल होत आहे. बदल हा चांगल्या दिशेने होत आहे. दिशा ही महत्त्वाची आहे. दिशा जर बरोबर असेल तर योग्य मार्गाने वाटचाल होते. योग्य ठिकाणी आपण पोचतो. आपण दुसऱ्यासाठी काम करीत नसून आपण आपल्यासाठीच काम करतो, ही भावना फार महत्त्वाची आहे. यासाठी आपल्या कामावर आपली निष्ठा असली पाहिजे. ती असली की यश फार लांब नाही.