बियाण्यांची कृत्रीम टंचाई निर्माण करू नका- गावित
-
Sunday, May 06, 2012 AT 12:00 AM (IST)
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारला बियाणे विक्रेत्यांची बैठक
नंदुरबार (प्रतिनिधी) - बियाण्यांची कृत्रीम टंचाई निर्माण करता कामा नये, शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळतील, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कुमुदिनी गावित यांनी बियाणे विक्रेत्यांच्या बैठकीत दिल्या.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांची बैठक जिल्हा परिषद सभागृहात नुकतीच झाली. या वेळी कृषी सभापती डॉ. भगवान पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपसंचालक श्री. महाजन, जिल्हा कृषी अधिकारी ए. एस. खर्चान, श्री. देशमुख आदी उपस्थित होते. नंदुरबार, नवापूर, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील 110 विक्रेते या वेळी उपस्थित होते.
कुमुदिनी गावित म्हणाल्या, ""खरीप हंगामात नेहमीच बियाण्यांची टंचाई निर्माण केली जाते. वास्तविक नियोजनाप्रमाणे बियाण्यांची मागणी नोंदविली जाते, असे असताना टंचाई कशी निर्माण होते, असा प्रश्न उपस्थित करून सर्व शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे बियाणे मिळतील याकडे कृषी विभागाने लक्ष द्यावे.''
कृषी विभागातर्फे देखील विक्रेत्यांना विविध सूचना करून मार्गदर्शन करण्यात आले. रेकॉर्ड नियमित व अद्ययावत ठेवावे, बीटी बियाण्याबाबत शेतकऱ्यांची ओरड असते, त्याबाबत गांभीर्याने घेतले पाहिजे, दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना कशी मिळतील याकडे लक्ष द्यावे, शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यास लागलीच दुकानांची तपासणी करण्यात येईल. त्यामुळे रेकॉर्ड ठेवा, साठ्याची माहिती ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या. ए. जी. कागणे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.