Last Update:
 
ऍग्रो गाईड

डोंगर उतारावरील फळबागेसाठी पाणी व्यवस्थापन कसे करावे?
-
Friday, May 11, 2012 AT 04:30 AM (IST)
Tags: agro guide

प्रशांत साळुंखे, आजरा, जि. कोल्हापूर

डोंगर-उतारावर पावसाळ्यामध्ये लागवड केलेली फळझाडे डोक्‍यावरून पाणी वाहून नेऊन जगविणे अत्यंत खर्चिक व अवघड असते. डोंगर-उतारावरील आंबा आणि काजू लागवडीच्या पाणीपुरवठ्यासाठी "कोकण जलकुंड' फायदेशीर आहे. नवीन आंबा किंवा काजू लागवडीत दर दहा झाडांमध्ये जमीन जर डोंगर-उताराची व खडकाळ असल्यास 4 मीटर x 1 मीटर x 1 मीटर किंवा 2 मीटर x 1मीटर x 2 मीटर या आकाराचा खड्डा खोदावा. अशा खड्ड्यांना व्यवस्थित चौकोनी आकार द्यावा. जांभ्या जमिनीच्या खड्ड्यातील बारीक दगडांची अणकुचीदार टोके काढून टाकावीत आणि खड्ड्याचा तळ व चारही भिंतींवर अस्तराच्या स्वरूपात भात पेंढ्याचा सुमारे 15 सें.मी. जाडीचा थर पसरावा. पेंढा पसरण्यापूर्वी शिफारशीत कीटकनाशक पावडर खड्ड्यात पसरून द्यावे. त्यानंतर खड्ड्यात सिल्पॉलीन प्लॅस्टिक अस्तरित करावे. अस्तरीकरण करताना सिल्पॉलीन प्लॅस्टिक व्यवस्थित पसरावे, जेणेकरून त्यास घड्या पडणार नाहीत. खड्ड्याच्या काठापासून सभोवताली 20 सें.मी. अंतरावर 30 x 30 सें.मी. आकाराचा चर खोदून त्यात सिल्पॉलीनची खड्ड्याबाहेरील वाढीव बाजू गाडून मातीने व्यवस्थित झाकावी आणि माती पायाने व्यवस्थित घट्ट दाबावी आणि खड्ड्याच्या सभोवताली मातीचा उंचवटा तयार करावा, यामुळे खड्ड्याच्या आजूबाजूने वाहणारे पावसाचे मातीमिश्रित गढूळ पाणी खड्ड्यात न येता खड्डा पावसाच्या स्वच्छ पाण्याने भरून राहील. खड्ड्यामध्ये साठविलेले पाणी पावसाळ्यानंतर उर्वरित काळासाठी (15 नोव्हेंबर ते 15 जून) दहा आंबा किंवा काजू कलमांना प्रति आठवड्यास प्रति झाडास दहा लि. या प्रमाणात पुरेसे होते. सिल्पॉलीन अस्तरित खड्ड्यातील पाण्याचा बाष्पीभवनाद्वारे होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी बांबूच्या पट्ट्या आणि गवत वापरून तयार केलेल्या सलद्याने खड्डा झाकून ठेवावा, यामुळे मोकाट गुरे किंवा वन्यप्राणीदेखील तळ्यातील पाणी पिणार नाहीत. प्रत्येक वेळी कलमांना देण्यासाठी खड्ड्यातील पाणी काढल्यानंतर पाण्याच्या पृष्ठभागावर 100 मि.लि. नीम/ उंडी तेल ओतावे. अशा तेलाच्या तवंगामुळे बाष्पीभवनाद्वारे होणारा पाण्याचा ऱ्हास मर्यादित राहतो आणि तेलाच्या उग्र वासामुळे, तसेच कीटकनाशक गुणधर्मामुळे मोकाट गुरे पाणी पीत नाहीत आणि उंदीर, सरडा, विंचू इत्यादी पाण्याजवळ जात नाहीत.

संपर्क - (02358) 2802558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: