Last Update:
 
ऍग्रो मार्केट

कापूस, मका तेजीत राहण्याचा अंदाज
-
Friday, May 11, 2012 AT 04:00 AM (IST)
Tags: agro market

या वर्षी देशातील मिरची उत्पादन 10 ते 12 टक्‍क्‍यांनी वाढेल असा अंदाज आहे. चीनची कापसाची आयात या वर्षी वाढेल असा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काही सप्ताहात हा कापसाच्या दराचा कल वाढता राहील अशी अपेक्षा आहे. जूननंतर मक्‍याच्या किमती वाढण्याची शक्‍यता आहे. ब्राझीलमधील साखरेचे कमी उत्पादन होण्याची शक्‍यता असल्याने किमती वाढण्याचा अंदाज आहे.

डॉ. अरुण प्र. कुलकर्णी

तांबडी मिरची 
23 मार्चनंतर मिरचीच्या (जून 2012) फ्युचर्स किमती उतरत आहेत. गेल्या सप्ताहात मिरचीच्या किमती 0.3 टक्‍क्‍यांनी उतरल्या होत्या. या सप्ताहात त्या 0.7 टक्‍क्‍यांनी वाढल्या. या वर्षी देशातील उत्पादन 10 ते 12 टक्‍क्‍यांनी वाढेल असा अंदाज आहे. या सप्ताहातील वाढ तात्पुरती आहे. वाढत्या आवकेने व अपेक्षित वाढीव उत्पादनामुळे पुढील काही दिवस किमती उतरण्याचा अधिक संभव आहे.

गूळ
23 मार्चनंतर गुळाच्या (जुलै 2012) फ्युचर्स किमती उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 0.4 टक्‍क्‍याने वाढत्या होत्या. या सप्ताहात त्या 1.7 टक्‍क्‍यांनी उतरल्या. सध्या मागणी स्थिर आहे. त्यामुळे या किमतीत फार मोठे चढ-उतार अपेक्षित नाहीत.

कपाशी 
गेल्या सप्ताहात स्पॉट किमती 1.7 टक्‍क्‍यांनी व फेब्रुवारी 2013 फ्युचर्स किमती 4.3 टक्‍क्‍यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या परत. अनुक्रमे, 1.4 टक्‍क्‍यांनी व 2.3 टक्‍क्‍यांनी वाढल्या. वर्षअखेर साठा अपेक्षेपेक्षा कमी असेल असा सध्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर निर्यातीवरील नियंत्रणे या सप्ताहात कमी करण्यात आल्यामुळे या किमती वाढल्या आहेत. चीनची कापसाची आयात या वर्षी वाढेल असा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काही सप्ताहात हा कल वाढता राहील अशी अपेक्षा आहे.

मका 
मक्‍याच्या (जून 2012) किमती गेल्या महिन्यात (23 मार्चनंतर) उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 0.8 टक्‍क्‍याने घसरल्या होत्या. या सप्ताहात त्या आणखी 1.1 टक्‍क्‍याने घसरल्या. स्थानिक आवक वाढलेली आहे. त्याचा हा परिणाम आहे. पुढील दोन सप्ताहांत कल काहीसा नरम राहील. जूननंतर मात्र मक्‍याच्या किमती वाढण्याची शक्‍यता आहे.

साखर 
साखरेच्या (जून 2012) किमती 23 मार्चनंतर वाढत होत्या. गेल्या सप्ताहात त्या 0.1 टक्‍क्‍याने उतरल्या होत्या. याही सप्ताहात त्या फक्त 0.73 टक्‍क्‍याने वाढल्या. साखरेचे उत्पादन या हंगामात जरी चांगले होत असले तरी नवीन अंदाजानुसार पूर्वीच्या अंदाजापेक्षा काहीशी घट संभवते. जागतिक मागणी फारशी आशादायक नाही. त्यामुळे निर्यात किंमत फारशी किफायतशीर नाही. उन्हाळ्यात साखरेची मागणी काही प्रमाणात वाढलेली आहे. त्याचा परिणाम किमती वाढण्यावर होईल. ब्राझीलमधील अपेक्षित कमी उत्पादनसुद्धा किमती वाढण्याला मदत करील.

सोयाबीन 
सोयाबीनच्या जून फ्युचर्स किमती 23 मार्चनंतर सतत वाढत आहेत. गेल्या सप्ताहात त्या मोठ्या प्रमाणावर, म्हणजे 7.6 टक्‍क्‍यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या 0.9 टक्‍क्‍याने घसरल्या. ही घट तात्पुरती आहे. जानेवारीनंतरचा कल बघितला (सोयाबीनचा आलेख बघावा) तर सोयाबीन किमतीत होत असलेली सततची वाढ लक्षात येईल. जागतिक उत्पादनातील घट व चढती मागणी याचा हा परिणाम आहे. आपल्या देशातील उत्पादनातसुद्धा चार टक्‍क्‍यांनी घट होईल या वार्तेमुळे ही वाढ अधिक प्रमाणात झालेली आहे. शासन या वाढत्या किमतीवर लक्ष ठेवून आहे. नवीन निर्बंधांमुळे कदाचित वाढत्या किमतीवर काही प्रमाणात आळा बसेल. मात्र पुढील वर्षासाठी तेलबियांच्या व सोयाबीनच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याची शिफारस केली गेली आहे. त्यामुळे व आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे लांबवरचा कल वाढता असेल.

हळद
23 मार्चनंतर हळदीच्या किमतीत (जून 2012) घट होत होती. गेल्या सप्ताहात त्या तीन टक्‍क्‍यांनी घसरल्या होत्या. या सप्ताहात मात्र त्या 6.6 टक्‍क्‍यांनी वाढल्या. या वर्षी हळदीचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. आवक मात्र कमी किमतीमुळे आखडली गेली आहे. लांबवरचा कल किंमत कमी होण्याचा आहे.

हरभरा
हरभऱ्याच्या किमती (जून 2012) 23 मार्चनंतर उतरत होत्या. सप्ताहात मात्र त्या 4.2 टक्‍क्‍यांनी वाढल्या होत्या. गेल्या सप्ताहात त्या आणखी 11.5 टक्‍क्‍यांनी वाढल्या. शासनाच्या नवीन अंदाजानुसार या वर्षी हरभऱ्याचे उत्पादन गेल्या वर्षापेक्षा कमी होणार आहे. पुढील वर्षासाठी खरीप कडधान्यांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याची शिफारस केली गेली आहे. या सर्वांमुळे हरभऱ्याचा लांबवरचा कल वाढता राहील असे दिसते.

गहू - 23 मार्चनंतर गव्हाच्या (जून 2012) किमती काहीशा उतरत आहेत. गेल्या सप्ताहात मात्र त्या 1.6 टक्‍क्‍यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या परत 0.8 टक्‍क्‍याने घसरल्या. या महिन्यात आवक वाढेल व किमती उतरतील असा अंदाज आहे.

बटाटा
बटाट्याच्या (जून 2012) किमती 23 मार्चनंतर मोठ्या प्रमाणावर उतरत आहेत. गेल्या सप्ताहात 0.8 टक्‍क्‍याने उतरल्या होत्या. या सप्ताहात त्या 4.7 टक्‍क्‍यांनी वाढल्या, ही वाढ तात्पुरती आहे. पुढील सप्ताहात किमती परत कमी होण्याची शक्‍यता आहे.




 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: