Last Update:
 
फुलोरा

जे मी केलं आहे, तो केवळ एक प्रयोग होता
इरगोंडा पाटील
Monday, May 14, 2012 AT 12:00 AM (IST)
मी एका गावात दोन एकर शेती विकत घेतली आहे. मला शेती हवी होती. माझ्याकडे पैसे कमी होते, तरी मला शेती दिली. ज्याने शेती विकली, त्याने मला सांगितलं आहे, मी शेती घेऊन फसलो आहे, गावकरी मला पिकं हाती लागू देत नाहीत. एक - दोन लोकांचाही अनुभव असाच आहे. त्याने शेतावर एक जोडपं ठेवलं होतं. त्यांना एके दिवशी मारहाण झाली. मी कागदपत्रं बघितली. गावचा तलाठी मला बोलला, अनेकांची फसवणूक झाली आहे. तलाठी

मला बरा माणूस वाटला, त्याने स्वतःहून मला मार्गदर्शन केलं. मला सगळी परिस्थिती कळली होती, तरी मी शेती घेण्याचा निर्णय घेतला. याचं कारण एकच होतं. मला गावात संरक्षण मिळेल, असं मला वाटलं होतं. त्याचं एक कारण होतं. जरी मला गावात कोणी ओळखत नसलं, तरी आमच्या जातीचं गावात वर्चस्व होतं. प्रत्येक गावात ज्या जातीचे लोक मोठ्या प्रमाणात असतात, जे सधन असतात, त्यांचं वर्चस्व असतं. गावात ज्यांचं वर्चस्व असतं, त्यांना कोणी त्रास देत नाही. यामुळेच मी शेती विकत घेण्याचा निर्णय घेतला. अलीकडे सगळ्या जाती संघटित होत आहेत. आमच्या जातीचा पुढारी माझा परिचित आहे. त्याची जरी फार लगट नसली, तरी तो जातीतील लोकांना बरोबर घेतो. असं करून त्याने राजकीय पक्षातही आपलं वजन वाढवलं आहे. आता राजकीय पक्षही बघू लागलेले आहेत, याच्यामागे त्याच्या जातीचे लोक किती आहेत, हे सगळं मी बघत होतो. यातून मी हा निर्णय घेतला; पण हे मी कधी बोललो नाही. सगळे माझे सहानुभूतीदार होते. त्यांनी असं धाडस करू नका, असं सांगितलं. एवढंच नव्हे, तर मी अशी दोन एकर शेती घेणार आहे, हे बायकोला बाहेरून जेव्हा कळलं, तेव्हा ती बोलली, शेतीपेक्षा जीव महत्त्वाचा आहे. आपला जीव कशाला धोक्‍यात घालता, असं माझ्या बायकोने बजावलं. मी काही तरी थातूर मातूर गोष्टी सांगून बायकोची समजूत काढली. आम्ही शहरात राहतो. शेती हा काही किफायतशीर असा धंदा नाही. आपल्याला हे जमणार नाही, हे तिने मला सांगितलं. मी एवढंच तिला बोललो, फार तर पुन्हा विकावी लागेल; पण एक प्रयोग करून तर बघू या. मी विषाची परीक्षा घेत आहे, असं तिचं मत बनलं.

आमच्या जातीच्या पुढाऱ्याला घेऊन मी शेतीवर गेलो. जातीचा पुढारी येणार आहे, हे गावातील जातवाल्यांना कळलं होतं. आता कुठलीही बातमी कळवणं सोपं झालं आहे. रानात मोठं झाड आहे. झाडाखाली आम्ही बसलो. बघता बघता आमचे जातवाले झाडाखाली जमले. मला तशी चाहूल होती, जातीचा प्रभाव ठाऊक होता; पण तो इतका असेल, हे मी कधी बघितलं नव्हतं. मी शेती विकत घेतली, याचं जातवाल्यांना बरं वाटलं. याचं एक कारण, शेती काही आमच्या जातीच्या शेतकऱ्याची नव्हती. आमच्या जातीचे लोक त्यांना पीक हाती लागू देत नसत. तो काही गावातील कोणाला शेती विकत नव्हता. त्याचा राग होता. याचा मला फायदा झाला.

मी दोन एकर शेती घेतली आहे. मला तसा तेथे कोणताही त्रास नाही. जे लोक पीक हाती लागू देत नव्हते, तेच त्याचं रक्षण करतात. मला जे वाटलं होतं, तसं घडेल का, याची माझ्या मनातही शंका होती. कारण काही गोष्टी करूनच बघाव्या लागतात; पण माझा अंदाज होता, तो खरा ठरला आहे. मला जे शेती घेऊ नकोस, असं सांगत होते, त्यांना थोडं आश्‍चर्य वाटतं; पण त्यांना अजून मी खरं कारण कळू दिलेलं नाही. कदाचित त्यांना ते कळणारही नाही. समजा, तसं कुठून तरी कळलं, तर यावर फारसा कोणी विश्‍वास ठेवणार नाही. आपण सगळीकडे सांगतो, जातीभेद कमी झाला आहे. माझा अंदाज असा आहे, पूर्वीपेक्षा तो वाढत आहे. मी जे केलं, तो एक प्रयोग होता, तो यशस्वी झाला. सगळीकडे बहुधा असंच चाललं असावं, असा माझा शेरा आहे. त्यामुळे बलिष्ठ जातीही संघटित होत आहेत.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: