आपली दिशा बरोबर आहे का, हा खरा प्रश्न आहे
-
Tuesday, May 15, 2012 AT 12:00 AM (IST)
अनेक तरुण मुलं बेकार आहेत. यातील अनेक मुलं पदवीधर आहेत. तीन हजार लोकवस्तीच्या गावात हा आकडा आता शेकड्याने झाला आहे. यातील फारच थोड्यांना नोकरी मिळू शकेल. यातील फारच थोडी कोणता ना कोणता कामधंदा करू शकतील. यातील बहुतेक मुलं ही दोन - अडीच एकर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची मुलं आहेत. काहीतरी कामधंदा, नोकरी मिळावी, यासाठी त्यांनी शिक्षण घेतलं आहे. पण या शिक्षणाने त्यांना कोणताही कामधंदा अगर नोकरी मिळेल अशी खात्री नाही. याचा एक परिणाम होत आहे. शिक्षणावरील विश्वासही उडत आहे. बहुतेकांना सावलीत बसून पगार मिळणारी नोकरी हवी आहे. याचा शोध ही मुलं घेत आहेत. दुसरा काही पर्याय आहे का, याचा गावातील एकाही मुलाने विचार केला नाही. जर त्यांना दुसरं काही ठाऊकच नसेल, तर ते तरी काय करणार! यातील बहुतेकांची शिक्षण घेणारी पहिलीच पिढी आहे. पिढीजात ज्यांच्याकडे शिक्षण आहे, अशांचा प्रश्न वेगळा आहे. त्यांना हे प्रश्न भेडसावतही नसतील. कारण यातून कसा व कोणता मार्ग काढावा, याचं घरातूनही त्यांना वातावरणामुळे मार्गदर्शन मिळत असावं. अशी परिस्थिती गावातील कोणत्याही कुटुंबाची नाही. अनेकांच्या वडिलांना साधी अक्षरओळखही नाही; पण शिक्षणामुळे आपलं काही भलं होईल, या आशेवर या मुलांनी पदवी मिळविली आहे. यापूर्वी अशी पदवी मिळविणाऱ्यांना काहीतरी मिळालं आहे. त्यामुळे आपल्यालाही तसं मिळू शकेल, अशी शक्यता आहे, असं वाटल्यामुळे मुलांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. एक विसंगती मात्र आहे. जे काही मुलांनी शिक्षण घेतलं आहे, त्यातून त्यांनी कोणतं कौशल्य संपादन केलं आहे, असं वाटत नाही. पदवी मिळविण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत. त्या मार्गांचा वापर करून पदवी पदरात पाडून घेतली आहे. पदवी जरी पदरात पडली असली, तरी त्यातून पुढे काहीच घडत नाही. यामुळे त्यातील बरीच मुलं निराश झाली आहेत. त्यांना याच वेळी काही मार्ग सापडला नाही, तर त्यांचं सगळं आयुष्य दिशाहीन होईल. यांना योग्य दिशा कोण आणि कशी दाखवेल, हा खरा प्रश्न होता.
गावातील अशा बेकार मुलांना एकत्र करून कोणीतरी मार्गदर्शन करावं, असा एक विचार केला. आता मार्गदर्शन करणारी व्यक्ती ही गावातील असू शकणार नाही. कारण गावातील माणसाचं गावातील मुलं किती ऐकतील हा खरा प्रश्न आहे. दुसरं एक म्हणजे या बेकार तरुणांना विश्वासात घेऊन मार्गदर्शन करण्याइतका योग्य माणूस गावात कोणी नाही. बाहेरील माणूस आला, तर त्याचं एक वेळ ऐकून घेतील. त्यामुळे अशा काहींशी संपर्क साधला. या गावातील बेकार मुलांना एकत्र करणं आवश्यक होतं. ते काम कोणीतरी करावं लागणार होते.
गावातील बेकार मुलं एकत्र आली. त्यांना बाहेरच्यांचं मार्गदर्शनही लाभलं. यातून काही बदल घडेल असं वातावरण तयार झालं आहे. लगेच यश मिळेल असं नाही; पण अशांना मार्गदर्शनाची गरज होती. ती तर मिळावी अशी धारणा होती.
गावातील तरुण एकत्र आले आहेत. स्वतःचा व्यवसाय स्वतः निवडत आहेत. एक चांगलं वातावरण तयार होत आहे. एक मात्र खरं आहे. अगदी डोळ्यांत भरावं असं काही आज तरी घडलेलं नाही. उद्या असं घडणारच नाही असं मात्र नाही. प्रगतीची सुरवात झाली आहे. प्रथम सुरवात होणं गरजेचं असतं. काही गोष्टी एका दिवसात घडत नाहीत. त्यासाठी काही काळ जावा लागतो. दिशा बरोबर आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे. त्या दिशेने वाटचाल तरी सुरू झाली आहे.