कोल्हापुरात टोमॅटो, वांग्याची आवक वाढली
राजकुमार चौगुले
Tuesday, May 15, 2012 AT 12:00 AM (IST)
कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहात वांगी, टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली. वांग्याची दररोज सातशे ते आठशे करंड्या, तर टोमॅटोची दीड ते दोन हजार कॅरेट इतकी आवक झाली. वांग्यास 40 ते 160 रुपये, तर टोमॅटोस 40 ते 200 रुपये प्रति दहा किलो असा दर होता.
बाजार समितीत वांगी, टोमॅटोखालोखाल हिरवी (ओली) मिरची, ढोबळी मिरचीच्या आवकेतही सातत्य होते. हिरव्या मिरचीस 100 ते 180 रुपये, तर ढोबळी मिरचीस 100 ते 280 रुपये प्रति दहा किलो असा दर होता. गवार, भेंडीची आवक कायम होती. गवारीस 200 ते 400 रुपये, तर भेंडीस 80 ते 250 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. गवारीची शंभर ते दीडशे पोती, तर भेंडीची शंभर ते तीनशे करंड्यांची आवक झाली. मका कणसांची दररोज चारशे ते पाचशे नग, तर ओल्या भुईमूग शेंगेची 80 पोती आवक होती. मका कणसांस शेकडा 300 रुपये, तर ओल्या भुईमूग शेंगेस 200 ते 280 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला. सांगली जिल्ह्यातून शेवगा शेंगेची दररोज शंभर ते दीडशे पोत्यांची आवक होती. शेवगा शेंगेस 200 ते 280 रुपये प्रति दहा किलो असा दर मिळाला.
गेल्या सप्ताहाच्या तुलनेत कोथिंबिरीच्या आवकेत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली. सप्ताहात दररोज पंधरा ते वीस हजार कोथिंबिरीच्या पेंढ्यांची आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा 300 ते 900 रुपये असा दर मिळाला. कोथिंबिरीच्या तुलनेत मेथीची आवक स्थिर होती. सप्ताहात मेथीची सहा ते सात हजार पेंढ्या आवक झाली. मेथीस शेकडा 400 ते 900 रुपये असा दर मिळाला. पोकळा, पालक, शेपू, अंबाडीस शेकडा 400 ते 500 रुपये दर होता. शेपूची दररोज तीन ते चार हजार पेंढ्यांची आवक झाली.
फळांमध्ये कलिंगडाची आवक काहीशी घटली. कलिंगडाची दररोज दोनशे ते पाचशे डझन आवक झाली. कलिंगडास डझनास 100 ते 1300 रुपये दर होता.
सांगली जिल्ह्यातून डाळिंबाची दीडशे डझन आवक झाली. डाळिंबास डझनास 30 ते 100 रुपये दर होता.
आंबा बाजार फुलला
सप्ताहात कैरीची दररोज सुमारे पन्नास पोती आवक झाली. शेकडा 100 ते 110 रुपये इतका दर कैरीला मिळाला. दोन डझनाच्या हापूस पेट्यांची दोन ते तीन हजार पेट्या आवक होती. या पेटीस 300 ते 700 रुपये दर होता. चार डझनाच्या हापूस पेट्यांची तीन ते चार हजार पेट्या आवक होती. या पेटीस प्रति पेटीस 600 ते 2000 रुपये दर होता. पायरीची पन्नास पेट्या आवक होती. चार डझनाच्या पेटीस 500 ते 900 रुपये दर मिळाला. लालबाग आंब्याची दररोज शंभर ते दीडशे पेट्यांची आवक झाली. लालबागला प्रति पेटी 200 ते 300 रुपये दर होता.