जगभरातील शेतकरी कृषिपंढरीत दाखल!
अमित गद्रे
Thursday, May 17, 2012 AT 12:00 AM (IST)
इस्राईलच्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनास दिमाखात प्रारंभ
तेल अविव : जागतिक कृषिपंढरीमध्ये मोठ्या दिमाखात 18व्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनास येथे मंगळवारी (ता. 15) प्रारंभ झाला. या प्रदर्शनात 230 कंपन्यांनी आपली उत्पादने मांडली आहेत, तर 80 देशांतील सरकारी शिष्टमंडळे कृषी प्रदर्शनातील तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी आली आहेत. विशेषत: महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांची येथे उपस्थिती लक्षणीय आहे. आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे.
प्रदर्शनात पाणी व्यवस्थापन, भाजीपाला, अन्नधान्य पिकांच्या जातींच्या बरोबरीने फलोद्यान, काढणीपश्चात तंत्रज्ञान, दुग्ध व्यवसायातील नवे तंत्रज्ञान, कुक्कुटपालन, हरितगृह तंत्रज्ञान, स्वयंचलित हवामान केंद्र, प्रक्रिया उद्योग, कृषी सॉफ्टवेअर्स, स्वयंचलित ठिबक तंत्रज्ञान, मशागतीची अवजारे, रोबो तंत्रज्ञानाकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. भारतातून सुमारे 2500 शेतकरी प्रदर्शनासाठी आले आहेत.
इस्राईलमधील पाणी व्यवस्थापन, पीक उत्पादकता तंत्र पाहणे व अभ्यासणे, प्रक्रिया उद्योगातील संधी शोधण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, अशी प्रतिक्रिया इरले (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील शेतकरी प्रशांत पाटील यांनी दिली.
इस्राईलचे उद्योग व्यापार आणि कामगार मंत्री शालोम सिन्हॉन म्हणाले, की ऍग्रीटेकच्या माध्यमातून इस्राईलचे तंत्रज्ञान जगापुढे मांडण्याची संधी आहे. जगभरातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आमचे तंत्रज्ञान उपलब्ध आहेच, त्याच बरोबरीने येत्या काळात विविध देशातील शेतकरी, शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांना इस्राईलमधील शेतीवर आधारित तंत्रज्ञान शिकता येईल. अन्नसुरक्षेच्या दृष्टीने सर्वच देशातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान शिक्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
शेतकऱ्यांसह गडकरी प्रदर्शनात!
विदर्भातील 50 शेतकऱ्यांसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी या प्रदर्शनास हजेरी लावली आहे. इस्राईलमधील फळबाग व्यवस्थापन, डेअरी उद्योग, काढणीपश्चात तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपन्यांशी थेट संवाद हे शेतकरी श्री. गडकरी यांच्या मदतीने साधणार आहेत!