Last Update:
 
ऍग्रो गाईड

शेतीविषयक माहिती देणारी संकेतस्थळे कोणती?
-
Thursday, May 17, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: agro guide
हेमंत चौधरी, मु.पो. थाळनेर, ता. शिरपूर, जि. धुळे
शेतीसंबंधी सविस्तर माहिती देणारी संकेतस्थळे पुढीलप्रमाणे ः
www.agri.mah.nic.in : हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर प्रत्येक जिल्ह्यातील शेतीची, बियाणे, खते, कीटकनाशकांची माहिती मिळते. हे संकेतस्थळ मराठी भाषेत पाहता येते.
www.icar.org.in : हे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) संकेतस्थळ आहे. त्यावर देशभरातल्या कृषी संशोधन संस्थांनी केलेल्या संशोधनाची माहिती मिळते.
www.iihr.res.in ः भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्थेचे (आयआयएचआर) हे संकेतस्थळ आहे. त्यावर फुलशेती, फळशेती आणि भाजीपाला उत्पादन यासंदर्भात माहिती मिळू शकते.
www.apeda.com : "कृषी व अन्नप्रक्रिया निर्यात विकास प्राधिकरण' (अपेडा) या संस्थेचे हे संकेतस्थळ आहे. यावर संस्थेची माहिती, भारताचे निर्यात विभाग, अपेडाकडून निर्यात केली जाणारी उत्पादने, त्यांच्या निर्यातीसंबंधीची आकडेवारी, व्यापारासंदर्भातील माहिती मिळू शकते.
www.nabard.org ः हे संकेतस्थळ राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंकेचे (नाबार्ड) आहे. बॅंकेची माहिती, विकासकार्य, मॉडेल प्रकल्प, ग्रामीण अर्थव्यवस्था, नाबार्डचे विभाग, कर्जपुरवठाविषयक माहिती, सध्या चालू असलेली कामे आदींबाबत सविस्तर माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
www.msamb.com ः महाराष्ट्र राज्य कृषी विपणन मंडळाचे हे संकेतस्थळ आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या, शेतीमालाची निर्यात, विविध योजना, काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर, शेतीमालाचे ताजे दर, इतर राज्यांतील दरांबद्दलची माहिती यावर उपलब्ध आहे. तसेच संगणकाद्वारे इंटरनेटवर विविध राज्यांतील बाजारभाव पाहण्यासाठी http:agmarknet.nic.in हे संकेतस्थळ (वेबसाइट) तयार करण्यात आले आहे; तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतील बाजार समित्यांतील भाव http://msamb.com या संकेतस्थळावरून पाहता येतात.

मातीचा सामू कशाप्रकारे तपासला जातो?
वसंत पाटील, मु. पो. ता. संगमनेर, जि. नगर
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील रसायनशास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे यांनी माहिती दिली. द्रावणाचा आम्ल-विम्ल निर्देशांक म्हणजे सामू (pH ) हायड्रोजन अणूच्या प्रमाणावर अवलंबून असल्याने त्याला पीएच (puissance de Hydrogen) अशी संज्ञा आहे. सामू पीएच मीटरवर मोजला जातो. त्याचा निर्देशांक 0 ते 14 पर्यंत असतो. जमिनींची आम्लता, तसेच विम्लता तपासण्यासाठी सामू काढला जातो. सामू साडेसहापेक्षा कमी असल्यास जमिनी आम्लधर्मीय असतात. अशा जमिनी अति पावसाच्या कोकण, तसेच गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांत आढळतात. साडेसहा ते 7.3 पर्यंतचा निर्देशांक तटस्थता (न्यूट्रल) दर्शवतो. सामू 7.3 पेक्षा जास्त असल्यास जमिनी विम्लधर्मीय समजल्या जातात. पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाड्यात अशा जमिनी जास्त आहेत. सामू साडेसहा ते 7.3 इतका असल्यास वनस्पतीला लागणारी बहुतांश अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. हा सामू असलेल्या जमिनीत सर्वच पिकांची वाढ चांगली होते. जमीन आम्लयुक्त असल्यास भात, नागली ही पिके आणि विम्लयुक्त असल्यास कापूस, ऊस, गहू, कांदा, वांगी इत्यादी पिके चांगली येऊ शकतात.

...असा मोजतात सामू
सामू हा पीएच मीटरच्या विद्युत यंत्राद्वारे अचूक मोजला जातो. 20 ग्रॅम माती घेऊन त्यामध्ये 50 मि.लि. डिस्टिल्ड वॉटर टाकून अर्धा तास हलवून पीएच मीटरवरील रीडिंगची नोंद घेतली जाते. ढोबळ मानाने सामू ओळखायचा असल्यास लिटमस कागद पद्धतीचा अवलंब करतात. हा लिटमस कागद ओल्या मातीत ठेवल्यास आम्ल-विम्लतेच्या प्रमाणानुसार रंगछटा बदलतात. आम्लता असल्यास निळा लिटमस कागद लाल होतो, तर विम्लता असल्यास लाल लिटमस कागद निळा होतो. यावरून जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक ढोबळ स्वरूपात काढता येतो.
संपर्क ः डॉ. दुरगुडे, 9822598964
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

बीटी कापसाला ठिबक सिंचन करायचे आहे, काय काळजी घ्यावी?
प्रशांत जाधव, मु.पो. पिंप्री, जि. परभणी
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील पाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे तज्ज्ञ डॉ. उदय खोडके यांनी दिलेली माहिती ः कापसात ठिबक संच उभारणीपूर्वी जमीन भुसभुशीत करावी. भुसभुशीत जमिनीत ठिबकचे पाणी योग्यरीत्या पसरते. कापूस लागवडीच्या अंतरानुसार ठिबक संचाचा आराखडा व उभारणी करावी. संचामध्ये नळ्यांव्यतिरिक्त फिल्टर व प्रेशर गेज हे महत्त्वाचे घटक अवश्‍य जोडावे. इनलाईन ठिबक नळ्या तयार होत असतानाच त्यांच्या आत ठिबक तोट्या बसविलेल्या असतात, त्यामुळे इनलाईन नळ्या वरून स्वच्छ करता येत नाहीत, म्हणून या पद्धतीत फिल्टरची निवड जास्त महत्त्वाची असते. सर्वसाधारणपणे जाळीचा फिल्टर हा सर्वच संचामध्ये बसविलेला असतो, मात्र पाण्याच्या गुणवत्तेनुसार इतरही फिल्टर बसविणे आवश्‍यक असते. विहिरीचे व बोअरचे पाणी असेल व कचऱ्याचे प्रमाण कमी असेल तर जाळीचा फिल्टर बसवावा. पाण्याच्या गुणवत्तेनुसार गरज पडल्यास दोन वेगवेगळे फिल्टर (उदा.ः जाळीचा व वाळूचा) एकत्रितपणे संचास बसविणे फायद्याचे असते. संचामध्ये कमीत कमी दोन प्रेशर गेज असावे. एक प्रेशर गेज मुख्य पाइपलाइनवर फिल्टरच्या पूर्वी व दुसरा फिल्टरच्या नंतर बसवावा. संचाच्या आखणीनुसार संच किती दाबावर चालवायचा, फिल्टर केव्हा स्वच्छ करायचा, व्हेन्चुरीद्वारे खतमिश्रित पाणी किती सोडायचे यासाठी प्रेशर गेज असण्याची गरज आहे. शेताच्या आराखड्यानुसार दोन ड्रीपर्समधील अंतर निवडावे. प्रत्येक ठिबक तोटीद्वारे किती लिटर पाणी द्यायचे हे काढण्यासाठी त्या तोटीद्वारे किती क्षेत्र भिजवायचे आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. अधिक मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

संपर्क ः 02452-221938
पाणी व्यवस्थापन प्रकल्प, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
--------------------------------------------------------
खरिपात मिरची लागवडीसाठी योग्य जाती कोणत्या? लागवड कधी व कशी करावी?
संतोष सोनजे, मु.पो. वढव, ता. लोणार, जि. बुलडाणा
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार, खरिपातील मिरचीची लागवड जून-जुलैमध्ये करावी. लागवडीसाठी सी.ए. 960, पंत सी-1, जी-3, एक्‍स-235, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेली जयंती, तसेच इतर कृषी विद्यापीठांच्या अग्निरेखा, तेजस, सूर्यमुखी, फुले ज्योती, अर्का लोहित, कोकण कीर्ती या जातींची निवड करावी.

रोपे तयार करणे ः
दोन मीटर लांब, एक मीटर रुंद आणि 20 सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावेत. प्रति दोन चौ.मी. जागेला दोन किलो या प्रमाणात शेणखत मिसळावे. रोपवाटिकेत दोन चौ.मी. जागेला 20 ग्रॅम नत्र, दहा ग्रॅम स्फुरद व दहा ग्रॅम पालाश द्यावे. अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश बी पेरणीपूर्वी द्यावे, उर्वरित नत्र 20-25 दिवसांनी बी पेरणीनंतर द्यावे. एक हेक्‍टर लागवडीसाठी एक ते सव्वा किलो बियाणे पुरेसे होते. बी पेरणीपूर्वी बियाण्यास दोन ग्रॅम थायरम चोळावे. गादी वाफ्यावर आठ ते दहा सें.मी. अंतरावर वाफ्याच्या रुंदीस समांतर ओळी तयार करून त्यामध्ये दाणेदार फोरेट (दहा टक्के) हेक्‍टरी दहा किलो या प्रमाणात टाकून मातीने झाकून घ्यावे. या ओळीमध्ये दोन सें.मी. खोलीवर बी पेरावे. 40-45 दिवसांत रोपे तयार होतात.

रोपांची पुनर्लागवड करताना लागवडीपूर्वी रोपांचे शेंडे बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून घ्यावे. कोरडवाहू पिकासाठी 60 x 45 सें.मी. आणि ओलिताच्या पिकासाठी 60 x 60 सें.मी. अंतर ठेवावे. खते देताना माती परीक्षणानुसार कोरडवाहू पिकासाठी हेक्‍टरी 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद द्यावे. पैकी संपूर्ण स्फुरद आणि अर्धे नत्र लागवडीच्या वेळी द्यावे. उरलेले नत्र लागवडीनंतर 30 दिवसांनी बांगडी पद्धतीने द्यावे. ओलिताच्या मिरचीसाठी हेक्‍टरी 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश चार समान हप्त्यांत लागवडीच्या वेळी आणि त्यानंतर 4, 11 आणि 13 आठवड्यांत विभागून द्यावीत.

संपर्क ः 0724-2259262
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.
प्रतिक्रिया
On 26/10/2012 09:20 AM Bharat said:
mirchi lagwad information


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: