डॉ. अरुण प्र. कुलकर्णी
चालू सप्ताहात (10 जूनपासून) एनसीडीईएक्समध्ये सहा नवीन करारासाठी व्यवहार सुरू झाले. त्यात हरभरा (16 ऑक्टोबर), गूळ (20 डिसेंबर), मका (20 सप्टेंबर), साखर (20 नोव्हेंबर), हळद (17 ऑगस्ट) व गहू (20 नोव्हेंबर) यांचा समावेश आहे. सोयाबीनचे ऑक्टोबर 2012 साठीचे व्यवहारसुद्धा या महिन्यात सुरू होणार होते; ते मात्र फॉरवर्ड मार्केट कमिशनच्या आदेशाने लांबणीवर टाकले आहेत. ते व नोव्हेंबर 2012 चे व्यवहार जूनमध्ये सुरू होतील.

अमेरिकन शेती खात्याने 10 मे 2012 रोजी आपल्या शेतीमालाच्या जागतिक मागणी व पुरवठ्याचे नवीन अंदाज प्रसिद्ध केले. या अंदाजानुसार नवीन वर्षाच्या (2012-13) अमेरिकन जागतिक उत्पादनाचे चित्र आशादायक आहे. अमेरिकेत आता उन्हाळा सुरू झाला आहे व अनेक पिकांखालील, लागवडीखालील आणलेल्या क्षेत्राचे सर्वेक्षण सुरू आहे. हाती आलेल्या पहिल्या अंदाजानुसार गहू, मका, सोयाबीन, साखर व कापूस यांचे उत्पादन वाढेल व तांदळाचे उत्पादन कमी होईल असे दिसते. अर्थात या अहवालाचा परिणाम काही अंशी किमतींवरपण झालाच. एनसीडीईएक्समध्ये हळद वगळता, सर्व फ्युचर्स किमती या सप्ताहात दोन ते सात टक्क्यांनी घसरल्या. (आलेख बघा).
8 मे ते 15 मे 2012 दरम्यान एनसीडीईएक्सचे निरनिराळ्या किमतीतील चढ-उतार पुढीलप्रमाणे होते.
तांबडी मिरची ः
23 मार्चनंतर मिरचीच्या (जून 2012) फ्युचर्स किमती उतरत आहेत. गेल्या सप्ताहात मिरचीच्या किमती 0.7 टक्क्याने वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या 4.5 टक्क्यांनी घसरल्या. या वर्षी देशातील उत्पादन दहा ते 12 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. वाढत्या आवकेने व अपेक्षित वाढीव उत्पादनामुळे पुढील काही दिवस किमती उतरण्याची अधिक शक्यता आहे.
गूळ ः
23 मार्चनंतर गुळाच्या (जुलै 2012) फ्युचर्स किमती उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 1.7 टक्क्यांनी उतरत्या होत्या. या सप्ताहात त्या आणखी तीन टक्क्यांनी उतरल्या. सध्या मागणी स्थिर आहे. पण नजीकच्या काळात ती कमी होईल.
कपाशी ः
गेल्या सप्ताहात स्पॉट किमती 1.4 टक्क्यांनी व फेब्रुवारी 2013 फ्युचर्स किमती 2.3 टक्क्यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात फ्युचर्स किमती पाच टक्क्यांनी कमी झाल्या. अमेरिकन उत्पादनातील वाढीचा अंदाज याला कारणीभूत आहे. आपल्याकडील वर्षअखेरचा साठा अपेक्षेपेक्षा कमी असेल असा सध्याच्या अंदाज आहे. त्याचबरोबर निर्यातीवरील नियंत्रणे या सप्ताहात कमी करण्यात आली आहेत. पुढील दोन सप्ताहांत किमती कदाचित कमी होतील.
मका ः
मक्याच्या (जून 2012) किमती गेल्या महिन्यात (23 मार्चनंतर) उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 1.1 टक्क्याने घसरल्या होत्या. या सप्ताहात त्या विक्रमी सात टक्क्यांनी घसरल्या. स्थानिक आवक वाढलेली आहे व जागतिक किमतीसुद्धा नरम आहेत. पुढील दोन सप्ताहांत हीच परिस्थिती राहील.
साखर ः
साखरेच्या (जून 2012) किमती 23 मार्चनंतर वाढत होत्या. गेल्या सप्ताहात त्या 0.73 टक्क्याने वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या दोन टक्क्यांनी उतरल्या. साखरेचे उत्पादन या हंगामात जरी चांगले होत असले तरी नवीन अंदाजानुसार पूर्वीच्या अंदाजापेक्षा काहीशी घट संभवते. जागतिक मागणी फारशी आशादायक नाही. पुढील वर्षाच्या अमेरिकेतील उत्पादनात वाढ संभवते. पुढील वर्षातील महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात घट येईल असा एक अंदाज आहे. उन्हाळ्यात साखरेची मागणी काही प्रमाणात वाढलेली आहे. त्याचा परिणाम किमती वाढण्यावर होईल. ब्राझीलमधील अपेक्षित कमी उत्पादनसुद्धा किमती वाढण्याला मदत करील, यामुळे या सप्ताहातील घट तात्पुरती असेल असा अंदाज आहे.
सोयाबीन ः
सोयाबीनच्या जून फ्युचर्स किमती 23 मार्चनंतर सतत वाढत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 0.9 टक्क्याने घसरल्या होत्या, या सप्ताहात त्या आणखी सात टक्क्यांनी घसरल्या. ही घट मुख्यत्वे अमेरिकन उत्पादनाच्या अंदाजामुळे झाली आहे. त्याचबरोबर शासनाच्या नवीन नियंत्रणाचासुद्धा परिणाम आहे. या सर्वांमुळे पुढील दोन सप्ताहांत किमती काही प्रमाणात घसरण्याची शक्यता आहे.
हळद ः
23 मार्चनंतर हळदीच्या किमतीत (जून 2012) घट होत होती. गेल्या सप्ताहात त्या 6.6 टक्क्यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या दोन टक्क्यांनी वाढल्या. या वर्षी हळदीचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. आवक मात्र कमी किमतीमुळे आखडली गेली आहे. लांबवरचा कल किंमत कमी होण्याचा आहे.
हरभरा ः
हरभऱ्याच्या किमती (जून 2012) 23 मार्चनंतर उतरत होत्या. गेल्या सप्ताहात मात्र त्या 11.5 टक्क्यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या दोन टक्क्यांनी उतरल्या, फ्युचर्स किमतीवरील नियंत्रणामुळे ही घसरण झाली आहे. शासनाच्या नवीन अंदाजानुसार या वर्षी हरभऱ्याचे उत्पादन गेल्या वर्षापेक्षा कमी होणार आहे, पुढील वर्षासाठी खरीप कडधान्यांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याची शिफारस केली गेली आहे. या सर्वांमुळे हरभऱ्याचा लांबवरचा कल वाढता राहील असे दिसते.
गहू ः
23 मार्चनंतर गव्हाच्या (जून 2012) किमती काहीशा उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 0.8 टक्क्याने घसरल्या होत्या. या सप्ताहात त्या परत चार टक्क्यांनी घसरल्या. वाढती आवक व जागतिक उत्पादनाचा नवीन अंदाज यामुळे ही घट झालेली आहे. या महिन्यात आवक वाढेल व किमती आणखी उतरतील असा अंदाज आहे.
बटाटा ः
बटाट्याच्या (जून 2012) किमती 23 मार्चनंतर मोठ्या प्रमाणावर उतरत आहेत. गेल्या सप्ताहात जरी त्या 4.7 टक्क्यांनी वाढल्या तरी या सप्ताहात त्या परत पाच टक्क्यांनी उतरल्या. पुढील सप्ताहात किमती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.