नाशिकमध्ये वांगी 400 ते 1400 रुपये
-
Tuesday, May 29, 2012 AT 12:00 AM (IST)
नाशिक : येथील बाजार समितीत गत सप्ताहात वांग्याची आवक वाढली. या वेळी दिवसाला 700 क्विंटल वांग्याची आवक राहिली. वांग्याला 400 ते 1400 रुपये, तर सरासरी 900 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
नाशिक भागात सद्यःस्थितीत खरीप हंगामाच्या नियोजनाला वेग आला आहे. या वेळी बाजारातील पालेभाज्यांची आवक घटली, तर फळभाज्यांची आवक वाढलेली आहे.
गत सप्ताहात हेच चित्र बाजार समितीच्या आवारात दिसून आले. वांगी, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, काकडी या फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढलेली राहिली.
दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नाशिक बाजार समितीच्या आवारात भाजीपाल्याची आवक घटते. याच काळात स्थानिक व जिल्ह्याबाहेरील बाजारपेठेतून भाजीपाल्याला मागणी वाढते. मे महिन्याच्या अखेरीस आवकेत घट व मागणीत वाढ ही स्थिती राहत असल्याने भाजीपाल्याला चांगले दर मिळतात. हा अनुभव बहुतांश वेळी येत असल्याने उन्हाळ्यात सिंचनाची व्यवस्था असलेल्या भागातून या काळात माल बाजारात आणण्याचे नियोजन केले जाते. नाशिक शहराजवळची गावे, तसेच निफाड, दिंडोरी या तालुक्यांतून भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यात फळभाज्यांची आवक विशेष वाढली असून, त्या तुलनेत मागणी स्थिर असल्याचे चित्र आहे.
बाजार समितीत ढोबळी मिरचीची दिवसाला 70 क्विंटल आवक राहिली. ढोबळी मिरचीच्या प्रति दहा किलो वजनाच्या क्रेटला 150 ते 300 रुपये, तर सरासरी 200 रुपये दर निघाले. फ्लॉवरची सरासरी 600 क्विंटल आवक राहिली. फ्लॉवरच्या दहा किलोच्या बोजाला 90 ते 120 रुपये, तर सरासरी 100 रुपये दर मिळाले.
गत हंगामात याच वेळी कोबीची मोठी आवक झाली होती. त्या तुलनेत यंदा कोबीची आवक स्थिर आहे. कोबीची सरासरी 450 क्विंटल आवक राहिली. प्रति 20 किलोच्या व 12 कंदांच्या क्रेटला 100 ते 200 रुपये, तर सरासरी 150 रुपये दर मिळाला.
पालेभाज्यांची आवक कमालीची घटली आहे. त्यात कोथिंबिरीची सरासरी 30 हजार जुड्यांची आवक राहिली. कोथिंबिरीला 1000 ते 2000 रुपये, तर सरासरी 1500 प्रति 100 जुडी असे दर कोथिंबिरीला मिळाले. अजून सप्ताहभर तरी हीच स्थिती राहील असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
"पाणीटंचाईची परिस्थिती पाहता मोठ्या अवघड स्थितीतून शेतकरी बाजारात माल आणत आहेत. या स्थिती भाजीपाल्याची मागणी व दर स्थिर आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही स्थिती कायम राहील.''
- बाळासाहेब मटाले, वांगी उत्पादक शेतकरी, कामटवाडे, ता. जि. नाशिक