...त्यांची गावाशी नाळ जोडलेली आहे
इरगोंडा पाटील
Tuesday, May 29, 2012 AT 12:00 AM (IST)
मेची सुट्टी लागली आहे. गावातील काही बाहेरगावी नोकरीला आहेत. सुट्टीच्या निमित्ताने गावी येतात, कारण मुलांना सुट्टी लागलेली असते. काही आता शहरातच स्थायिक झाले आहेत. जन्मही शहरातच झाला आहे. बालपण, शिक्षणही शहरातच झाले आहे. पहिली पिढी गावात बालपण घालविलेली आहे. शिक्षणही गावातच झालेले आहे. नोकरी अगर कामधंद्यासाठी बाहेरगावी गेले आहेत. मोठ्या शहरांत अनेक जण आहेत. त्यांनी तेथे गावकऱ्यांचे मंडळ बनविले आहे. महिन्यातून एक दिवस ठरवून त्या दिवशी सगळे एकत्र जमतात. यातून एका गावातील सगळ्यांचा जवळचा परिचय होतो. नाहीतर एका गावचे असून, आता एका गावात राहात असूनही काही संबंध राहत नाही. असे होऊ नये म्हणून काहींनी पुढाकार घेऊन असे मंडळ सुरू केले.
यातून एकमेकांच्या अडचणी समजतात. कोणाला काही मदतीची गरज असेल तर मदतही मिळते. एकमेकांना मदत करण्याची एक प्रवृत्ती तयार होते. शहरात तसे फार संबंध कोणाशी निर्माण करणे कठीण असते. फार तर आपल्या कार्यालयातील आपल्या कामधंद्याच्या निमित्ताने जे काही भेटतात, त्यांच्याशीच संबंध येतो. अशा लोकांचा संबंध हा अनेकदा व्यावसायिक असतो. कार्यालयातील संबंधही नेहमीच चांगले असतील असे नाही. त्याला वेगवेगळे कंगोरे असतात. कार्यालयात एकमेकांचे हेवेदावेही असतात. आपले सहकारी हे अनेकदा आपले स्पर्धकही असतात. त्यामुळे नको तितकी कटुता तयार होते. एका ठिकाणी काम करूनही एकमेकांविषयी आदर राहत नाही. याला फार थोडी माणसं ही अपवाद असतात; पण त्यांनाही अनेक प्रकारच्या बऱ्या - वाईट घटनांना सामोरे जावे लागते. यामुळे आपल्या व्यवसायाबाहेरच्या लोकांशी संबंध, हे अधिक निकोप राहू शकतात. कारण, त्यामुळे कोणतेही हितसंबंध राहत नाहीत. जे राहतात ते चांगले असण्याची मोठी शक्यता असते. या सगळ्या पार्श्वभूमीमुळे गावकऱ्यांच्या मंडळाला चांगला प्रतिसाद आहे. गावात एकमेकांचे हेवेदावे असू शकतात; पण मंडळ मात्र एकोप्याने चालले आहे. केवळ चालले नाही, चांगले चालले आहे. एका विचाराने सगळे एकत्र येतात. महानगरात तसे कोणी कोणाचे नसते. मयत झाली तरी माणसं एकत्र येत नाहीत. अशामुळे मंडळ म्हणजे एक वाळवंटातील ओऍसिसच आहे.
शहरात कामधंदा करणाऱ्यांनी एकत्र येऊन पुढाकार घेऊन गावच्या विकासालाही हातभार लावला आहे. गावात आता माध्यमिक शाळा आहे. गावात माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय शहरातील मंडळाने तेथेच घेतला. सुरवातीला काही सरकारी अनुदान मिळत नाही. यासाठी लागणारा निधी गावाबाहेरच्या मंडळानेच पुढाकार घेऊन जमविला. यातून गावात माध्यमिक शाळा सुरू झाली. आपण गावासाठी काहीतरी करू शकतो, याचेही समाधान वाटते. या समाधानामुळे आपले कर्तव्य आपण पार केल्याचा आनंदही मिळतो. हा आनंद आयुष्यात फार महत्त्वाचा आहे. आपलं सगळं कोणीतरी हिरावून घेऊ शकतो; पण आपला आनंद हाच आपल्या आयुष्यात चैतन्य निर्माण करतो. या चैतन्यामुळेच आपण जगत राहावं असं वाटतं. आपलं आयुष्य निरस बनत नाही. माणसं एकत्र आली की लहान माणसंही किती मोठमोठी कामं करू शकतात, याची अनेक जिवंत उदाहरण आपण पाहतो. एरवी हे काम आपण करू शकू असे त्यांनाही वाटलेले नसते. अशी कामे माणसे एकत्र आल्याने करू शकतात.
बाहेरगावी असल्याने गावाशी संबंध ठेवला आहे. काहींचे गावात घरही नाही, तरीही त्यांना आपल्या गावाची ओढ आहे. नव्या पिढीशी त्यामुळे त्यांचा संवाद होतो. एका पिढीचा दुसऱ्या पिढीशी संबंध आला पाहिजे; संवाद झाला पाहिजे. जगण्यासाठी गाव सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशा काळात गाव सोडून बाहेर गेलेल्यांनी गावाशी अशी नाळ जोडली आहे; इतरांनाही याचा आदर्श घ्यावा असेच हे आहे. एकामेकांमुळे प्रगती होत आहे, ही जमेची बाजू आहे.