Last Update:
 
ऍग्रो स्पेशल

तंत्र सूर्यफूल लागवडीचे...
डॉ. एस. के. शिंदे, डॉ. जे. आर. कदम
Friday, June 01, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: agrowon
सूर्यफुलाची लागवड वेगवेगळ्या जमिनीत केली जाते. तरीही किफायतशीर उत्पादनासाठी मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 असलेली जमीन या पिकासाठी चांगली असते. चोपण व क्षारयुक्त जमिनीत सुद्धा हे पीक चांगले येते.

सूर्यफुलाचे पीक हे 80 ते 90 दिवसांत तयार होते. याच्या बियांत 30 ते 40 टक्के तेलाचे प्रमाण असल्याने कमी कालावधीत अधिक तेल मिळवून देणारे हे पीक आहे. याचे मूळ जमिनीत खोल जात असल्यामुळे पाण्याचा ताण सहन करू शकते.
उशिरा पाऊस पडला तर मध्य हंगाम दुरुस्ती म्हणून लागवड करता येते. खतास चांगला प्रतिसाद देते. बियाणे कमी लागत असल्यामुळे बियाणे खर्च कमी होतो. या पिकास संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडला तरी तग धरून राहते. ओलावा उपलब्ध होताच अल्पावधीत पूर्वीसारखे जोमाने वाढते. या पिकास एक महिन्यापर्यंत थंड हवामान लागते. रोपावस्थेपासून पीक फुलोऱ्यात येईपर्यंत उष्ण हवामानाची गरज असते. फुलोऱ्यापासून ते काढणीपर्यंत या पिकाला उष्ण हवामान व स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यास हे पीक चांगले येते. या पिकाची वाढ होण्यासाठी 20 ते 29 अंश सेल्सिअस तापमान लागते. मात्र 5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी व 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान या पिकास मानवत नाही. पीक फुलोऱ्याच्या काळात अति तीव्रतेने पडलेला पाऊस या पिकास हानिकारक असतो. परागीभवन न झाल्यामुळे दाणे भरण्याच्या प्रक्रियेत बाधा येते.
सूर्यफुलाची लागवड वेगवेगळ्या जमिनीत केली जाते. तरीही किफायतशीर उत्पादनासाठी मध्यम ते भारी आणि चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 असलेली जमीन या पिकासाठी चांगली असते. चोपण व क्षारयुक्त जमिनीतसुद्धा हे पीक चांगले येते. मात्र आम्लयुक्त आणि पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. सूर्यफुलाची मुळे जमिनीत खोल जात असल्यामुळे पूर्वीचे पीक काढल्यानंतर जमिनीची 20 ते 25 सें.मी. खोलीपर्यंत नांगरट करावी. नांगरणीनंतर वखराच्या 2-3 पाळ्या द्याव्यात व जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी हेक्‍टरी 20 ते 25 गाड्या चांगले कुजलेले शेणखत/ कंपोस्ट खत मिसळून वखरणी करावी.
----------------------------

सुधारित/ संकरित वाण

पेरणीचे तंत्र ः
पेरणीसाठी सुधारित वाणाचे 6 ते 7 किलो आणि संकरित वाणाचे 5 ते 6 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाणे 12 तास पाण्यात भिजवून सावलीत सुकवावे. त्यामुळे बियांची उगवण जोमदार आणि एकसारखी होण्यास मदत होते. पेरणीसाठी प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा. मर रोगासाठी थायरम दोन ग्रॅम प्रति किलोप्रमाणे प्रक्रिया करावी. बड नेक्रासिस (शेंडा मर) रोगापासून संरक्षणासाठी 5 ग्रॅम इमिडाक्‍लोप्रिड (200 एस.एल.) प्रति किलोप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. शेवटी ऍझेटोबॅक्‍टर 20 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. अधिक उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगामात या पिकाची पेरणी पुरेशा ओलीवर 15 जून 15 जुलैपर्यंत करावी. सूर्यफुलाची पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी म्हणजे बी आणि खते एकाच वेळी पेरता येतात. सरळ वाण तसेच मध्यम प्रकारची जमीन असेल तर सूर्यफुलाची लागवड 45 x 30 सें.मी. अंतरावर करावी आणि भारी जमीन व संकरित वाणाची लागवड 60 x 30 सें.मी. अंतरावर करावी. बियाणे 5 सें.मी. पेक्षा खोल पेरू नये. बागायती सूर्यफुलाची लागवड 60 x 30 सें.मी. अंतरावर सरी वरंबे काढून करावी.
सूर्यफुलाची विरळणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पेरणीनंतर 12 ते 15 दिवसांनी दोन रोपांतील अंतर 30 सें.मी. ठेवून विरळणी करावी. विरळणी करताना रोगट, बारीक रोपे काढून टाकावीत. आवश्‍यकतेनुसार खुरपण करावी. एक महिन्यापर्यंत पीक तणविरहित ठेवावे. कोरडवाहूमध्ये पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी एक कोळपणी करावी.
--------------

खत व्यवस्थापन ः
सूर्यफुलापासून किफायतशीर उत्पादन मिळण्यासाठी माती परीक्षण करून त्यानुसार खते देणे महत्त्वाचे आहे. कोरडवाहू पिकास हेक्‍टरी 50 किलो नत्र (110 किलो युरिया) आणि 25 किलो स्फुरद (156 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) पेरणीच्या वेळेस द्यावे. बागायती सूर्यफुलासाठी 60 किलो नत्र (130 किलो युरिया); 30 किलो स्फुरद (187 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) + आणि 30 किलो पालाश (50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश) प्रति हेक्‍टरी द्यावे. बागायती पिकास अर्धे नत्र संपूर्ण स्फुरद आणि पालाश (30ः30ः30 किलो/ हे) पेरणीच्या वेळेस द्यावे व अर्धे नत्र पेरणीनंतर एक महिन्याने द्यावे. ज्या ठिकाणी गंधकाची कमतरता आहे, अशा ठिकाणी 20 किलो गंधक प्रति हेक्‍टरी घ्यावे.
----------------
संपर्क ः डॉ. शिंदे ः 9689617066
(लेखक विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर येथे कार्यरत आहेत.)


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: