Last Update:
 
फुलोरा

आपल्या नशिबाला दोष देऊन काहीच घडणार नाही
-
Tuesday, June 05, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: fulora
शेतकऱ्यांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम होता. नवं तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे. आपला शेतकरी अजून पारंपरिक पद्धतीने शेती करतो आहे. पारंपरिक अनुभवही महत्त्वाचा आहे, कारण तो आजवरच्या अनुभवावर आधारलेला आहे. या अनुभवातून त्याला काही शहाणपण मिळालं आहे. आधुनिक शेती ही व्यापारी शेती आहे, ती बाजारपेठेवर अवलंबून आहे. शेतकरी केवळ निसर्गावरच अवलंबून नाही, निसर्गाची त्याला साथ हवीच असते. पण निसर्गाने जरी साथ दिली, तरी बाजारपेठ त्याला दगा देऊ शकते. अनेकदा रानात पिकलेले त्याची काढणी करणेही शेतकऱ्यांना परवडणारे नसते. बाजारपेठेवर उत्पादकांचे नियंत्रण नाही. प्रत्येक उत्पादक आपल्या मालाची किंमत स्वतः ठरवतो, ती त्याच्या उत्पादन खर्चावर आधारलेली असते. शेतकरी जे उत्पादन करतो, त्याची अनेकदा किंमत ठरवणारे वेगळे असतात. जरी शेतकऱ्याने किंमत सांगितली, तरी ती त्याला मिळत नाही. भारत हा शेतीप्रधान देश आहे. मोठ्या प्रमाणात लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीतील उत्पादन हा कच्चा माल आहे. कच्च्या मालावर प्रक्रिया करावी लागते. असे उपक्रम काहींनी सुरू केले आहेत. यात काहींनी यश मिळविले आहे. याचे कारण त्यांनी बाजारपेठेचा विचार केला. कोणत्या वेळी कोणते पीक घेणे किफायतशीर आहे, याचा त्याला अंदाज घ्यावा लागतो. पारंपरिक शेतीत असा विचार फार झाला नाही. शेती ही एक संस्कृती आहे. कृषी संस्कृती हीच खरी भारतीय संस्कृती आहे. आपल्या देशातील गरिबी शेतीशी निगडित आहे. शेतकरी गरीब आहे, म्हणून देश गरीब आहे. आपण गरीब का, असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. आपण गरीब का आहोत, याचा विचार सुरू झाला पाहिजे; पण आपण गरीब आहोत, असं समजून गरिबांनी गरिबी स्वीकारली आहे. गरिबीचा स्वीकार केल्याने गरिबी घालविणे कठीण जाते. अनेक प्रयोग करूनही गरिबी हटली नाही, याचे खरे कारण त्यांना आपल्या गरिबीची सवय झाली आहे. गरिबी नवे तंत्रज्ञान आत्मसात केल्याशिवाय हटणार नाही, त्यासाठी शिक्षणाची गरज आहे. शिक्षण याचा अर्थ शाळा - कॉलेजात जे घेतो, एवढाच याचा अर्थ नाही. आपण जे काम करतो, त्या कामात अधिक प्रगतीसाठी नवं शिकावं लागतं. आता तंत्रज्ञानामुळे हे शक्‍य झालं आहे. आता अशक्‍य काही नाही. त्यासाठी नवं ज्ञान आत्मसात करायची तयारी हवी, ती आपल्याकडे नसते. जर नवं तंत्रज्ञान वापरलं, तर कमी शेतीतही अधिक उत्पादन काढून अधिक नफा मिळवू शकतो.
आपण जे पीक घेतो त्या पिकाची पूर्ण माहिती असली पाहिजे. शेतकऱ्यासाठी पीकवार अभ्यासक्रम आहेत, त्यातून त्याला त्या त्या पिकांविषयी अद्ययावत माहिती मिळू शकते. त्याचा पूर्ण अभ्यास होतो. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर आपल्याला प्रमाणपत्र मिळतं. केवळ प्रमाणपत्रासाठी हा शेतकऱ्यांसाठीचा अभ्यासक्रम पूर्ण करून चालणार नाही. प्रमाणपत्र मिळविणारे अनेक असतात. प्रमाणपत्रापेक्षा तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यातून शेतीत सुधारणा होऊन उत्पादन वाढून अधिक लाभ झाला पाहिजे. आपल्याला आर्थिक लाभ झाला, की आपला जीवनस्तर उंचावतो. आपला जगण्याचा स्तर उंचावणे आवश्‍यक आहे. जीवन जगण्याची कुवत आणि जीवन जगण्याचा स्तर उंचावणे याचा अर्थ प्रगती असा आहे. त्यासाठी पैसा हे साधन आहे. अनेकांना ते आयुष्याचं साध्य वाटतं. साध्य वेगळं असतं. आपल्या जगण्याच्या पद्धतीवर त्याचा स्तर ठरतो. आपलं आयुष्य संपन्न होण्यासाठी याची गरज आहे.
शेतकऱ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. शेतकऱ्यांचं हे शिक्षण पारंपरिक शिक्षणासारखं असणार नाही. असं आजीवन शिक्षणातूनच गरिबी जाऊ शकेल. आपला शत्रू गरिबी ही आहे. ही लढाई आपण हरत आहोत, याचं कारण नवं शिकायचं आपण टाळतो. नशिबाला दोष देऊन काहीच घडणार नाही.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: