Last Update:
 
ऍग्रो मार्केट

पाकिस्तानच्या बाजारपेठेत रावेरच्या केळीचा दबदबा
-
Wednesday, June 06, 2012 AT 02:45 AM (IST)
Tags: agro market

दिलीप वैद्य

रावेर, जि. जळगाव : आखाती देशांतील केळी निर्यात अपयशी ठरल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील केळीला आता पाकिस्तानची बाजारपेठ मिळाली आहे. येथील बाजारपेठेत रावेरच्या केळीने दबदबा निर्माण केला आहे. रावेर व यावल तालुक्‍यांतील किमान 25 ट्रक केळीला पाकिस्तानातील लाहोर, कराची व इस्लामाबाद येथे मागणी वाढली आहे. अतिरिक्त जादा भाव मिळाल्याने केळी उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. निर्यात सुरू झाली असली, तरी या आंतरराष्ट्रीय व्यापारात अजूनही काही अडचणी आहेत. त्या दूर झाल्यास रोज किमान शंभर ते दोनशे ट्रक केळी पाकिस्तानातील बाजारपेठेत जाऊ शकतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

या वर्षी पाकिस्तानमध्ये केळी उत्पादनाला फटका बसला आहे, त्यामुळे पश्‍चिम व उत्तर भारतातील केळीची मागणी पाकिस्तानातून होत आहे. सावदा येथील हितेंद्र नारंग यांची डी. के. ऍण्ड सन्स ही फर्म थेट पाकिस्तानला केळी पाठवीत आहे, तर सावदा व फैजपूर येथील आणखी किमान चार फर्म पाकिस्तानला अन्य व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीने केळी निर्यात करीत आहेत. 1960 ते 70च्या काळात रावेर येथून देवनदास ऍण्ड पारूमल कं.तर्फे पाकिस्तानात केळी निर्यात होत होती. आता सुमारे 45 वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यातील केळी पाकिस्तानच्या बाजारपेठेत पोचली आहे.

...अशी होते पॅकिंग
पाकिस्तानातही दर्जेदार केळीला चांगली मागणी आहे. रावेर तालुक्‍यातील चिनावल, कुंभारखेडा; तर यावल तालुक्‍यातील न्हावी, भालोद, सांगवी आणि हिंगोणा या गावांतील केळी बाजारभावापेक्षा 250 ते 500 रुपये प्रति क्विंटल जास्त देऊन खरेदी केली जात आहेत. कापणीनंतर पूर्ण काळजी घेत फण्या करून, स्वच्छ धुऊन मग ती कागदी खोक्‍यात भरली जातात. एका खोक्‍यात 16 किलो केळी भरली जातात. भारतातून पाकिस्तानमध्ये तीन विविध मार्गांनी केळी निर्यात केली जाते. जळगाव जिल्ह्यातून मुंबईपर्यंत ट्रकने, तेथून जहाजातून वातानुकूलित कंटेनरमधून केळीची निर्यात होते. याचबरोबरीने अमृतसर जवळील वाघा बॉर्डर व श्रीनगरमार्गे ट्रकच्या माध्यमातून केळीची निर्यात होते.

दक्षिण भारतातील केळीबाबत खबरदारी
1960-70च्या दशकात जेव्हा केळी भारतातून पाकिस्तानात निर्यात होत होती, तेव्हा दक्षिण भारतातून विषाणूजन्य केळी पाठविली गेली होती. म्हणून आता पाठविण्यात आलेली केळी दक्षिण भारतातील नसल्याचे व केळी विषाणू रोगमुक्त असल्याचे प्रमाणपत्र येथील व्यापाऱ्यांना पाकिस्तानच्या शासनास द्यावे लागत आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी विषाणू रोगमुक्त आहेत; मात्र तसे प्रमाणपत्र कोण देणार, अशी अडचण व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. सध्या रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून ही केळी दक्षिण भारतातील नसल्याचे व जळगाव जिल्ह्यातील असल्याचे प्रमाणपत्र व्यापारी घेत आहेत. राज्य शासन, कृषी विभाग, महा बनाना किंवा दक्षिण भारतीय केळी उत्पादक महासंघ यापैकी कोणीही पुढाकार घेऊन विषाणूमुक्त केळीचे प्रमाणपत्र मिळवून दिले, तर येथील केळीला पाकिस्तानात आणखी मोठी बाजारपेठ खुली होणार आहे. या कामी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे. सध्या सावदा व फैजपूर येथील भरत सुपे, तोलाराम कुंदनदास, जय मातादी फ्रूट कंपनी, भगवानदास लक्ष्मणदास ऍण्ड कं. व बऱ्हाणपूर मधील एक फर्म अन्य व्यापाऱ्यांच्या मदतीने केळी निर्यात करीत आहे.

शेतकऱ्यांचा फायदा
केळी पाकिस्तानला पाठविणारे सावदा येथील व्यापारी हितेंद्र नारंग यांनी सांगितले, की या निर्यातीत जादा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा आहे; तसेच या निर्यातीमुळे सुमारे सहाशे ते सातशे मजुरांना काम मिळाले आहे. आपल्याकडे सध्या 22 कंटेनर केळीची मागणी पाकिस्तानातून आहे. मात्र, वातानुकूलित कंटेनर उपलब्ध नसल्याने निर्यातीत अडचण येत आहे.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: