या वर्षी देशातील मिरची उत्पादन 10 ते 12 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. चीनच्या पुढील वर्षाच्या कपाशी उत्पादनात घट होईल, असा अंदाज आहे. आपल्याकडील वर्षअखेरचा कपाशीचा साठा अपेक्षेपेक्षा कमी असेल असा सध्याचा अंदाज आहे. पुढील वर्षात अमेरिकेतील साखर उत्पादनात वाढ दिसून येत आहे.
डॉ. अरुण प्र. कुलकर्णी
गेल्या सप्ताहात अंदमानात मॉन्सून पोचला. काहीशा विलंबाने तो आता परत सक्रिय झाला आहे. आता मॉन्सून केरळात पोचलेला आहे. यापुढे त्याची प्रगती कशी होईल त्यावर पुढील किमती काही प्रमाणात अवलंबून राहतील. या सप्ताहात गूळ व बटाटा वगळता सर्व शेतीमालांच्या किमती उतरल्या. 22 मे ते 29 मे 2012 दरम्यान "एनसीडीईएक्स'मधील निरनिराळ्या किमतीतील चढ-उतार आलेखामध्ये दाखविलेले आहेत.
तांबडी मिरची - एक एप्रिलनंतर मिरचीच्या (जुलै 2012) फ्युचर्स किमती उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 0.4 टक्क्याने वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे 7.4 टक्क्यांनी उतरल्या. या वर्षी देशातील उत्पादन 10 ते 12 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आहे. पाऊस जसा वाढेल तशी आवक कमी होईल; पण साठा पुरेसा आहे.
गूळ - एक एप्रिलनंतर गुळाच्या (जुलै 2012) फ्युचर्स किमती 17 एप्रिलपर्यंत वाढत त्यांनी रु. 1230 ची पातळी गाठली. त्यानंतर त्या उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 1.7 टक्क्यांनी उतरल्या होत्या. या सप्ताहात त्या 0.9 टक्क्याने वाढल्या. सध्या मागणी स्थिर आहे. किमतीत फार मोठे बदल संभवत नाहीत.
कपाशी 26 एप्रिलनंतर कपाशीच्या (फेब्रु. 13) फ्युचर्स किमती रु. 1000 च्या आसपास स्थिर आहेत. गेल्या सप्ताहात या 0.7 टक्क्याने वाढल्या होत्या. या सप्ताहात मात्र त्या 3.7 टक्क्यांनी उतरल्या. चीनच्या पुढील वर्षाच्या उत्पादनात घट होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आपल्याकडील वर्षअखेरचा साठा अपेक्षेपेक्षा कमी असेल असा सध्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर निर्यातीवरील नियंत्रणे या सप्ताहात कमी करण्यात आली आहेत. पुढील दोन सप्ताहांत किमतीत मोठा बदल होण्याचा संभव कमी आहे.
मका मक्याच्या (जुलै 2012) किमती गेल्या महिन्यात (1 एप्रिलनंतर) उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 0.3 टक्क्याने उतरल्या होत्या. या सप्ताहात त्या परत 5.2 टक्क्यांनी उतरल्या. स्थानिक आवक वाढलेली आहे व जागतिक किमतीसुद्धा नरम आहेत. पुढील दोन सप्ताहांत हीच परिस्थिती राहील. किमतीत फार वाढ संभवत नाही.
साखर साखरेच्या (जुलै 2012) किमती एक एप्रिलनंतर तीन मेपर्यंत वाढत होत्या. नंतर त्या घसरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 1.8 टक्क्यांनी उतरल्या होत्या. या सप्ताहात त्या परत 0.7 टक्क्याने उतरल्या. साखरेचे उत्पादन या हंगामात जरी चांगले होत असले तरी नवीन अंदाजानुसार पूर्वीच्या अंदाजापेक्षा काहीशी घट संभवते. जागतिक मागणी फारशी आशादायक नाही. पुढील वर्षाच्या अमेरिकेतील उत्पादनात वाढ संभवते. पुढील वर्षातील महाराष्ट्रातील ऊस उत्पादनात घट येईल, असा एक अंदाज आहे. पुढील दोन सप्ताहांत साखरेच्या किमतीत मर्यादित बदल संभवतात.
सोयाबीन सोयाबीनच्या जुलै 2012 च्या फ्युचर्स किमती एक एप्रिलनंतर दोन मेपर्यंत सतत वाढत होत्या. त्यानंतर 14 मेपर्यंत त्या घसरत होत्या. गेल्या सप्ताहात त्या 0.2 टक्क्याने वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या परत 2.5 टक्क्यांनी उतरल्या. अमेरिकन उत्पादनाच्या वाढीव अंदाजामुळे गेल्या सप्ताहातील घट झाली होती. जागतिक मंदी, युरोपमधील आर्थिक अस्थिरता, अमेरिकेच्या निर्यातीतील घट यांचा परिणाम म्हणून किमती कमी होत आहेत. पुढील दोन सप्ताहांत किमती आणखी कमी होण्याचा संभव आहे.
हळद एक एप्रिलनंतर हळदीच्या किमतीत (जुलै 2012) 11 मेपर्यंत वाढ होत होती. त्यानंतर त्या उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या सहा टक्क्यांनी उतरल्या होत्या. या सप्ताहात त्या परत मोठ्या प्रमाणावर (8.8 टक्क्यांनी) कमी झाल्या. या वर्षी हळदीचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. आवक वाढती झाली आहे. लांबवरचा कल किंमत कमी होण्याचा आहे.
हरभरा हरभऱ्याच्या किमती (जुलै 2012) एक एप्रिलनंतर काही दिवस उतरत होत्या. नंतर त्यांनी चढत रु. 4500 ची पातळी गाठली. नऊ मेनंतर त्या रु. 4400 च्या दरम्यान आहेत. गेल्या सप्ताहात मात्र त्या तीन टक्क्यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या 7.3 टक्क्यांनी उतरल्या. शासनाच्या नवीन अंदाजानुसार या वर्षी हरभऱ्याचे उत्पादन गेल्या वर्षापेक्षा कमी होणार आहे. पुढील वर्षासाठी खरीप कडधान्यांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याची शिफारस केली गेली आहे. या सर्वांमुळे हरभऱ्याचा लांबवरचा कल वाढता राहील असे दिसते. मात्र या वर्षी खरीप कडधान्याखाली किती क्षेत्र लागवडीखाली येईल यावर सुद्धा किमती अवलंबून राहतील.
गहू एक एप्रिलनंतर गव्हाच्या (जुलै 2012) किमती सतत उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 0.5 टक्क्याने वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या परत 2.8 टक्क्यांनी उतरल्या. या महिन्यात आवक वाढेल व किमती आणखी उतरतील असा अंदाज आहे. जागतिक परिस्थितीसुद्धा वाढत्या किमतींना अनुकूल नाही.
बटाटा बटाट्याच्या (जुलै 2012) किमती एक एप्रिलनंतर मोठ्या प्रमाणावर उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 3.5 टक्क्यांनी उतरल्या होत्या. या सप्ताहात मात्र त्या दोन टक्क्यांनी वाढल्या. किमतीचा हा उतरता कल लक्षात घेऊन "एनसीडीईएक्स'ने सहा जून बटाट्याच्या लॉग पोझिशनवरील स्पेशल मार्जिन 25 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आणला आहे, तर जादा मार्जिन काढून टाकला आहे.