Last Update:
 
राज्य

आमदार बच्चू कडू यांचे चौथ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू
-
Friday, June 08, 2012 AT 03:30 AM (IST)

मुंबई (प्रतिनिधी) - देशाला अन्न पुरविण्यासाठी मातीत रक्त आटवूनही ज्याच्या जगण्याची दैना होते, त्या शेतकऱ्याची व्यथा मांडणारे आमदार बच्चू कडू यांचे उपोषण गुरुवारी (ता. 7) चौथ्या दिवशीही सुरूच राहिले. कृषिमंत्री विखे- पाटील यांच्या शिष्ठाईनंतरही सरकारतर्फे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चेसाठी बोलावणे पाठविले आहे. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनीही आ. कडू यांच्या समर्थनार्थ बुधवार (ता. 6)पासून वर्ध्यात आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.

शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी आ. कडू यांनी एक जून रोजी गडचिरोली येथे रक्तदान करून रॅली काढली. महाराष्ट्रातील विविध शहरांना-गावांना भेटी देत ते चार जून रोजी मुंबईत पोचले. त्याच दिवशीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषणास सुरवात केली आहे.

बुधवारी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी शिष्टाई करून उपोषणाचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सर्व मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा आ. कडू यांनी घेतला होता. शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्याशी चर्चा करून कळवतो, असे आश्‍वासन देऊनही सरकारतर्फे कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही.

शिवसेना आमदार शरद पाटील, युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा, जनसुराज्य पक्षाचे आमदार अनिल बोंडे, रिपाइंचे राजेंद्र गवई, शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख रवी देवांग, श्रमिक एल्गार संघटनेच्या परोमिता गोस्वामी, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांच्यासह अनेक नेत्यांनी या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे.

राजेंद्र गवई यांनी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. आमदार बाळा नांदगावकर, धैर्यशील पाटील, जयंत पाटील, वीरेंद्र जगताप, बळिराम शिरसकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. शेतकऱ्यांबाबतच्या या आंदोलनाबाबत प्रसारमाध्यमांच्या भूमिकेबाबत प्रहार संघटनेने खेद व्यक्त केला आहे. आमरण उपोषणामुळे बच्चू कडू यांची तब्येत खालावत असून, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून बच्चू कडूंचे प्राण वाचवावेत, अशी मागणी प्रहार संघटनेने पत्रकाद्वारे केली आहे.

अखेर मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली
श्री. विखे- पाटील यांच्या शिष्ठाईनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदार बच्चू कडू यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. आ. कडू यांच्यासमवेत प्रहार संघटनेचे कार्यकर्ते वाटाघाटींसाठी संध्याकाळी उशिरा मंत्रालयात जाणार असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी (ता. 7) दुपारी वैद्यकीय पथकाने आमदार श्री. कडू यांची तपासणी केली, प्रकृती काहीशी खालावल्याचे आढळून आले.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: