Last Update:
 
ऍग्रो प्लॅनिंग

तंत्र कोरडवाहू पिकांच्या व्यवस्थापनाचे
-
Monday, June 11, 2012 AT 03:00 AM (IST)
Tags: agro plannig

सर्वसाधारणपणे पिकांच्या रोपावस्था, वाढीव अवस्था आणि पक्वता अवस्थेमध्ये नुकसान टाळण्याच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीनुसार उपयुक्त बाबींचा अवलंब करून उत्पादनातील संभाव्य घट कमी करता येऊ शकते. नैसर्गिक घटकांचा समतोल आणि परिणामकारकरीत्या उपयोग होण्यासाठी मुख्य आणि आंतरपिकांची योग्य निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
डॉ. दि. अ. चव्हाण, भा. वा. भुईभार, मदन पेंडके, सु. भा. चौलवार

भाग - 1 

कोरडवाहू शेतीमध्ये जमीन, पाणी, प्रकाश व हवा या नैसर्गिक घटकांचा कार्यक्षम उपयोग होण्याच्या दृष्टीने योग्य पीक पद्धतीचा अवलंब करणे अगत्याचे ठरते. योग्य पीक पद्धती बदलत्या हवामानातसुद्धा चांगले उत्पादन देतात. नैसर्गिक घटकांचा समतोल आणि परिणामकारकरीत्या उपयोग होण्यासाठी मुख्य आणि आंतरपिकांची योग्य निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठवाडा विभागाच्या बदलत्या हवामानाला योग्य अशा काही महत्त्वाच्या आंतर आणि दुबार पीक पद्धती खालीलप्रमाणे आहेत.

आंतर आणि दुबार पीक पद्धतीमुळे पावसाचे अनियमित वितरण तसेच रोग आणि किडींच्या प्रादुर्भावाचा मुख्य पिकावर विपरीत परिणाम झाल्यास आंतरपिकापासून निश्‍चित उत्पादन मिळते. आंतर आणि दुबार पिके प्रामुख्याने कडधान्य वर्गात मोजत असल्यामुळे या पिकापासून जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरणाचेही काम होते. विविध कडधान्यापासून साधारणपणे 20 ते 40 किलो नत्र प्रति हेक्‍टरी जमिनीत मिसळले जाते, त्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारतात. मुख्य आणि आंतरपिकाच्या समावेशामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

1) ज्वारी + तूर
ज्वारी + तूर आंतरपीक पद्धती 3ः3 अथवा 4ः2 ओळीच्या प्रमाणात शिफारस करण्यात आलेली आहे. ज्वारी आणि तूर सर्व दृष्टीने एकमेकांस पूरक आहेत. ज्वारीचे पीक निघाल्यावर ज्वारीच्या पाटातील ओलावा, अन्नद्रव्य तुरीच्या पिकास मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. तुरीचे पीक सलग पिकापेक्षाही जोमदार येऊन चांगले उत्पादन मिळते. तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव या आंतरपीक पद्धतीत कमी प्रमाणात होतो. ही एक स्वयंचलित फेरपालट होणारी आंतरपीक पद्धती असून एकाच शेतामध्ये गरज पडल्यास दोन ते तीन वर्षे घेता येते. रासायनिक खतांच्या मात्रेत 40 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व गरज असल्यास 40 किलो पालाश, पेरणीसोबत देण्यात यावे. पेरणीनंतर एक महिन्याने नत्राचा दुसरा हप्ता 40 किलो प्रती हेक्‍टरी फक्त ज्वारीच्या ओळीतून देण्यात यावा.

2) बाजरी + तूर
कमी पावसाचा भाग आणि मध्यम जमिनीसाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे. बाजरी आणि तूर पिकांचे ओळींचे प्रमाण 3ः3 ठेवावे. ही आंतरपीक पद्धती उशिरा पेरणीसाठी फायदेशीर आढळून आलेली आहे. रासायनिक खताच्या मात्रेमध्ये 30 किलो नत्र व 30 किलो स्फुरद पेरतेवेळी द्यावे. राहिलेली नत्राची 30 किलो मात्रा पेरणीनंतर एक महिन्याने द्यावी.

3) कापूस + मूग/ उडीद/ सोयाबीन
कापसाच्या दोन ओळींमध्ये मूग/ उडीद/ सोयाबीनची एक ओळ पेरून, ओळीचे प्रमाण 1ः1 ठेवावे. रासायनिक खताच्या नियोजनात कापसाची शिफारस केलेली पूर्ण मात्रा व आंतरपिकाची 50 टक्के खताची मात्रा मिळून एकूण खते देण्यात यावी. कापसाची अर्धी नत्राची मात्रा आंतरपीक निघाल्यानंतर कापसास बांगडी पद्धतीने देण्यात यावे. अलीकडील काही वर्षांपासून सोयाबीनखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आंतरपीकासाठी सोयाबीनच्या लवकर येणाऱ्या वाणाची निवड करण्यात यावी.

5) कापूस + तूर
ही एक पारंपरिक पट्टा पद्धती आहे. यामध्ये कापसाच्या सहा किंवा आठ ओळीनंतर तुरीची एक ओळ पेरावी.

6) सोयाबीन + तूर
सोयाबीन + तूर या आंतरपीक पद्धतीत दोन्ही पिके कडधान्य वर्गातील असून या आंतरपीक पद्धतीची शिफारस मध्यम ते भारी जमिनीसाठी करण्यात आलेली आहे. सोयाबीन आणि तूर या पिकांच्या ओळीचे प्रमाण 4ः2 असे ठेवावे. उशिरा पेरणीसाठीसुद्धा या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे. रासायनिक खताच्या व्यवस्थापनात 30 किलो नत्र, 60 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 30 किलो पालाश प्रती हेक्‍टरी पेरणीसोबत देण्यात यावे.

7) एरंडी + सोयाबीन
या आंतरपीक पद्धतीची शिफारस प्रामुख्याने पावसाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उशिरा पेरणीकरिता, मध्यम ते हलक्‍या जमिनीसाठी करण्यात आलेली आहे. या आंतरपीक पद्धतीत मुख्य आणि आंतरपिकाच्या ओळीचे प्रमाणे 1ः1 ठेवावे. रासायनिक खतांच्या व्यवस्थापनात 60किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश प्रति हेक्‍टरी पेरणीसोबत देण्यात यावे.

पावसाच्या ताणाचा परिणाम
1) पीक वाढीच्या प्राथमिक अवस्थेत पावसाचा ताण पडल्यास ताटांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट येते. पिकांच्या रोपांची सुरवातीची जोमदार वाढ नष्ट होऊन रोपे अशक्‍त बनतात. रोग, किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन उत्पादनामध्ये घट येते.
2) वाढीच्या अवस्थेदरम्यान पावसाचा ताण पडल्यास पिकाची वाढ खुंटते. ज्वारी, बाजरी, मका या पिकामध्ये पोटऱ्यात असलेल्या कणसाची वाढ खुंटते आणि कणसे बाहेर पडण्याचा कालावधी लांबतो. मूग, उडीद, सोयाबीनसारख्या पिकाची फुलगळ मोठ्या प्रमाणात होते.
3) पीक पक्वतेच्या कालावधीत पावसाचा ताण पडल्यास कणसातील दाण्यांची संख्या कमी होते, दाण्याचा आकार घटून वजनात मोठ्या प्रमाणात कमी येते. तूर आणि कपाशीसारख्या पिकात कळ्या, पाने, फुलाची मोठ्या प्रमाणात गळ होते.

संपर्क
(लेखक कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: