पश्चिम घाट परिसरातील अकोले (जि. नगर) या तालुक्यातील खडकी (बु.) आणि पुरुषवाडी या गावांतील बाळू भांगरे आणि देवराम कोंडार या आदिवासी तरुणांनी गावातील जैवविविधता दर्शविणारे रजिस्टर (नोंदवही) तयार केले आहे. या रजिस्टरमध्ये गाव परिसरातील विविध वनस्पती, पीक पद्धती, पशू-पक्षी, अवजारे, जमिनीचे प्रकार, परिसरातील बाजारपेठा आणि गावातील चालीरीती यासारख्या गोष्टींची नोंद ठेवण्यात येत आहे. प्रत्येक गावाने हा उपक्रम राबविला, तर हा ठेवा पुढील विकासासाठी निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल. अमित गद्रे अकोले (जि. नगर) तालुक्यातील शिसवद, पुरुषवाडी, खडकी (बु.) ही गावे म्हणजे सह्याद्रीच्या जैवविविधतेचे छोटेसे रूपच. या गावपरिसरात वनस्पतींची विविधता, औषधी वनस्पती, पशू-पक्षी, कीटक, पिकांचे देशी वाण, अवजारे, लोकांच्या चालीरीती अशा अनेक गोष्टींचा खजिना येथील निसर्गात दडलेला आहे. या गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई ठरलेली. यावर मात करण्यासाठी "वॉटर' संस्थेने जलसंधारण आणि ग्रामविकासाच्यादृष्टीने गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरवात केली. त्या वेळी भागातील जैवविविधता मानवी हस्तक्षेपामुळे कमी होत चालल्याचे दिसून आले. संस्थेने गेल्या चार वर्षांपासून परिसरातील लोकांना सोबत घेऊन वनस्पती, पशू-पक्षी, कीटक, पिकांच्या जातींचे संवर्धन आणि नोंदणीला सुरवात केली. यातूनच खडकी (बु.) येथील बाळू भांगरे आणि पुरुषवाडी येथील देवराम कोंडार यांनी जैवविविधता रजिस्टर (नोंदवही) तयार केले आहे. शेती आणि निसर्गसंवर्धनाची आवड असणारे बाळू भांगरे याविषयी म्हणाले, की बी.ए. पदवी घेतल्यानंतर निसर्गसंवर्धनाची शास्त्रीय माहिती होण्यासाठी संस्थेचा पर्यावरण विषयक दोन वर्षांचा कोर्स केला. या माहितीतून गाव परिसरातील विविध वनस्पती, पशू-पक्षी, पिकांच्या जातींची नोंद ठेवण्यासाठी दोन वर्षांपासून शास्त्रीय पद्धतीने जैवविविधता रजिस्टर तयार करण्यास सुरवात केली. गावातील वनस्पतींचे हर्बेरियमही तयार केले आहे.

देवराम म्हणजे निसर्गाची आवड असणारा हाडाचा चित्रकार. या चित्रकलेचा फायदा त्याला शिसवद गावाचे जैवविविधता रजिस्टर तयार करताना झाला. त्यांनी दुर्मिळ औषधी वनस्पती, परिसरातील पशू-पक्षी, कीटक, गावातील लोकांची वेशभूषा, धान्य साठविण्याच्या पद्धती, महिलांचे पारंपरिक दागिने, अवजारांचीही चित्रे काढली आहेत.
सुरवात जैवविविधता संवर्धनाची... शिसवद, खडकी (बु.), पुरुषवाडी परिसरात फिरताना वनस्पती, पशू-पक्ष्यांची विविधता दिसून येते. या भागातील काही शेतकऱ्यांनी भाताच्या वारंगळ, कोळपी, रायभोग, काळभाग, झिनी या जाती जपल्या आहेत. आता या जातींची लागवड केवळ घरापुरत्या तांदळासाठी मर्यादित राहिली आहे. चव, जातींचा काटकपणा पाहता या जातींचे संवर्धन आवश्यक आहे. येथील जंगल परिसरात खैर, धायर, कावळी, घावटी, रामेठा या महत्त्वाच्या वनस्पती सापडतात; परंतु त्यांचे संवर्धन न झाल्याने त्याही कमी होण्याच्या मार्गावर आहेत. काळचाट, बगळे, सुगरण, बुलबुल हे पक्षी पिकांवरील कीड नियंत्रणाला मदत करतात. या पक्ष्यांच्या अधिवासाचे शेतपरिसरातील संवर्धन महत्त्वाचे आहे. आता गावामधील जाणकार 15 लोकांचे जैवविविधता मंडळ स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये तरुण मुले आणि महिलांचाही समावेश आहे. हे मंडळ गाव परिसरातील जैवविविधता संवर्धनासाठी प्रयत्न करते. दर महिन्याला त्यांची बैठक होते. केवळ संवर्धन हा यामागचा उद्देश नाही, तर संबंधित प्रजातींची शास्त्रीय माहिती, बीज संकलन, वनस्पती, पशू-पक्ष्यांचे पर्यावरणातील महत्त्व याबाबतही गावकऱ्यांना समजावून सांगितले जाते. जैवविविधतेचे रजिस्टर तयार करण्यामध्ये खडकी (बु.) आणि शिसवद गावातील लोकांनी पुढाकार घेतला आहे. ते सांभाळण्याची जबाबदारी भांगरे आणि कोंडार यांच्यावर आहे. या उपक्रमाला आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. दर महिन्याला कोणती तरी नवी नोंद या रजिस्टरमध्ये होते. परिसरातील लोक आपणहून माहिती देण्यास पुढे येत आहेत. त्यांना वनसंपदेचे महत्त्व पटले आहे, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवते.
असे आहे गावाचे जैवविविधता रजिस्टर जैवविविधता रजिस्टरमध्ये नोंदणी करताना गावच्या जैवविविधता मंडळातील लोकांना संबंधित वनस्पती, जाती, तसेच अन्य गोष्टींची माहिती दाखविली जाते. तज्ज्ञांशी चर्चा केली जाते. रजिस्टरमधील नोंदणीसाठी सुसूत्रता आणि एकसारखेपणा येण्यासाठी विशिष्ट नोंदणी फॉर्म तयार करण्यात आला. त्यात वनस्पती, पशू-पक्ष्याचे स्थानिक नाव, शास्त्रीय नाव, वर्णन, आढळ, पूर्वीची स्थिती, सद्यःस्थिती, उपयोग, पारंपरिक उपयोग आदी माहितीची नोंद केली जाते. या परिसरात फुलपाखरांच्या 20 प्रजाती, 100 प्रकारचे पक्षी, वनस्पतींच्या सुमारे 150 प्रजाती, नदीतील माश्यांच्या 18 प्रजाती, तसेच विविध वनौषधी, कीटकांच्या प्रजाती दिसून आल्या. त्यांची माहिती अशी.
1) वनस्पती - शेतात, बांधावर, जंगल परिसरातील झुडपे, वृक्ष, तणे, वेली, गवते, रानभाज्या, कंदमुळे, औषधी वनस्पतींची शास्त्रीय माहिती नोंदविली आहे. यात हिरडा, बेहडा, कावळी, घावटी, रामेठा, तुळशी यासारख्या वनौषधींची; तसेच आणीव, तांबोळा, हैंदा, पंधा, चावा, बडधा यासारख्या दुर्मिळ कंदमुळांची नोंद आहे.
2) पशू-पक्षी - गाई, म्हशी, बैल, शेळी, मेंढी, कोंबड्यांच्या जाती; तसेच परिसरातील जंगली प्राणी, पक्षी, जलचर, कीटक, फुलपाखरे, सरपटणारे आणि उभयचर प्राण्यांची नोंद आहे.

3) पिके - गावपरिसरातील पिके, त्यांच्या जाती, तृणधान्य, कडधान्य, भाजीपाला पिके, पीक पद्धती, पाणी व्यवस्थापन, धान्य साठवणीच्या पद्धतींची नोंद आहे.
4) जमीन - परिसरातील जमिनींच्या प्रकारांची नोंद.
5) गावाचा इतिहास व बाजारपेठा ः गावाची ओळख, चालीरीती, जाती - जमाती, वेशभूषा, विशिष्ट ठिकाण, आठवडी बाजार, जनावरे, धान्य विक्री बाजारपेठांची माहिती.
खडकी (बु.) गावाच्या रजिस्टरमधील महत्त्वाच्या नोंदी 1) सुमारे 100 वनस्पती. बियाणे संग्रहात भात - 9, गहू - 2, वाटाणा - 2, हरभरा - 2, नाचणी - 1, वरई - 1, वाल - 4, हरभरा - 2, भाजीपाला - 18, रानभाज्या - 20 जाती.
2) गाव परिसरातील 22 पक्षी, सापांच्या 15 जाती, संग्रहात विविध पक्ष्यांची पिसे, सापांच्या काती जमा करण्यात आल्या.
3) नदी - ओढ्यांत आढळणाऱ्या 17 माशांच्या जाती.
4) सात फुलपाखरांच्या प्रजाती, पाळीव प्राणी, पशू-पक्षी, कीटक, जलचर अशा सुमारे 200 नोंदी.
गावातील 15 शाळांत "मुलांमार्फत जैवविविधता रजिस्टर' तयार करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. शिसवद गावात झालेल्या निसर्ग पर्यटन उत्सवाच्या माध्यमातून 25 गावांपर्यंत जैवविविधता रजिस्टर पोचले आहे.
अमरकंद, जंगली लिंबू नामशेषाच्या वाटेवर? देवराम कोंढार आपली अल्प शेती सांभाळून जैवविविधतेचे काम करीत आहेत. आपले अनुभव सांगताना ते म्हणाले, की परिसरातील जैवविविधतेचे नोंदणीकरण करताना आम्हाला अनेक गोष्टी समजल्या. पांगिरा, सायर, बहावा यासारख्या वनस्पतींची संख्या कमी होत चालली आहे. फुलोरा कमी होत चालल्याने मधमाश्यांची संख्याही कमी होत आहे. अमरकंद, जंगली लिंबू हे देखील दुर्मिळ होत आहेत. आम्ही गावकरी, गुराखी यांच्याकडून वनस्पतींची अधिक माहिती घेऊन त्यांची नोंदणी करीत आहोत.
भाताच्या 10 ते 12, वाटाण्याच्या दोन, तसेच कापसाच्या काही जाती आम्हाला आढळल्या. काही शिकारी पक्षीही कमी होत आहेत. जैवविविधतेचा ठेवा आम्हाला कोणत्याही दुष्काळी परिस्थितीत उपयोगी ठरणार आहे.
रजिस्टर तसेच पेंटिंगच्या माध्यमातून हा ठेवा जतन करीत आहोत.
संपर्क बाळू भांगरे - 9021546383
देवराम कोंढार - 9595295933