Last Update:
 
ऍग्रो मार्केट

तांबडी मिरची, मका तेजीत... वायदे बाजार
डॉ. अरुण कुलकर्णी
Friday, June 15, 2012 AT 02:30 AM (IST)
Tags: agri,   sakal,   agrowon,   market,  
नुकतेच अमेरिकेच्या कृषी खात्याने जागतिक शेती उत्पादन व पुरवठ्याचे नवीन अंदाज प्रसिद्ध केले. या सप्ताहात "एनसीडीईक्‍स'मध्ये मिरची, मका, साखर, सोयाबीन, हळद, हरभरा आणि गव्हाचे नवीन करार सुरू झाले आहे. या सप्ताहात तांबड्या मिरचीच्या किमती 15.5 टक्‍क्‍यांनी वाढल्या आहेत.

गेल्या सप्ताहात मॉन्सूनची प्रगती समाधानकारक नव्हती. 1 जून ते 10 जून या दरम्यान देशातील शेतीखालील क्षेत्र लक्षात घेऊन काढलेला, पर्जन्य-निर्देशांक फक्त 31 होता. थोडक्‍यात या कालावधीत सरासरीपेक्षा देशात पाऊस 70 टक्के कमी झाला. याचा परिणाम काही प्रमाणात किमती वाढण्यावर झाला. सर्वच शेतीमालाच्या फ्युचर्स किमती गेल्या सप्ताहात वाढल्या. याची माहिती आलेखामध्ये दिली आहे. या सप्ताहात "एनसीडीईक्‍स'मध्ये मिरची (20 सप्टेंबर 2012), मका (19 ऑक्‍टोबर 2012), साखर (20 डिसेंबर 2012) सोयाबीन (19 ऑक्‍टोबर 2012 आणि 20 नोव्हेंबर 2012), हळद (20 सप्टेंबर 2012), हरभरा (20 नोव्हेंबर 2012) व गहू (20 डिसेंबर 2012) यांचे नवीन करार सुरू झाले. 8 जून 2012 पासून सोयाबीन वरील स्पेशल मार्जिंन 10 टक्‍क्‍यांवरून पाच टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. 12 जून 2012 रोजी अमेरिकेच्या कृषी खात्याने (USDA) जागतिक शेती उत्पादन व पुरवठ्याचे नवीन अंदाज प्रसिद्ध केले. 5 जून ते 12 जून 2012 दरम्यान "एनसीडीईएक्‍स'मधील निरनिराळ्या किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते.

तांबडी मिरची ः
एक एप्रिलनंतर मिरचीच्या (जुलै 2012) फ्युचर्स किमती उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 7.4 टक्‍क्‍यांनी उतरल्या होत्या. या सप्ताहात त्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे 15.5 टक्‍क्‍यांनी वाढल्या. आवक कमी व पाऊस लांबल्यामुळे ही वाढ झाली आहे.

गूळ ः
एक एप्रिलनंतर गुळाच्या (जुलै 2012) फ्युचर्स किमती 17 एप्रिलपर्यंत वाढत त्यांनी रु. 1230 ची पटली गाठली. त्यानंतर त्या उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 0.9 टक्‍क्‍याने वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या आणखी फ्युचर्स किमती 1.1 टक्‍क्‍याने वाढल्या. सध्या मागणी स्थिर आहे.

कपाशी ः
26 एप्रिलनंतर कपाशीच्या (फेब्रु. 13) फ्युचर्स किमती रु. 1000 च्या आसपास स्थिर आहेत. गेल्या सप्ताहात या 3.7 टक्‍क्‍यांनी उतरल्या होत्या. या सप्ताहात मात्र त्या 2.7 टक्‍क्‍यांनी वाढल्या. अमेरिकी कृषी खात्याच्या नवीन अंदाजानुसार वर्ष-अखेरच्या जागतिक साठा वाढेल; त्याचबरोबर चीनची आयात वाढेल असे दिसते. आपल्याकडील निर्यातीवरील नियंत्रणे कमी करण्यात आली आहेत. पुढील दोन सप्ताहांत किमतीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.

मका ः
मक्‍याच्या (जुलै 2012) किमती गेल्या महिन्यात (एक एप्रिलनंतर) उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 5.2 टक्‍क्‍यांनी उतरल्या होत्या. या सप्ताहात त्या 1.6 टक्‍क्‍यांनी वाढल्या. अमेरिकी कृषी खात्याने गेल्या अंदाजापेक्षा जागतिक उत्पादनाचा नवीन अंदाज वाढवलेला आहे. पावसाने अशीच ओढ दिली तर किमती पुढील काही दिवसांत वाढण्याची शक्‍यता आहे.

साखर ः
साखरेच्या (जुलै 2011) किमती एक एप्रिलनंतर तीन मेपर्यंत वाढत होत्या. नंतर त्या घसरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 0.7 टक्‍क्‍याने उतरल्या होत्या. या सप्ताहात त्या 0.8 टक्‍क्‍याने वाढल्या. साखरेचे उत्पादन या हंगामात जरी चांगले होत असले तरी नवीन अंदाजानुसार पूर्वीच्या अंदाजापेक्षा काहीशी घट संभवते. अमेरिकी कृषी खात्याच्या नवीन अंदाजानुसार पुढील वर्षाच्या अमेरिकेतील उत्पादनात वाढ संभवते. जागतिक मागणीत सुधारणा शक्‍य आहे. पुढील दोन सप्ताहांत साखरेच्या किमतीत मर्यादित बदल संभवतात.

सोयाबीन ः
सोयाबीनच्या जुलै 2012 च्या फ्युचर्स किमती एक एप्रिलनंतर दोन मेपर्यंत सतत वाढत होत्या. त्यानंतर 14 मेपर्यंत त्या घसरत होत्या. गेल्या सप्ताहात त्या 2.5 टक्‍क्‍यांनी उतरल्या होत्या. या सप्ताहात त्या 2.4 टक्‍क्‍यांनी वाढल्या. अमेरिकेतील उत्पादनाच्या वाढीव अंदाजामुळे गेल्या सप्ताहातील घट झाली होती. जागतिक मंदी, युरोपमधील आर्थिक अस्थिरता, अमेरिकेच्या निर्यातीतील घट यांचा परिणाम म्हणून किमती कमी होत आहेत. पाऊस जर समाधानकारक झाला तर पुढील दोन सप्ताहांत किमती कमी होण्याचा संभव आहे.

हळद ः
एक एप्रिलनंतर हळदीच्या किमतीत (जुलै 2012) 11 मेपर्यंत वाढ होत होती. त्यानंतर त्या उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 8.8 टक्‍क्‍यांनी उतरल्या होत्या. या सप्ताहात मात्र त्या 3.8 टक्‍क्‍यांनी वाढल्या. या वर्षी हळदीचे विक्रम उत्पादन अपेक्षित आहे. आवक वाढती झाली आहे. लांबवरचा कल किंमत कमी होण्याचा आहे.

हरभरा ः
हरभऱ्याच्या किमती (जुलै 2012) एक एप्रिलनंतर काही दिवस उतरत होत्या. नंतर त्यांनी चढत 4500 रुपयांची पातळी गाठली. नऊ मेनंतर त्या 4400 ते 4300 रुपयांच्या दरम्यान आहेत. गेल्या सप्ताहात मात्र त्या 7.3 टक्‍क्‍यांनी उतरल्या होत्या. या सप्ताहात त्या 1.2 टक्‍क्‍याने वाढल्या. शासनाच्या नवीन अंदाजानुसार या वर्षी हरभऱ्याचे उत्पादन गेल्या वर्षापेक्षा कमी होणार आहे. पुढील वर्षासाठी खरीप कडधान्यांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याची शिफारस केली गेली आहे. या सर्वांमुळे हरभऱ्याचा लांबवरचा कल वाढता राहिला असे दिसते. मात्र या वर्षी खरीप कडधान्याखाली किती क्षेत्र लागवडीखाली येईल. पाऊस कितपत अपेक्षा पुऱ्या करेल यावर किमती अवलंबून राहतील.

गहू ः
एक एप्रिलनंतर गव्हाच्या (जुलै 2012) किमती सतत उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या 2.8 टक्‍क्‍यांनी उतरल्या होत्या. या सप्ताहात त्या परत 0.9 टक्‍क्‍याने वाढल्या. अमेरिकी कृषी खात्याने अमेरिकेतील गव्हाचा पुरवठा व जागतिक गव्हाचे उत्पादन यांच्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा नवीन अंदाज उतरवले आहेत. त्याचा परिणाम म्हणून काही प्रमाणात ही वाढ झाला आहे.

बटाटा ः
बटाट्याच्या (जुलै 2012) किमती एक एप्रिलनंतर मोठ्या प्रमाणावर उतरत आहेत. गेल्या सप्ताहात त्या दोन टक्‍क्‍यांनी वाढल्या होत्या. या सप्ताहात त्या आणखी 3.8 टक्‍क्‍यांनी वाढल्या. पाऊस जर समाधानकारक झाला तर ही वाढ रोखली जाईल.


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: