अध्यात्म
- (डॉ. सदानंद मोरे)
Saturday, June 16, 2012 AT 02:30 AM (IST)
ऐसे नाना वेष घेऊनी हिंडती । पोटालागी घेती प्रतिग्रह ।।
परमार्थासी कोण त्यजी संवसार । सांगावा साचार नाव त्याचे ।।
जन्मता संसार त्यजियला शुके । तोचि निष्कलंक तुका म्हणे।।
सर्वसाधारण भारतीय जनमानस सश्रद्ध आहे. त्याला जणू स्वभावतःच पारलौकिकाची ओढ असते. त्यासाठी कोणी मार्गदर्शक- गुरू भेटेल तर त्याला खूपच आनंद होतो. अशा गुरूंसाठी त्याग करायलाही ते तयार असते. त्याच्या या वृत्तीच्या गैरफायदा घेऊन त्याचे शोषण करणारे महाभाग जसे आज आढळतात तसे ते तुकोबांच्या काळीही होते. ही मंडळी सर्वच पंथोपंथांत सापडणार हे उघड आहे. त्या त्या संप्रदायास संमत असणारा पवित्र पेहरावा करून पारमार्थिक असल्याचे सोंग असे गुरू आणीत व भोळ्याभाबड्या अनुयायांची लूट करीत. तुकोबांनी अशा पोषाखी पारमार्थिकांविरुद्ध आघाडीच उघडली. त्यांचे बुरखे फाडून त्यांचे खरे स्वरूप लोकांना दाखवणे हे त्यांचे एक मुख्य कार्य होते. प्रस्तुत अभंगाच्या पहिल्याच चरणात त्यांनी वेषधारी पारमार्थिक भिक्षेकऱ्यांवर ते पोटासाठी प्रतिग्रह म्हणजे भिक्षा मागण्याचे व्रत घेतात असे स्पष्ट सांगितले आहे. या अभंगाच्या अगोदर आलेल्या सलग सात अभंगांमधून तुकोबांनी अशा साधूंच्या वेषांचे व दुराचारांचे वर्णन केले आहे.
या साधूंमध्ये पहिल्यांदा भगवे कपडे घालून आपणास संन्यासी म्हणवणाऱ्यांच्या उल्लेख येतो. वस्तुतः संन्याशाने आपल्या जिभेवर ताबा मिळवला पाहिजे. जे काही मिळेल, त्याच्या चवीकडे दुर्लक्ष करून केवळ शरीरधारणेसाठी आवश्यक इंधन म्हणून ग्रहण केले पाहिजे. पण हे तर चवीचे चोचले पुरवण्याच्या मागे काही साधक लांब जटा वाढवून सर्वांगाला भस्माचे लेपन करतात. काही नाथपंथी जोगी कान फाडून त्या छिद्रांत धर्माचे प्रतीक असलेल्या मुद्रा अडकवतात, मलंग नावाचे फकीर अंगावर वाघाचे कातडे पांघरून त्यावर लोखंडी साखळ्या बांधतात व मोठमोठ्याने आरोळ्या ठोकतात, महानुभाव पंथाचे काही साधू मुंडण करून काळी वस्त्रे परिधान करतात. हातात उलटी काठी घेऊन सर्वांना उपदेश करतात. शिवभक्त म्हणवणारे काही जंगम विभूती लावून घरोघरी जातात. शंख फुंकतात व घंटानाद करतात. कोणी एक पांढऱ्या शुभ्र रंगाचे कौपिन नामक वस्त्र धारण करून वावरतात. अशा महंतांसाठी शिव काय, कृष्ण काय पोट भरण्याची साधने आहेत. आदर्श साधू म्हणजे शुकाचार्य. ते पूर्णपणे वैराग्यशील होते. त्यांचा आदर्श कोणीच घेत नाही. पण ""तुका म्हणे ऐसे मावेचे मविंद । त्यापाशी गोविंद नाही नाही ।।''