राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता
- (प्रतिनिधी)
Saturday, June 16, 2012 AT 04:15 AM (IST)
पुणे - नैर्ऋत्य मोसमी पावसाने अरबी समुद्र, दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग (सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याचा काही भाग) त्याचबरोबर दक्षिण भारत आणि बंगालच्या उपसागराचाही काही भाग व्यापला आहे. येत्या तीन दिवसांत पाऊस आणखी उत्तरेला सरकून कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच दक्षिण भारत आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागांत दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती आहे. येत्या 48 तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पावसाने ओढा दिल्यामुळे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान जळगाव आणि नागपूर येथे 39.4 अंश से. इतके नोंदवले गेले. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. गेल्या 24 तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला.
गेल्या 24 तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः
मुंबई 34.8, अलिबाग 32.1, रत्नागिरी 32.5, पणजी 31.8, डहाणू 36.2, पुणे 36.0, अहमदनगर 37.7, जळगाव 39.4, कोल्हापूर 33.0, महाबळेश्वर 25.9, मालेगाव 39.0, नाशिक 35.6, सांगली 34.4, सातारा 34.3, सोलापूर 38.0, औरंगाबाद 36.0, परभणी 38.2, अकोला 38.5, अमरावती 39.0, बुलडाणा-चंद्रपूर-गोंदिया 39.1, नागपूर 39.4, वर्धा 39.0, यवतमाळ 37.6, ब्रह्मपुरी 35.5.
""राज्यात मॉन्सून वाढण्यास परिस्थिती अनुकूल झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पूर्वमोसमी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.''
- डॉ. मेधा खोले, उपमहासंचालिका (हवामान अंदाज)