Last Update:
 
मुख्य पान

खरिपाच्या देवा, ये आमच्या गावा
-
Sunday, June 17, 2012 AT 01:00 AM (IST)
Tags: rain,   kharip,   pune,   maharashtra
पुणे - संपूर्ण खरीप व रब्बी हंगाम ज्या "मॉन्सून'च्या पावसावर अवलंबून आहे, त्याची वाटचाल सध्या थांबली आहे. अगदी तळ कोकणापासून ते पूर्व विदर्भापर्यंत सर्वत्र पेरणीयोग्य पावसाच्या प्रतीक्षेत बळिराजा आहे. राज्यातील 33 जिल्ह्यांपैकी फक्त चार जिल्ह्यांत नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) पोचले असून पावसाने जून मध्याची सरासरीही गाठलेली नसल्याने खरीप पेरणीसह पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्‍न ऐरणीवर येऊ पाहत आहे.

मॉन्सूनचा पाऊस वेळेत पडल्यास राज्यात चालू खरिपात एक कोटी 50 हजार हेक्‍टरवर पेरण्या होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत फक्त दीड लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. पावसाचा मुख्य महिना असलेल्या जूनचा पहिला पंधरवडा कोरडा गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भाताची रोपे तयार करण्यासाठी आणि कापूस व सोयाबीनच्या पेरणीसाठी पावसाची तातडीची गरज आहे. खरिपाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्येच आतापर्यंत मॉन्सूनने पाठ फिरवलेली आहे.

गेल्या वर्षी या वेळेपर्यंत राज्यात जोरदार पावसाला सुरवात झाली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी विक्रमी अतिवृष्टीसह तब्बल 629 मिलिमीटर पाऊस कोसळला होता. त्या तुलनेत यंदा पाऊस रोडावल्याची स्थिती आहे. पावसाचे आगर असलेल्या कोकणापासून गडचिरोलीपर्यंत सर्वत्र शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागले आहेत.

जिल्हानिहाय 13 जूनपर्यंतचा पाऊस ः यंदाचा व कंसात गेल्या वर्षीचा (मिलिमीटरमध्ये)
रत्नागिरी 36.9 (148.9), रायगड 61.7 (431.3), रत्नागिरी 126 (539.5), सिंधुदुर्ग 188.6 (619.5), नाशिक 28 (44.3), धुळे 16.5 (40.2), नंदुरबार 4.8 (53.5), जळगाव 5.3 (20.4), नगर 2.1 (53.9), पुणे 12.5 (131.2), सोलापूर 18.3 (28.9), सातारा 30.6 (110.7), सांगली 26.8 (47.9), कोल्हापूर 52.2 (240.3), औरंगाबाद 4.9 (49.8), जालना 2.4 (22.6), बीड 8.9 (45.2), लातूर 8.2 (27.2), उस्मानाबाद 8.4 (36.7), नांदेड 2.5 (29.4), परभणी 3.4 (36.1), हिंगोली 7.9 (41.3), बुलडाणा 14.4 (36.3), अकोला 46.6 (58.1), वाशीम 15.2 (25.3), अमरावती 52.5 (38.7), यवतमाळ 32.8 (36.5), वर्धा 17.6 (31.5), नागपूर 30.5 (47.4), भंडारा 9.1 (39.2), गोंदिया 0 (36.9), चंद्रपूर 21.7 (23.8), गडचिरोली 7.7 (28.8).


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: