नारळदिनाच्या आयोजनासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून प्रस्ताव
-
Saturday, June 23, 2012 AT 02:00 AM (IST)
रत्नागिरी (प्रतिनिधी) : जागतिक नारळ दिनासाठी सिंधुदुर्ग जिल्हाही उत्सुक असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या श्रीफळ उत्पादक संघानेही सावंतवाडी येथे देशस्तरावर नारळदिन साजरा करण्याची उत्सुकता दर्शविली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे वरिष्ठ महाविद्यालयाने या कार्यक्रमासाठी सक्रियता दर्शविल्याने हे दोन्ही प्रस्ताव नारळ विकास मंडळाकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती मंडळाचे उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी दिली.
जागतिक स्तरावर दोन सप्टेंबरला साजरा करण्यात येणारा नारळदिन यंदा प्रथमच महाराष्ट्रात साजरा करण्याची तयारी नारळ विकास मंडळाने सुरू केली होती. तशी अनुकूलता मंडळाने अलीकडेच मंडळाच्या कोची विभागाचे अध्यक्ष टी. के. जोस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दर्शविली होती. देशात केंद्रीय स्तरावर मंडळाची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच जागतिक नारळदिन महाराष्ट्रात होणार आहे. यासंदर्भात पाटपन्हाळे येथे झालेल्या बैठकीत गुहागर आणि सावंतवाडी तालुक्याचे प्रस्ताव आले असल्याचे श्री. लिमये यांनी सांगितले.
यंदा जागतिक स्तरावरचा नारळदिन केंद्रीय पातळीवर कोकणात साजरा होणार आहे. त्यासाठी अनुकूल संस्थांची आणि उत्सुकांची चाचपणी करण्यात येत असून त्यामध्ये आता रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्हाही सक्रिय झाला आहे. हे दोन्ही प्रस्ताव मंडळाकडे देण्यात आले असून मंडळाची उच्चस्तरीय समिती याबाबतचा निर्णय लवकरच होणाऱ्या बैठकीत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.