Last Update:
 
ऍग्रो प्लॅनिंग

पपईवरील मिलीबगचे करू या जैविक पद्धतीने नियंत्रण
-
Wednesday, June 27, 2012 AT 02:00 AM (IST)
Tags: agro planing

पपईवरील मिलीबग ही अत्यंत घातक कीड आहे. यंदा पुण्याबरोबर सोलापूर भागातही या किडीचा आढळ झाला आहे. परोपजीवी मित्रकीटकांचा वापर करून या किडीवर नियंत्रण आणणे शक्‍य आहे.
सय्यद शाकीर अली, डॉ. ला. रा. तांबडे

यंदा सोलापूर जिल्ह्यात एका शेतकऱ्याच्या पपई बागेत पपई मिलीबगचा प्रादुर्भाव दिसून आला. हे शेतकरी सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रशिक्षणार्थी आहेत. साहजिकच या किडीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा धोका लक्षात घेऊन सोलापूरच्या कृषी विज्ञान केंद्राने त्वरित हालचाली सुरू केल्या. केंद्राने महात्मा फुले कृषी विद्यापीठमधील शास्त्रज्ञांची मदत घेण्याबरोबरच शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि प्रबोधन कार्यक्रम घेण्यासही सुरवात केली. साहजिकच हा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केव्हीकेतर्फे प्रयत्न केले जात आहेत. या किडीची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने केंद्रातील तज्ज्ञांनी याविषयी हा लेख दिला आहे.

पपईवरील मिलीबग
पपईवर प्रथमच पॅराकोकम मार्जिनॅट्‌स हा मिलीबग कोइमतूर येथे जुलै 2008 ला आढळून आला. तसेच पुणे परिसरातील एका पपई बागेत सन 2010 मध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला. एनबीएआयआय या बंगळूर येथील संस्थेत त्याविषयी राष्ट्रीय पातळीवर चर्चासत्र झाले. या वेळी विविध राज्यांतील तज्ज्ञांना या किडीच्या नियंत्रणाची माहिती देण्यात आली. या किडीच्या जैविक नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
मिलीबगच्या नियंत्रणासाठी ऍसिरोफॅगस पपए, स्युडलेप्टोमॅस्टीक्‍स मॅक्‍सिकाना आणि ऍनागायरस लॉकी हे मित्र कीटक उपयुक्त आहेत. या तीनही कीटकांचे उत्पादन मिलीबग प्रादुर्भावीत शेतात करता येते.

तमिळनाडू कृषी विद्यापीठात झालेल्या संशोधनावर आधारित पुढील माहिती देण्यात आली आहे.
पपईवरील मिलीबग (पिढ्या ढेकूण) -

शास्त्रीय नाव - पॅराकोकस मार्जिनॅटस
वर्णन - छोट्या ते मध्यम आकाराचा, पिवळसर रंगाचा कीटक अंगावर मेणचट व धागेदार आवरण.
लांबी - 2.2 मि.मी. व रुंदी 1.5 मि.मी. अंगावर धाग्याचे आवरण आल्यावर त्याचा अचूक रंग ओळखणे कठीण.
जीवनक्रम - मादी - चार अवस्था - अंडी, पिल्लावस्था एक, पिल्लावस्था दोन आणि प्रौढ.
नर - सहा अवस्था - अंडी, पिल्लावस्था एक, पिल्लावस्था दोन, कोष आणि प्रौढ.
किडीच्या सुरवातीच्या अवस्थेला रांगणारी अवस्था (काऊलर) म्हणतात. अंड्यातून बाहेर आल्याबरोबर ही पिल्ले इकडून तिकडे हालचाल करीत पिकाचा योग्य किंवा नाजूक भाग शोधून खाण्यास सुरवात करतात. त्यानंतरच्या अवस्थेत मात्र ती हालचाल करीत नाही. नर हे कमी कालावधीसाठी जिवंत राहतात. मादीशी मीलन झाल्यानंतर ते मरतात.
 
पिकावरील लक्षणे -
सुरवातीला प्रादुर्भावग्रस्त भाग पिवळा पडतो, नंतर तपकिरी होऊन वाळून जातो. मिलीबग आपल्या शरीरातून मधासारखा चिकट द्रव सोडतात. त्यावर कॅप्नोडियम म्हणून काळ्या बुरशीची वाढ होऊन भाग काळा दिसतो.
 
प्रादुर्भाव ओळखण्याची लक्षणे -
* पाने पिवळी पडणे.
* पाने वेडीवाकडी होणे.
* पानांची वाढ थांबते, पाने व फळगळ होते.
* लाल किंवा काळ्या मुंग्या वाढतात.
* पानाच्या खालच्या भागावर मधासारखा पदार्थ दिसतो. त्यावर काळी बुरशीची वाढ होऊन पाने काळे दिसतात.
 
प्रसार होण्याचे स्रोत 
* रोपे, प्रादुर्भावग्रस्त कोणतीही सामग्री, तणे, मुंगळे व वारा.

पर्यायी व यजमान पिके -
मिलीबग बहुपीकभक्षी असल्यामुळे पपई, कापूस, जंगली तुती, शोभिवंत वनस्पती, गाजर गवत व अन्य तणे जट्रोफा, पेरू, तूर, साबुदाणा, वांगी, टोमॅटो, मिरची, सूर्यफूल, फळे व भाजीपाला पिकावर आढळून येतो.
किडीचा प्रसार का होऊ शकतो?
* कीटकनाशकांचा अवाजवी झालेला वापर.
* बहुभक्षी म्हणजे विविध पिकांत ही कीड जाते.
* व्यापक क्षमतेच्या कीटकनाशकांचा वापर.
* विविध कीटकनाशके एकमेकांत मिसळून मारणे.
* उच्च पुनरुत्पादन करण्याची क्षमता.
* कमी वेळात अधिक पिढ्या तयार होतात.
* किडीच्या शरीरावर मेणचट आवरण, त्यामुळे त्यातून रसायन आत शिरण्यास अडथळा.
* हवामानबदल, तापमान व कार्बन- डाय- ऑक्‍साइडची पातळी वाढणे.

व्यवस्थापन -
* बागेतील तणे उपटून त्यांचे नियंत्रण करणे.
* पिकाचा प्रादुर्भावग्रस्त भाग काढून त्यांचा नायनाट करणे.
* मिलीबगच्या रांगणाऱ्या अवस्थेवर नियमित देखरेख वा सर्वेक्षण.
* अधिकाधिक नियंत्रणासाठी प्रादुर्भावाच्या सुरवातीच्या काळातच मित्र कीटकाच्या कार्यावर लक्ष ठेवणे. 

पपईवरील मिलीबगचे रासायनिक नियंत्रण करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी तज्ज्ञांशी चर्चा करावी. चुकीच्या रसायनांच्या वापराने मित्र कीटकांची हानी होऊ शकते. ऍसिरोफॅगस हा मित्र कीटक पुणे येथील कृषी महाविद्यालय तसेच एनबीएआयआय (बंगळूर) येथे मोफत उपलब्ध होऊ शकतो. कृषी विज्ञान केंद्रातर्फे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊनही मार्गदर्शन करण्यात येत आहे. परोपजीवी मित्र कीटकांच्या उपलब्धतेसाठी कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर तर्फेही मदत करण्यात येत आहे.

संपर्क -
डॉ. ला. रा. तांबडे- (कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र)-
प्रा. सय्यद शाकीर अली- (विशेष विशेषज्ञ)


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: