आळवणी वरुणराजाची!
-
Wednesday, June 27, 2012 AT 02:30 AM (IST)
काही द्राक्ष उत्पादकांना टॅंकरने पाणी आणून बागा जगविण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. या शेतकऱ्यांपुढे दुसरा पर्यायही नाही. शेतीबरोबरच शहरांचा आणि ग्रामीण भागांतील पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
पावसाचा खंड वाढत जातोय तशी सगळ्याच स्तरांत धास्ती वाढू लागली आहे. पाऊस वेळेत येईल आणि सरासरीइतका होईल, या हवामान खात्याच्या अंदाजाला टांग देत वरुणराजा अद्याप साऱ्यांना हुलकावणी देतो आहे. जून महिन्याची अखेर आली तरी पाऊस कोठे झाला, कोठे नाही, अशीच स्थिती आहे. उन्हाळ्यातच कोरड्या पडलेल्या धरणांच्या साठ्यात भर पडणे दूरच, त्यांचे पाणलोट क्षेत्रही भिजलेले नाही. असमान वितरण हा मुद्दा तर यंदा मोसमी पावसाच्या आगमनापासून जाणवतो आहे. कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत जोरदार पाऊस झाला आहे. नंतर तो पुन्हा गायब झाला आहे. आताही काही ठिकाणी पाऊस पडतो आहे, तर काही ठिकाणी त्याने अजिबात तोंडही दाखवलेले नाही.
कृषी खात्याच्या कृपेमुळे यंदा खते, बियाण्यांसाठी फारसा उपद्व्याप करावा न लागल्याने शेतकरी खुशीत होता. खते, बियाणे हाताशी असले आणि काहींनी पेरण्याही उरकून घेतल्या असल्या तरी पावसानेच दडी मारल्याने खरीप हंगामच धोक्यात येण्याची भीती व्यक्त होते आहे. बऱ्याच ठिकाणी दुबार पेरण्या कराव्या लागणार आहेत. त्यासाठी महागडे बियाणे विकत आणण्यासाठी शेतकऱ्यांना पदरमोड करावी लागणार आहे. कृषी खात्याच्या माहितीनुसार आतापर्यंत केवळ नऊ टक्के पेरण्या झाल्या आहेत. बागायती कापूस आणि सोयाबीनचा त्यात समावेश आहे. हे झाले खरिपाचे चित्र. दुसरीकडे फळबागा पाण्याअभावी अडचणीत आल्या आहेत. विशेषतः द्राक्षे आणि डाळिंबांना मोठा फटका बसला आहे. काही द्राक्ष उत्पादकांना तर टॅंकरने पाणी आणून बागा जगवण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. या शेतकऱ्यांपुढे दुसरा पर्यायही नाही. शेतीबरोबरच शहरांचा आणि ग्रामीण भागांतील पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेची चांगलीच धावाधाव सुरू झाली आहे. शहरांसाठी रेल्वेच्या वाघिणींतून पाणी आणण्याचे नियोजन सुरू झाले आहे. सगळ्या देशातच पावसाची स्थिती गंभीर असल्याने हे पाणी कोठून आणणार ते मात्र समजत नाही. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या आणखीनच गंभीर आहे. पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन हजार गावे आणि पाच हजार वाड्या-वस्त्यांना अडीच हजार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अन्य गावांची स्थिती सध्या बरी असली तरी ती केव्हाही रुग्णाईत होऊ शकते. पाण्याची साठवणूक, त्याचे काटेकोर नियोजन, पाणलोट विकास हे मुद्दे या निमित्ताने पुन्हा ऐरणीवर आले आहेत. यापासून आपण काही शिकणार आहोत, की माकडाच्या घराच्या गोष्टीप्रमाणे दरवर्षी वेळ निघून गेल्यावर या विषयावर चर्वितचर्वण करणार आहोत?