Last Update:
 
ऍग्रो प्लॅनिंग

खुंटरोपांचा रिकट घेण्यास योग्य स्थिती
-
Friday, June 29, 2012 AT 01:30 AM (IST)
Tags: agro planing

सध्याच्या परिस्थितीत पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता या दोन महत्त्वाच्या गोष्टी दिसून येतात. याच परिस्थितीचा फायदा घेऊन बागेस खुंटरोपांचा रिकट घेऊन नवीन फुटींची वाढ करून घ्यावी व त्यानंतरचे व्यवस्थापन आवश्‍यकतेप्रमाणे करावे.
डॉ. जे. सतीशा, डॉ. आर. जी. सोमकुंवर

द्राक्ष बागेत नवीन लागवड म्हटली, की जवळपास नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासूनच आपण लागवडीसंदर्भातील सर्व मुद्दे लक्षात घेऊन जमीन तयार करण्यापासूनची तयारी करतो. द्राक्ष लागवडीकरिता सुरवातीस खुंटरोपांची लागवड करण्याचा निर्धार करूनच जमिनीची पूर्वतयारी करणे इ. गोष्टींचा विचार करतो. म्हणजेच शेतकरी द्राक्ष लागवडीच्या कामात नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासूनच पूर्णपणे व्यस्त असतो. लागवडीपूर्वी तयारी झाल्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात खुंटरोपांची लागवड केली जाते. ही लागवड केल्यानंतर रोपांची मुळे जमिनीत रुततात व त्यानंतर वाढ व्हायला सुरवात होते. हे होत असताना वातावरणातील तापमानातदेखील वाढ होते व आर्द्रता कमी होते. याचाच परिणाम म्हणजे पाण्याचा तुटवडा होऊन खुंटरोपांची आवश्‍यक अशी अपेक्षेप्रमाणे वाढ होत नाही. चांगले वातावरण बागेत जरी असले तरी सुरवातीच्या काळात चांगली वाढ होते व त्यानंतर ही वाढ खुंटून काडी परिपक्व व्हायला सुरवात होते.

कलम करण्याचा कालावधी -
बागेत कलम करणे म्हणजे आवश्‍यक त्या द्राक्षजातीची निवड करून त्यावर डोळा भरणे. कलम करण्याकरिता बागेत काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे असते. कलम करण्याकरिता पुढील महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात ः
1) कलम हे जमिनीपासून एक ते सव्वा फूट अंतरावर करावे. यामुळे खुंटरोपातील असलेले महत्त्वाचे गुणधर्म उपयोगात आणता येतात व त्याचसोबत सायन काडीमध्ये अन्नद्रव्याचे साठवण करणेसुद्धा सोपे होते.
2) कलम करण्याकरिता खुंटकाडीची जाडी जवळपास आठ ते दहा मि.मी. असावी. यामुळे सायन काडीमध्ये व खुंटकाडीमध्ये असलेले अन्नद्रव्य पुरेपूर फायदा घेऊन सायन काडीची वाढ चांगली होईल. डोळा फुटण्याकरिता हे अन्नद्रव्य महत्त्वाचे असते.
3) कलम करतेवेळी खुंटकाडी रसरशीत असावी. ही काडी रसरशीत असल्यास कलमजोड व्यवस्थितरीत्या व लवकर भरून निघतो.
4) सायन काडी कलम करतेवेळी कोवळी ते परिपक्व अशी असावी. रसरशीत काडीमध्ये वेलीच्या वाढीकरिता आवश्‍यक असलेल्या द्रव्याचे किंवा रसाचे वहन चांगले होते. यालाच "सॅप फ्लो' असेसुद्धा म्हणतात. सॅपचे जर व्यवस्थित वहन होत असेल तर कलम जोड लवकर भरून निघतो व जमिनीतून उपलब्ध केलेले अन्नद्रव्य व पाणी सहजरीत्या उचलून कलम काडीचे संगोपन चांगल्या प्रकारे करता येते.
5) कलम यशस्वी होण्याच्या दृष्टीने वातावरणातील तापमान 30-35 अंश सेल्सिअस व आर्द्रता ही 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असणे महत्त्वाचे असते. कारण याच कालावधीमध्ये कलम यशस्वी होते.
वर दिलेली परिस्थिती मिळवून घेणे व कलम यशस्वी करून घेण्याच्या वेळेचा विचार केल्यास हा कलम करण्याचा कालावधी ही ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात अनुभवास येतो.

कलम करण्याकरिता काडीची तयारी -
खुंटकाडीची तयारी करणे महत्त्वाचे आहे. याच काळात कलम करतेवेळी आवश्‍यक असलेल्या गोष्टींची पूर्तता करण्याकडे लक्ष द्यावे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पाऊस जरी नसला तरी ढगाळी वातावरण व वाढलेली आर्द्रता या दोन महत्त्वाच्या गोष्टी दिसून येतात. याच परिस्थितीचा फायदा घेऊन बागेस खुंटरोपांचा रिकट घेऊन नवीन फुंटीची वाढ करून घ्यावी व त्यानंतरचे व्यवस्थापन आवश्‍यकतेप्रमाणे करावे.
जमिनीपासून एक ते दोन डोळे राखून खुंटरोपांचा रिकट घ्यावा. यानंतर बागेत पाणी असल्यास ड्रीपद्वारे नत्र व जमिनीतून 18ः46ः0 ची उपलब्धता करावी. यामुळे नवीन जोमदार व सशक्त फुटी निघायला मदत होईल. या निघालेल्या फुटींचे नियोजन करून फक्त तीन फुटींची निवड करावी व इतर फुटी काढून टाकाव्यात. असे केल्यास आपल्याला कलम करण्याच्या वेळेपर्यंत जमिनीपासून एक ते सव्वा फूट अंतरावर आवश्‍यक असलेली आठ-दहा मि.मी. जाडी सहज मिळू शकेल.

संपर्क - 020 - 26956055
(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे येथे कार्यरत आहेत.)


 
 
About Us | Contact Us | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 Agrowon.com - All rights reserved.
of
Powered By: